हसण्यासाठी जगा : ‘कृतज्ञता ध्यान’, मन बलवान !

Laughing
Laughing

तुम्ही एखादा चित्रपट बघत असता.  काळाकुट्ट अंधार... जुनाट हवेली... हवेलीचा दरवाजा उघडताना आवाज येतो... कsर्रsर्र! आता चित्रपट भीतिदायक होतो. आपलं मनदेखील अनेक गोष्टींबाबत अंधारात चाचपडत असतं. निराशेचा दरवाजा कsर्रsर्र असा आवाज करतो, तेव्हा मनामध्ये ‘जगण्याची भीती’ निर्माण होते!

या भीतीमुळं काही लोक कायमच उदास असतात. प्रत्येक गोष्टीबाबत त्यांची सतत तक्रार असते. चांगल्या गोष्टी त्यांना जाणवत नाहीत. मात्र, नकारात्मक गोष्टी त्यांच्या मनाला लगेच भिडतात. कुरकुरणाऱ्या दाराप्रमाणं ते सतत नकारात्मक बोलत राहतात. या अवस्थेत ‘नात्यांमध्ये आता पूर्वीसारखा ओलावा राहिलेला नाही. ज्येष्ठांचा छळ,  सुनेचा सासुरवास,हॉस्पिटल बाबतचे नकारात्मक अनुभव, तरुणाईचा बेलगामपणा,’ अशा विविध विषयांवर त्यांचा मनाचा दरवाजा कुरकुरत राहतो. मनाचा परिणाम शरीरावर झाल्यानं या लोकांचा शरीराचा कोणता ना कोणता अवयव दुखत असतो. त्याबद्दलही ते कुरकुरत राहतात.

एखादं दार सतत कुरकुरत राहिल्यास आपण ‘वंगण’ टाकतो. त्याचप्रमाणं मनाच्या दाराचा आवाज कमी करण्यासाठी टाकावं लागणार वंगण म्हणजे ‘कृतज्ञता’ ! ‘कुरकुरणारं मन अस्वस्थ असतं, तर कृतज्ञ मन शांत असतं.’! स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी ही एक सवय नव्यानं निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी दिवसभरामध्ये वेगवेगळ्या कृती करत असताना कृतज्ञतेचा भाव मनामध्ये वारंवार आणण्याची सवय करावी लागते.  दररोज सकाळी डोळे उघडल्यानंतर स्वतःच्या शरीराकडं पाहा आणि याचा आनंद घ्या, की आजही मी जिवंत आहे, त्यामुळं हे सुंदर जग बघू शकतो. अशा विचारानं जीवनाला शाश्‍वतता येते.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण बघू शकतो. आपण ऐकू शकतो. आपल्याला सुगंध घेता येतो. आपल्याला स्पर्शाचा आनंद घेता येतो. आपण चवदार खाऊ शकतो. या प्रत्येक गोष्टीबाबत आपण ‘धन्यवाद’ देऊ शकतो. एखादा अवयव दुखावल्यानंतर,  अपघात झाल्यानंतर शरीर त्याला दुरुस्त करतं. कधीतरी या शरीरातील अब्जावधी पेशींना आपण ‘थँक्यू’ म्हणाला हवं. आयुष्यातील एखाद्या गोष्टीची किंमत ती नसल्यानंतर कळते. कोणीतरी आपल्याला प्रेमाचा ओलावा देतो. त्याच्याबद्दलसुद्धा ‘आभारी’ राहायलाच हवं. 

मन शांत करण्याचा एक नितांत सुंदर प्रकार म्हणजे मेडिटेशन अर्थात ध्यान!  बहुसंख्य संसारी माणसांना अनुभव येतो, की ते ध्यान करायला बसल्यावर मनामध्ये असंख्य विचार येतात. यावरचा उपाय म्हणजे सकारात्मक विचारांचं ‘कृतज्ञता ध्यान’ करा!!! एकटा माणूस कधीच जगू शकत नाही. यशस्वी होऊ शकत नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण जे काही आहोत त्याची जाणीव करून घेण्यासाठी दररोज रात्री ‘कृतज्ञता ध्यान’ करा!

आपलं आयुष्य ज्यामुळं समृद्ध झाले आहे अशा सर्व लहान-सहान अर्थात ‘टिल्लू, टिल्लू’ गोष्टींचा विचार करा!  ‘कृतज्ञता ध्यानात’  तुम्हाला अनेक गोष्टी सापडतील. हजारो वर्षांपूर्वी कल्पकतेनं शेती करून धान्य पिकवणारे, निवारा तयार करून घर तयार करणारे, विविध वनस्पतींचा वापर करून औषध तयार करणारे, भाषा समृद्ध करण्यासाठी शब्द व विचार निर्माण करणारे,  संगीताच्या विविध वाद्यांचा शोध लावणारे,  गाण्याची कला विकसित करणारे, प्राणार्पण करून राष्ट्र अबाधित ठेवणारे या व अशा  अनेक गोष्टी तुम्हाला जाणवतील.  मनाच्या गाभाऱ्यातून ‘आभार’, ‘धन्यवाद’, ‘थँक्यू’  असे कृतज्ञतेचे बोल येतील. 

‘कृतज्ञतेचे ध्यान’ तुमचं मन, शांत आणि बलवान नक्कीच करेल!!!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com