जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाताय का ? तर आरोग्याचं होऊ शकतं नुकसान

प्राजक्ता निपसे
शुक्रवार, 31 जुलै 2020

टेंशनच्या स्थितीत सहसा गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी शरीरातील कार्टिसोल हा हार्मोन कार्यरत होतो आणि तणाव हलका होण्यास मदत होते. मात्र, सतत गोड किंवा चरबीयुक्त पदार्थ खाणं शरीरासाठी हानिकारक आहे.​

पुणे : कोरोनाच्या काळात गेले काही महीने सतत घरातच असल्यामुळे आवडत्या पदार्थांवर बिनधास्त ताव मारला जातोय. सातत्याने त्याच वातावरणात राहण्याचा कंटाळा, मनावरील ताण याचा परिणाम म्हणून सतत काहीतरी खाण्याची इच्छा होणं शक्य आहे. याचाच परिणाम म्हणून अनेकजणांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. गरजेपेक्षा अधिक किंवा वेळी-अवेळी खाण्याच्या सवयी महागात पडल्या आहेत. 'वर्क फ्रॉम होम' ही संकल्पना बहुतांश ठिकाणी आत्मसात केलेली दिसत आहे.

तुम्ही काम करत असताना, घरातील इतर लोक खाताना दिसले, तर तुम्हालाही उगाचच काहीतरी खाण्याची इच्छा होऊ शकते.या सवयी आरोग्यासाठी नक्कीच चांगली  नाही. टेंशनच्या स्थितीत सहसा गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी शरीरातील कार्टिसोल हा हार्मोन कार्यरत होतो आणि तणाव हलका होण्यास मदत होते. मात्र, सतत गोड किंवा चरबीयुक्त पदार्थ खाणं शरीरासाठी हानिकारक आहे.

तुम्हाला खाण्याची इच्छा नेमकी कशामुळे होते याकडे लक्ष ठेवा. काही वेळा तुम्ही केवळ पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेलेले असताना तुमचा आवडीचा पदार्थ दिसला किंवा खमंग वास आला म्हणून तुम्हाला खाण्याची इच्छा होऊ शकते. एखाद्या वेळी कामाचा ताण, आळस किंवा कंटाळा घालवणं याचा परिणाम म्हणून तुम्ही काहीतरी खाण्याचा पर्याय निवडता. अशा गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवा. शक्य झाल्यास त्याची नोंद करून ठेवा. जेणेकरून या सवयी बदलण्यास मदत होईल.

​काही गोष्टी लक्षात ठेवा
बहुतांश लोकांच्या घरात केक, चॉकलेट, बिस्कीट किंवा तत्सम पदार्थ नेहमीच असतात. लहान मुलांना आवडतात म्हणून किंवा चहाबरोबर खाण्यासाठी असे पदार्थ सहसा घरात ठेवले जातात. अशा वेळी तुमच्या जिभेवर ताबा असणं आवश्यक आहे. लहान मुलंच नाही तर घरातील कुठल्याही व्यक्तीनं रोज अशा पदार्थांचं सेवन करणं आरोग्यास हानिकारक आहे. या पदार्थांचे सेवन ही गरज नसून केवळ तुमची आवड आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा.

पौष्टिक अश्या पदार्थांना मेजवानी
गोड पदार्थांचं सेवन केल्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण गरजेपेक्षा अधिक वाढतं. शरीराला याची सवय झाल्यास साखर थोडीदेखील कमी झाली तरीही गोड खाण्याची इच्छा होते. यामुळे गोड खाण्याचं प्रमाण आपोआप वाढू लागतं. त्याऐवजी प्रथिनं आणि कर्बोदकांचं प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. असे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा मिळते. त्यामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. भूक भागण्याच्या बरोबरीनेच शरीराला योग्य ऊर्जा मिळाल्यास मन प्रसन्न राहण्यास मदत होईल.

​पौष्टिक पदार्थच खा
भूक लागल्यावर खाणं, ही गोष्ट चुकीची नाही. पण, तुम्हाला खरोखर भूक लागली आहे की हा केवळ एक सवयीचा अथवा आवडीचा भाग आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. जेवणाच्या वेळा सोडून इतर वेळी भूक लागली असल्यास आरोग्यास हानिकारक नसणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं उत्तम ठरतं. भूकेच्या वेळी बिस्किटं खाण्यापेक्षा एखादा पौष्टिक पदार्थ खाणं योग्य ठरेल.

हेही वाचा : याच्या सेवनाने रक्ताभिसरण अतिशय उत्तम होतं.

तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवा 
जेवण झाल्यानंतर चॉकलेट किंवा एखादा गोड पदार्थ खाण्याची सवय अनेक मंडळींना असते. एवढंच नाही तर पोटभर जेवण झालेलं असतानाही एखादा आवडीचा पदार्थ समोर आला तर तो खाण्याची इच्छा बहुतांश मंडळी टाळू शकत नाहीत. यामुळे तुम्ही खाल्लेलं अन्न पचण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. कुठलाही पदार्थ खाताना खरोखर त्याची आवश्यकता आहे का याचा विचार करा.

संपादन - सुस्मिता वडतिले  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fitness Tips How To Stop Sugar Cravings