हसण्यासाठी जगा : चौकट जगण्याची, विस्ताराची!

आयुष्यभर आपण आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधत असतो. ‘संवाद किती मोठा. किती छोटा’ यापेक्षाही त्यामध्ये काय बोललं जातं याकडं कळत-नकळत प्रत्येक जण लक्ष ठेवून असतो. त्यानुसार आयुष्य जगत असतो. 
Laughing
LaughingSakal

आयुष्यभर आपण आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधत असतो. ‘संवाद किती मोठा. किती छोटा’ यापेक्षाही त्यामध्ये काय बोललं जातं याकडं कळत-नकळत प्रत्येक जण लक्ष ठेवून असतो. त्यानुसार आयुष्य जगत असतो. 

  • पूर्वीच्या काळी लहान मूल खूप गडबड करत  असेल, शांत बसत  नसेल, तर त्यावेळी आई हमखास एक कल्पना वापरायची. ती त्या मुलाला गादीवर  बसवायची.  बाजूनं चार उशा, लोड लावायची आणि  सांगायची ‘हे तुझं घर आहे. यातून बाहेर पडायचं नाही. या बाजूच्या उशा पडू द्यायच्या नाहीत.’  मग ती त्या लहान मुलाच्या हातात शेंगदाण्याच्या कुटात  साखर घालून  द्यायची.  मग ते लहान मूल आनंदानं तिथं  बसायचं. आईनं आखून दिलेली  उशांची ‘चौकट’ जिवापाड जपत  राहायचं.

  • उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत गावाकडं नातेवाईक एकत्र जमलेले असतात. गप्पा रंगतात. ‘कोण काय करतंय,’ हे सांगितलं जातं. शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल बोलताना कोणीतरी म्हणतं, ‘अभ्यासात जरा कच्चा आहे, पण बाकी सगळ्या गोष्टींत हुशार आहे.’ हे वाक्य वारंवार ऐकून त्या विद्यार्थ्याच्या मनात ‘अभ्यासात कच्चं राहण्याची,’ चौकट तयार होते.  त्याचबरोबर ‘इतर सर्व गोष्टीत हुशारी दाखवण्याची’ नवी चौकट जपत तो पुढील आयुष्य जगायला लागतो!

  • ऑफिसमध्ये काम करताना हमखास चुकणारी एखादी व्यक्ती असते. सगळेजण त्याबद्दल चेष्टा करत असतात. एखाद दिवशी ही व्यक्ती एकही चूक करत नाही. तेव्हा खवचटपणे कोणी म्हणतं, ‘आज एकही चूक न केल्यानं तुला चुकल्या चुकल्यासारखं वाटत असेल नाही?’ दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती पुन्हा चूक करते.  लोकं पुन्हा तिला बोलतात आणि बघता बघता  चुका करण्याच्या ‘जुन्या मानसिक चौकटीत’ ती व्यक्ती पुन्हा ढकलली जाते.

  • रिटायरमेंटच्या कार्यक्रमात सगळेजण आपल्या सहकाऱ्याबद्दल भरभरून बोलतात. आयुष्यभर सतत काम करण्याच्या वृत्तीबद्दल कौतुक करतात. ‘रिटायरमेंट नंतर सुद्धा ते शांत बसणार नाहीत,’ असं बोललं जातं.  हा विचार त्या व्यक्तीच्या मनात घोळत राहतो. रिटायरमेंटनंतर ती छोटा-मोठा व्यवसाय करायला लागते.  आठ दहा वर्षांनी हाताखाली  नोकर घेऊन व्यवसाय वाढवते. कारण ‘सतत काहीतरी करत राहणार’ या त्याच्या स्वभावाची चौकट जपताना त्यांची प्रगती होते.

रंग, रूप, वजन, उंची, आळशीपणा, रागीटपणा, घाबरटपणा, आनंदी वृत्ती, धडाडीची वृत्ती, कर्तृत्व याबाबत आजूबाजूची माणसं तुम्हाला तुमच्या चौकटी आखून देत असतात.  काहीजण त्यानुसारच जगत राहतात, तर काहीजण यांना आव्हान देत नवी दिशा निर्माण करतात. सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी या चौकटीकडं त्रयस्थपणे पाहिलं, की बदल घडवता येतात. त्यासाठी खालील टप्प्यांनी बदल करावा लागतो.

१) मुळामध्ये तुम्ही कोणत्या चौकटीत आहात हे स्वतःला कळणं. त्याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे.

२) ही चौकट आपल्या क्षमतांवर मर्यादा तर आणत नाही ना, याचा अभ्यास करणं. त्याचा विचार करणं.

३) त्या चौकटीत अडकून न पडण्याची प्रेरणा होणं. 

४) त्यासाठी स्वत:च्या कृतीत बदल घडवून आणणं.

५) ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करणं.

मर्यादाच्या बंधनांचं ‘कोंदण’ करून जगायचं, की अस्तित्वाच्या अमर्यादित स्वरूपावर विश्वास ठेऊन ‘विस्तारायचं’...शेवटी निर्णय तुमच्या हातात आहे!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com