हसण्यासाठी जगा : चला, उन्हाळा ‘एन्जॉय’ करूयात!

Summer
Summer

‘काय उकडतंय नाही?’ सुस्काऱ्यासह हे वाक्य आता जागोजागी ऐकू यायला लागलं आहे. उबदार थंडीकडून उन्हाळ्याकडं वाटचाल सुरू झाली आहे. पावसाचे थेंब पडल्यावर जमिनीवर कोंब उगवतात, तसंच शरीरावर घामाचे थेंब सुरू झाल्यावर ‘काय उकडतंय नाही,’ या वाक्याचे कोंब उगवायला लागले आहेत! 

अर्थात, पावसाळा सुरू झाल्यावर हेच वाक्य थोडं बदलून ऐकू यायला लागतं, ‘काय पाऊस आहे नाही?’ आणि थंडी पडल्यावर ऐकू येतं, ‘काय थंडी आहे नाही?’ थोडक्यात, ऋतू बदलायचाच, पण ‘काय .... नाही ?’ हे वाक्य तेच! पण गमतीदार गोष्ट म्हणजे लोकं पावसाळ्यात मुद्दाम भिजायला जातात. लोणावळा, खंडाळा या व अशा ठिकाणी धबधब्याच्या खाली  भिजतात. तेव्हा म्हणतात. ‘आम्ही पावसाळा एन्जॉय करतोय!’ कुडकुडणाऱ्या थंडीत, हातावरती हात चोळत मुद्दाम आइस्क्रीम खायला जातात. तेव्हा म्हणतात ‘आम्ही थंडी एन्जॉय करतोय!’ मुद्दा एवढाच आहे, की लोकं पावसाळा एन्जॉय करतात, थंडी एन्जॉय करतात मग उन्हाळ्यानंच काय घोडं मारलं आहे? यापुढं उकडायला लागलं, कानामागून घाम पाठीच्या दिशेनं जायला लागला, की हसतमुख  चेहऱ्यानं म्हणायचं, ‘आम्ही उन्हाळा एन्जॉय करतोय!’

उन्हाळ्याच्या तापलेल्या वातावरणात मनदेखील चिडचिडं होतं. अस्वस्थता वाढते. सगळ्यांप्रमाणं माझं देखील असंच व्हायचं. मनात विचार आला, ‘यामध्ये बदल करता येईल का? उन्हाळा एन्जॉय करता येईल का?’...काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. उन्हाळ्याचे दिवस होते.  घरी पाहुणे आले होते. दुपारचं जेवणखाण झाल्यानंतर थोडी सुस्ती आली होती.  मी बायकोला म्हणालो. ‘‘रजई आहे का ग?’’  हे वाक्य ऐकल्याबरोबर एकानं विचारलं, ‘‘खूप उकडतंय म्हणून जमिनीवर रजई टाकून त्यावर तू झोपणार आहेस का?’’ मी म्हणालो, ‘‘नाही. अंगावर रजई घेऊन झोपणार आहे.लाइट गेलेले आहेत. अंगावर रजई घेतल्यानंतर थोड्या वेळात दरदरून घाम येईल. मग वाऱ्याची एखादी झुळूक आल्यावर एकदम थंडगार वाटायला लागेल. कारण मी उन्हाळा एन्जॉय करतोय!’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तो संपूर्ण उन्हाळा मी मनामध्ये ‘उन्हाळा एन्जॉय करतोय’ असा विचार करत काढला.  परिणामी मला कधीच उकडण्याचा त्रास झाला नाही. कारण मनात विचार असतो ‘मी उन्हाळा एन्जॉय करतोय!’ ‘मनाची विलक्षण ताकद आजूबाजूच्या वातावरणावर मात करून जगायला शिकवते!’

अर्थात, हे आपल्या आयुष्याचं रूपक देखील आहे. तसं म्हणायचं झाल्यास आपल्या आयुष्यातही हे ऋतू असतातच. आयुष्यात अनपेक्षित गोष्टींच्या भीतीनं गारठायला होतं, तेव्हा जवळची लोकं प्रेमाची, मायेची ऊब देतात. पण आयुष्यात काही नकारात्मक गोष्टी घडल्या, की लोकं अस्वस्थ होतात. आपण एकटे आहोत असं वाटायला लागतं. ऋतूमानाप्रमाणे आयुष्यातील या गोष्टी अविभाज्य घटक आहेत. या सर्वांचा स्वीकार करत, त्रयस्थपणे बघत आपण प्रत्येक क्षण ‘एन्जॉय’ करू शकलो, तर मनाच्या सामर्थ्यानं तुमच्या यशाचं इंद्रधनुष्य जगाला दिसेल!!!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com