डायबेटिसच्या पेशंटसाठी वरदान आहे मेथी; जाणून घ्या काय आहेत त्यांचे फायदे...

प्राजक्ता निपसे
Wednesday, 22 July 2020

मेथीच्या बिया वातहारक, पौष्टिक, रक्तसंग्राहक,  रक्त व पित्तवर्धक आहेत.

मेथी, पालेभाजी व मसाल्याचा पदार्थ म्हणून सर्वाच्या वापरात सर्रास आहेच. मेथीची भाजी पथ्थ्यकर भाजी आहे. पाने थंड गुणाची, सारक, पाचक, वातानुलोमक, पित्तनाशक व सूज कमी करणारी आहेत. मेथीच्या बिया वातहारक, पौष्टिक, रक्तसंग्राहक आहेत. बिया रक्त व पित्तवर्धक आहेत.

पित्तप्रधान मलावरोधात पालेभाजीचा उपयोग पोट साफ करण्याकरिता आहे. पित्तप्रधान ज्वरात मेथीच्या पानांचा रस घ्यावा. जखम व सूज या दोन्ही लक्षणांत मेथीची पाने वाटून लेप लावावा. रक्त पडणाऱ्या आवेत कोवळय़ा पानांची भाजी उपयुक्त आहे. मेथीची पालेभाजी, हृद्रोग, भगंदर, कृमी, खोकला, कफ, वातरक्त, महारोग, उलटी, अरुची, ताप या विकारांत पथ्यकर म्हणून जरूर वापरावी.

मेथी वात व पित्तप्रकृती रुग्णांकरिता उत्तम आहे. मेथी बियांचे विशेष कार्य पचनसंस्थांवर आहे. मेथी चावून खायला लागल्यापासून लाळास्राव उत्तम सुरू होतो. आधुनिक विज्ञानाचे अभ्यासक मधुमेह या व्याधीकरिता जी एकमेव वनस्पती मानतात, ती म्हणजे मेथी होय.

मेथी बियांचा प्रत्येक कण तोंडातील, आमाशय, पच्यमानाशय, स्वादुपिंड या आतडय़ातील गोडपणावर, कफावर कार्यदरक्षणी करीत असतो. त्यामुळे नुसत्या मेथ्या चावून खाणे, सकाळी मेथीपूड पाण्याबरोबर घेणे, मेथ्या उकळून त्याचे पाणी पिणे, मेथीकूट खाणे, मेथी पालेभाजी खाणे, मेथी पालेभाजीचा रस पिणे असे अनेक उपाय जगभर मधुमेही माणसे यशस्वीपणे करीत आहेत.

सर्वात सोपा उपाय म्हणजे एक चमचा मेथीपूड एक पोळीला लागणाऱ्या कणकेत मिसळून अशा हिशोबात पोळय़ा खाणे. यामुळे रक्तातील साखर कमी होते. नियंत्रित राहते. शरीराचा बोजडपणा कमी होतो.

हेही वाचा : हळदीचे पाणी पिल्यास 'हे' होतात गजब  फायदे

मेथीच्या बियांमुळे आमाशयातील कफाचे विलयन व यकृताचे स्राव निर्माण करणे, वाढवणे, आहार रसांचे शोषण ही कार्ये होतात. आमवातात रसादि धातू क्षीण व दुर्बल होतात. हृदय दुर्बल होते. त्याकरिता मेथी व सुंठ चूर्ण मिसळून भोजनोत्तर घ्यावे. शरीर निरोगी व सबल होते. मेथीच्या फाजील वापराने शुक्रनाश होण्याची शक्यता असते. गरगरणे, चक्कर, अंधेरी ही लक्षणे दिसल्यास मेथीचा वापर करू नये.

संपादन - सुस्मिता वडतिले  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fenugreek help cure diabetes