
Health blog: उत्कट कोनासन
उत्कट कोनासन म्हणजेच जिममध्ये जे वाइड रुकवॉटस करतात ती स्थिती. या आसनाला इंग्रजीमध्ये गॉडेस पोझ असे ही म्हणतात. हे दंडस्थितीमधील आसन आहे.
असे करावे आसन
प्रथम ताठ उभे रहावे. आता दोन्ही पावलांमधील अंतर हळूहळू वाढवावे. साधारण खांद्याच्या दुप्पट किंवा थोडे कमीजास्त पायांच्या उंचीप्रमाणे असावे.
दोन्ही पावले आता बाहेरच्या बाजूला वळवावी. टाचा आतील बाजूला असाव्यात.
त्यानंतर हळूहळू मांडी जमिनीला समांतर होईल याप्रमाणे गुडघ्यातून पाय वाकवावे. दोन्ही मांड्या जमिनीला साधारण समांतर असाव्यात.
मांडी व पोटरीमध्ये साधारण काटकोन होईल. गुडघे व घोटा हे एक सरळ रेषेत असावेत. पाठ ताठ असावी.
दोन्ही हातांच्या बोटाची ज्ञानमुद्रा करून गुडघ्यावर ठेवावी. नजर स्थिर व श्वसन संथ सुरू असावे.
शक्य तेवढा वेळ आसन टिकवावे. आसन सावकाश सोडावे व सरळ उभे राहून पायांना आराम द्यावा.
आसनाचे फायदे
या आसनाच्या सरावाने मांडीचे स्नायू सुदृढ होतात. पायांची ताकद वाढते.
गुडघे, मांड्या, ग्रोइन्स, घोटे, पोटऱ्या, पाठ हा सगळाच भाग अधिक सुदृढ होतो.
अनेक मुलांचे पाय थोडेसे चालल्यावर किंवा थोडासा व्यायाम केल्यावर लगेच दुखू लागतात. अशा मुलांना या आसनाचा नियमित सराव करून पायांची ताकद वाढविणे आवश्यक आहे. तसेच विविध खेळाडूंनासुद्धा या आसनाचा छान लाभ होतो.
गुडघेदुखी, लिगामेंटचा त्रास असेल, खूप स्थूलपणा असतील तर हे आसन करू नये.