मनाच्या तळाशी : फोबिया... अर्थात भयगंड 

fobia
fobia

शामराव कामात काटेकोर. वक्तशीर. सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडे ते आले. एकदा त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना शुल्लक चुकीबद्दल सर्वासमक्ष बोलले. ते मनातून चिडले मात्र गप्प बसले. त्यादिवशी रात्री अचानक त्यांची झोपच उडाली. दरदरून घाम फुटला. छातीचे ठोके कानाला स्पष्ट ऐकू येत होते. मग मिसेसनी धावाधाव करून त्यांना ऍडमीट केलं. सगल्या वैद्यकीय तपासण्या झाल्या आणि सारे काही नॉर्मल असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. डॉक्‍टरांनी एकच सल्ला दिला..."काळजीचं कारण नाही. रिलॅक्‍स रहा. कोणतीही औषधे नकोत.' 

झालं शामरावांना हायसं वाटले. पण घरी आल्यानंतर ते बसल्या बसल्या आपल्या नाडीचे ठोके मोजायचे. मध्येच छातीवर डाव्या बाजूला हात ठेवून बघायचे. मग एकट्याने बाहेर जायचं ते टाळू लागले. डॉक्‍टरांनी नको म्हणत असतानाही त्यांच्या आग्रहाखातर त्यांच्या भावाने पुण्यात ऍजिओग्राफी करवून घेतली. त्यातही दोष नव्हता. 

एव्हाना त्यांच्या या दुखण्याची सर्व स्नेही परिवाराला माहिती झाली. त्यांचे सल्ले सुरू झाले... मीठ खाऊ नका, जिने चढू नका, भोपळ्याचा रस प्या, चालायला जा, एकदा या डॉक्‍टरांना दाखवून बघा. एक ना अनेक सल्ले. शामराव पार गांगरुन गेले. धट्टकट्टा माणूस पण सतत भयाच्या छायेखाली. कुटुंबही आता त्यांना कंटाळलेले. मिसेसनी तर एका महाराजांना गाठून त्यांचे दुखणे सांगून उपाय मिळतो का हे पाहिले. तर खुद्द शामराव त्यांना नसलेला हृदयविकार शोधून देणाऱ्या डॉक्‍टरांच्या शोधात आहेत. 

"असे' अनेक रुग्ण माझ्यासमोर येतच असतात. ती सतत पुन्हा पुन्हा तपासण्या करवून घेतात. कितीही सांगितले त्यांना काही झालेलं नाही हे पटतच नाही. या विकारालाच "भयगंड' असं म्हटलं जातं. कोणत्याही गोष्टीची अतिरिक्त प्रमाणात वाटणारी भीती म्हणजे भयगंड. तशी आजार-मृत्यूची भीती सर्वांनाच असते. मात्र म्हणून प्रत्येक जण दररोजचं जगणं सोडत नाही. पथ्यपाण्याचा अतिरेक करीत नाही की शरीरात जरासं खट्ट झालं की दवाखाना गाठत नाही. 

अशा रुग्णांवर मनोविकारशास्त्रात एसएसआरआय (Selective serotonin reuptake inhibitor) पद्धतीची औषधं आहेत. मन शांत करणारी शवासनासारखी आसनं आणि वर्तणूक शास्त्रातील काही युक्‍त्या या द्वारे भीतीवर पूर्ण नियंत्रण मिळवता येऊ शकते. पण त्याआधी शामरावांच्या मनातील मनोविकारशास्त्राबद्दलच्या गैरसमजांची भेंडोळी दूर व्हायला हवी. मानसोपचार तज्ज्ञाकडे पाठवायला "मी काय वेडा आहे का' हा त्यांचा सवालच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यातील मोठा अडथळा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com