bhardwajasan
bhardwajasansakal

योग- जीवन : भरद्वाजासन

आजच्या लेखात आपण ‘ध्याना’ची म्हणजे अष्टांग योगाच्या सातव्या अंगाची माहिती करून घेऊ या. अय्यंगार गुरुजींनी ध्यानाला योग कल्पतरूच्या फुलांची उपमा दिली आहे.
Summary

आजच्या लेखात आपण ‘ध्याना’ची म्हणजे अष्टांग योगाच्या सातव्या अंगाची माहिती करून घेऊ या. अय्यंगार गुरुजींनी ध्यानाला योग कल्पतरूच्या फुलांची उपमा दिली आहे.

- मुकुंद मावळंकर, अय्यंगार योग शिक्षक

आजच्या लेखात आपण ‘ध्याना’ची म्हणजे अष्टांग योगाच्या सातव्या अंगाची माहिती करून घेऊ या. अय्यंगार गुरुजींनी ध्यानाला योग कल्पतरूच्या फुलांची उपमा दिली आहे. गेल्या आठवड्यात आपण धारणेची माहिती करून घेतली होती. धारणेचा अभ्यास व सराव केल्याने ध्यानाची पूर्वतयारी होते आणि ओढ लागते. ही प्रगती होत असताना काही अडथळे येतात. गीताताई अय्यंगार म्हणतात, ‘‘अशा वेळेस पुन्हा धारणेकडे मागे वळावे. त्यात खोट असल्यास, प्रत्याहाराचा अभ्यास परत करावा. तेथेपण उणीव वाटल्यास, प्राणायामाचा पाया परत भक्कम करावा. हे सर्व करत असताना आसनांचा विस्तृत व सखोल सराव करावा. ही अधोगती नव्हे, तर जाणीवपूर्वक केलीली पुनरावृत्ती होय. अशी आवर्तने दोन-चार वेळेस झाली, तरी साधकाने चिकाटी सोडू नये. या पुनरावृत्ती मुळे अज्ञान दूर होते. बुद्धिवृत्ती निरोध म्हणजे धारणा आणि चित्तवृत्ती निरोध म्हणजे ध्यान.’’ 

धारणा, ध्यान आणि समाधीसाठी सहसा बैठी आसने निवडावीत. स्वस्तिकासन, सिद्धासन, पद्मासन इत्यादी. या आसनात प्रत्याहाराचा पाय मजबूत करून घ्यावा. आसनात बसल्यावर काटेकोरपणे शरीराचे संतुलन साधायचे असते. उज्जायी प्राणायामाच्या साह्याने मन शांत व प्रसन्न झाले पाहिजे. ध्यानासाठी अतूट श्रद्धा, प्रबळ नैतिक आणि बौद्धिक इच्छाशक्ती, अचूक स्मरणशक्ती, तसेच तल्लीन साधनेची गरज लागते. हे आत्मसात केल्याने धारणेचा सतत व अखंड प्रवाह प्राप्त होतो आणि यातूनच धारणेचे ध्यानात रूपांतर होते. धारणेचा व ध्यानाचा सराव पूर्णपणे वैयक्तिक असतात. त्याचे खरे ज्ञान अनुभवातूनच मिळते आणि अंतरात्म्याच्या दर्शनाकडे साधक आकर्षित होतो. ध्यानात मनाची चलविचलता व द्वंद्वे कमी होऊन संतुलित अवस्था प्राप्त होते. बुद्धीची, विचारांची आणि चित्ताची एकतानता हेच ध्यान होय. 

आज आपण भरद्वाजासनाचा अभ्यास करू या. बसून घालण्याच्या श्रेणीतील हे एक महत्त्वाचे आसन आहे.

१. पाय सरळ करू दंडासनात बसा. गुडघे वाकवून पाय डाव्या बाजूस दुमडा. डावे पाऊल व घोटा उजव्या पावलावर ठेवा.

२. दोन्ही कुल्ले जमिनीवर टेकलेले असू द्या. ओटीपोट छातीसकट उचलून धड उजवीकडे फिरवा. डाव हात सरळ करून उजव्या मांडीच्या बाहेरच्या बाजूला ठेवा. डावा तळहात व बोटे उजव्या गुडघ्या खाली सरकवा. डावा तळहात जमिनीवर टेकला असला पाहिजे.

३. श्वास सोडा, उजवा खांदा मागे वाळवा. उजवे कोपर वाकवून पाठीमागच्या बाजूने उजव्या हाताने डावा दंड धारा. उजव्या हाताची सगळी बोटे व अंगठापण डाव्या दंडाभोवती आतल्या बाजूने गुंडाळला असला पाहिजे.

४. श्वास सोडा, छाती उचलून कंबर व पोट अजून थोडे उजवीकडे फिरवता येईल. आता मान डावीकडे वळवून डाव्या खांद्या वरून डावीकडे बघा. डोके सरळ ठेवून, नजर जमिनीला समांतर असुद्या. दीर्घ श्वास घेत एक मिनिट थांबा. हे आहे भरद्वाजासन.

५. श्वास सोडून, पाठ उचलून परत दंडासनात या. आता हेच आसन दुसऱ्या बाजूला करा.

गुडघे किंवा खुब्याचे सांधे आक्रसलेले असल्यास धड उजवीकडे कलते. ते काटकोनात ठेवण्यासाठी उजव्या कुल्ल्याखाली ब्लॅंकेटची जाड घडी ठेवा. सराव वाढेल तशी ब्लॅंकेटच्या घडीची उंची कमी करता येईल.

या साध्या आसनात पाठीचा कणा दोन्ही बाजूला फिरवला जातो व काण्याची लवचिकता वाढते. मणक्याचा आर्थराइटिस किंवा स्पॉन्डयलोसिस असण्याऱ्यांना हे आसन खरेच एक वरदान आहे. या आसनामुळे पोटाच्या अवयवांचे मर्दन होऊनि ते सक्रिय व सशक्त होतात. खांदे, मान व पाठ मोकळी होते. गुडघ्यांची तसेच खुब्याच्या सांध्यांची लवचिकता वाढते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com