High Sugar Symptoms: काळजी घ्या! शरीरातील पाच बदल देतात रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्याचे संकेत

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 27 October 2020

शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणे हे आरोग्यासाठी चांगले नसते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर मधुमेह होतो.

पुणे- शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणे हे आरोग्यासाठी चांगले नसते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर मधुमेह होतो. या आजारात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. जर सुरुवातीला मधुमेहाची लक्षणे ओळखली नाहीत तर भविष्यात ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. मधुमेहात व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजचे (रक्तातील साखर) प्रमाण नेहमीपेक्षा वाढते. जेव्हा शरीरात इन्सुलिन नीट तयार होत नाही किंवा शरीरातील पेशी इन्सुलिनवर योग्य प्रकारे क्रिया करत नाहीत तेव्हा असे घडते.

मधुमेहावर नियंत्रण कसे करावे?
मधुमेहावर नियंत्रण कसे करावे यासारख्या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी उच्च साखरेच्या पातळीची लक्षणे लवकरात लवकर ओळखणे गरजेचे आहे. एखाद्याला मधुमेह असेल तर त्यांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण आपल्या खानपानातूनच वाढत असते. त्यामुळे आपण आहार घेताना काळजी घेतली पाहिजे आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.

शरीरातील रक्तातील साखर वाढल्याची लक्षणे-

1. अधिक तहान लागणे-
वारंवार पाणी प्यायल्यानंतरही जर तहान लागत असेल तर तुमच्या शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असू शकते. चांगले आरोग्य आणि हायड्रेटसाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे, पण अधिक तहान लागणे ही चिंतेची बाब असू शकते.

वजन कमी करायचंय? वाचा कधी जॉगिंग करणं ठरेल फायदेशीर

2. जखम लवकर बरी न होणे-
आपल्या शरीरातील जखमा बऱ्याचदा आपोआप भरून जातात. बऱ्याच लोकांच्या जखमाही लवकर बऱ्या होतात. जर तुमचे घाव लवकर बरे होत नसतील तर ते रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचं लक्षण असू शकते. या लहान लक्षणांची काळजी घेणे गरजेचे आहे.

3. वजन कमी होणे-
चांगला आहार घेतल्यानंतरही शरीराचे वजन कमी होत असेल तर ते शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे लक्षण आहे. जर तुम्ही चांगले खात असाल, पण तरीही तुमचे वजन अचानक कमी होत असेल तर ती चिंतेची बाब ठरू शकते.

पोट सारखं बिघडतंय? पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी लक्षात ठेवा 4 गोष्टी

4. दृष्टी कमजोर होणे-
जर तुमची दृष्टी अचानक कमजोर होत असेल तर तुमच्या शरीरात उच्च साखर असू शकते. जर तुम्हाला अचानक धूसर दिसत असेल तर तुम्हाला सावध राहावे लागेल. तुम्ही तुमच्या साखरेची पातळी तपासत राहिले पाहिजे.

5. अधिक थकवा जाणवणे-
चांगली झोप आणि काम नसतानाही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत असण्याचे ते लक्षण असेल. मधुमेह असलेल्या लोकांच्या शरीरात कार्बोहायड्रेट्स योग्यरित्या ब्रेक होऊ शकत नाही. यामुळे अन्नातून मिळणारी ऊर्जा शरीराला पूर्णपणे उपलब्ध होत नाही. ऊर्जेच्या अभावामुळे शरीरात थकवा जाणवू शकतो.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: high sugar level in body symptoms five slight change