Coronavirus : घर सतत निर्जंतुक करत आहात का? मग, ही काळजी नक्की घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : घराचं सतत निर्जंतुकीकरण करत आहात का?

Coronavirus : घराचं सतत निर्जंतुकीकरण करत आहात का?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रत्येक जण स्वच्छतेवर भर देत आहे. त्यामुळे अनेक जण वारंवार घराचं निर्जंतुकीकरण करत आहेत. सोबतच सतत ब्लीच, सॅनिटायझर यांचा वारेमाप वापर करत आहेत. प्रत्यक्षात या सगळ्यामुळे घराची जरी स्वच्छता होत असली तरीदेखील दुसरीकडे मात्र, त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण, ब्लीच व सॅनिटायझर यांच्यामध्ये रासायनिक उत्पादनांचा वापर केला असतो जो शरीरासाठी घातक आहे. म्हणूनच घर निर्जंतुक करतांना किंवा वैयक्तिक स्वच्छता करतांना कोणती खबरदारी घ्यावी ते जाणून घेऊयात. (germs in the home how to protect yourself)

१. निर्जंतुकांमध्‍ये घातक रसायने असतात -

क्‍लीनिंग व निर्जंतुक उत्‍पादने सूचनांनुसार वापरणे गरजेचे आहे. काही निर्जंतुकांमध्‍ये अमोनियम संयुगे असतात, ज्‍यामुळे दमा होऊ शकतो. ज्‍यामुळे, सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे, विशेषत: घरामध्‍ये लहान मुलं व वृद्ध व्‍यक्‍ती असतील तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ब्‍लीचिंगमुळे श्‍वसन, त्‍वचा व डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो. लोकांनी हायड्रोजन पेरॉक्‍साईड, अल्‍कोहोल (इसोप्रोपिल अल्‍कोहोल किंवा इथेनॉल), सायट्रिक अॅसिड व लॅक्टिक अॅसिड असलेल्‍या निर्जंतुकांचा वापर करावा, पण खाद्यपदार्थ, कपडे, भांडी आणि निश्चितच मोकळ्या हातांवर त्‍यांचा वापर करू नये.

२. कोविड आजार पृष्‍ठभागापेक्षा संपर्कातून अधिक पसरतो-

अनेक तज्ज्ञांनी वेळोवेळी निदर्शनास आणले आहे की, विषाणू मुख्‍यत्‍वे व्‍यक्‍ती-ते-व्‍यक्‍ती संपर्कातून पसरतो. प्रभावी क्‍लीनिंग पृष्‍ठभागांवरून जीवाणूंना दूर करते आणि निर्जंतुकीकरण त्‍याच ठिकाणी त्‍यांना नष्‍ट करते. पण पृष्‍ठभाग सतत स्‍वच्‍छ करण्‍याबाबत धास्ती घेण्‍याची गरज नाही. नुकतेच सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्‍ड प्रीव्‍हेंशन, युएस अहवालामधून निदर्शनास आले की, यूव्‍ही रेडिएशन, एलईडी ब्‍ल्‍यू लाइट्स किंवा टनेल्‍सचे सॅनिटायझेशन यांसारख्‍या पर्यायी निर्जंतुकीकरण पद्धती विषाणू नष्‍ट करण्‍यासाठी उपयुक्‍त ठरतात याबाबत कोणताच उत्तम पुरावा नाही. हवा खेळती नसल्‍यास निर्जंतुकाच्या उपयुक्‍ततेपेक्षा तुमच्‍या आरोग्‍यावर अधिक घातक परिणाम होऊ शकतो. सीडीसीचा अहवाल निदर्शनास आणतो की, औद्योगिक क्षेत्रांच्‍या स्‍वच्‍छतेसाठी फॉगिंग, धूराचा मारा आणि इतर अशाप्रकारची कार्ये मानवी आरोग्‍याच्‍या संदर्भात उपयुक्‍त ठरण्‍यापेक्षा घातक ठरू शकतात. यामागील कारण म्‍हणजे जागेमधून विषाणू पूर्णपणे नष्‍ट करण्‍यासाठी केल्‍या जाणा-या फॉगिंगमुळे लोकांना श्‍वास घेण्‍यास त्रास होऊ शकतो.

३. पृष्‍ठभागांच्‍या योग्‍यप्रकारे स्‍वच्‍छतेसाठी साबणाचे पाणी वापरा-

तुम्‍ही निर्जंतुकाचा वापर करत असाल तर उत्‍पादनासंदर्भातील सर्व सूचना वाचा, ज्‍यामुळे तुम्‍हाला निर्जंतुक कशाप्रकारे काम करते आणि त्‍याचा कशाप्रकारे वापर करावा हे समजेल. नाही तर त्याऐवजी साबणाच्या पाण्याने जमीन स्वच्छ करा.

४. स्‍वच्‍छतेसाठी घातक रसायनांचा वापर करत असाल तर मास्‍क व प्रोटेक्टिव्‍ह आय गिअर परिधान करा; हवा खेळती राहण्‍यासाठी स्‍वच्‍छ करत असलेली खोली उघडी ठेवा. मुले व वृद्धांनी क्‍लीनिंग केल्‍यानंतर किमान ४ दिवस या खोलीमध्‍ये प्रवेश करू नये.

५. खोल्‍यांची साफसफाई करताना हवा खेळती राहण्‍यासाठी खिडक्‍या व दरवाजे उघडे ठेवा.

६. याव्‍यतिरिक्‍त, सार्वजनिक ठिकाणी मास्‍क घालणे आणि जवळच्‍या संपर्कामधून कोविड-१९चा व्‍यक्‍ती-ते-व्‍यक्‍ती होणारा प्रसार टाळणे महत्त्वाचे आहे. घरी राहा, स्‍वच्‍छ राहा आणि सुरक्षित राहा!

(डॉ. सुधीर गोरे हे कल्‍याणमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा अॅण्‍ड एमर्जन्‍सीचे हेड आहेत.)

loading image
go to top