ओमेगा-३ ने बनवू शकता उत्तम आरोग्य, कसे ते सविस्तर वाचाच ...

omega
omega

पुणे : ओमेगा ३ हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक पोषणांपैकी एक असतात. ते आपल्या शरीराचं कार्य सुधारतात आणि प्रौढांच्या व मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड तीन प्रकारचे असतात. अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड, इकोसॅपेन्टाइनॉइक अ‍ॅसिड आणि डोकोसॅहेइक्सानॉइक अ‍ॅसिड. इकोसॅपेन्टाइनॉइक अ‍ॅसिड आणि डोकोसॅहेइक्सानॉइक अ‍ॅसिड मांसांमध्ये आढळतं तर अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड नट्स किंवा बियांमधून प्राप्त होतं.

ओमेगा-३ मेंदू, हृदय व डोळे यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. ओमेगा-३ रक्ताच्या गाठींसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करतात, असं वैद्यकीय संशोधनातून आढळलं आहे. ते पेशीपटलाची द्रवता राखतात व रक्ताभिसरण व ऑक्सिजन पुरवठा वाढवतात. डोकोसॅहेइक्सानॉइक अ‍ॅसिडरक्तामध्ये प्रसरण होत असलेल्या बॅड फॅटला थांबवतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. इकोसॅपेन्टाइनॉइक अ‍ॅसिड आणि डोकोसॅहेइक्सानॉइक अ‍ॅसिड यांना -ह्य़ुमेटॉइड आर्थरायटिस असलेल्या रुग्णांमध्ये ताठरपणा व सांधेदुखीचा उपाय म्हणून ओळखले जातात.

तज्ज्ञांच्या मते, ओमेगा-३ हृदयासाठी लाभदायी असून हृदयविकाराचा झटका किंवा आघात येण्याची शक्यता कमी करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशन निरोगी हृदयासाठी नियमित ओमेगा-३ घेण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड निरोगी लोकांच्या हृदयासाठी आणि ज्यांना कार्डियोव्हॅस्क्युलर आजार आहेत किंवा हा आजार होण्याची दाट शक्यता आहे, त्यांच्यासाठी लाभदायी आहे. संशोधनामधून असं समोर आलं आहे की ओमेगा-३ युक्त असलेल्या आहारामुळेसुद्धा बालकांची दृष्टी चांगली होते.

ओमेगा-३ चे लाभ केवळ शरीरासाठीच नाहीत. तर त्याच्या पुरेशा प्रमाणाने मानसिक आरोग्यावरसुद्धा सकारात्मक परिणाम होतात. अभ्यासामधून लक्षात आलं आहे की, ओमेगा-३ युक्त आहार घेत असलेल्या लोकांमध्ये तणावाचं प्रमाण फारच कमी असतं.

आवश्यक फॅटी अ‍ॅसिड्स मुलांची वाढ व विकासासाठी तसेच त्यांची बौद्धिक वाढ होण्यासाठीसुद्धा महत्त्वाचे असतात. ओमेगा-३ हा मेंदूच्या आरोग्यासाठीचा क्रांतिकारी घटक आहे आणि त्याच्या कमतरतेमुळे वाचण्याची व स्मृतीची क्षमता कमी होते. त्याच्या नियमित घेण्यामुळे एकाग्रता कमी होणे अति क्रियाशिलता यांची लक्षणं मुलांमध्ये कमी होतात.

खरं तर, संशोधकांनी असा शोध लावला आहे की, ओमेगा ३च्या कमतरतेमुळे मुलांमध्ये वाईट लक्षणं दिसतात. अशा मुलांमध्ये सामान्य मुलांपेक्षा अभ्यासाच्या आणि वागणुकीच्या तक्रारी जास्त असतात. मानवाच्या मेंदूचा एक-चतुर्थाश भाग अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्सने बनला आहे आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडच्या कमतरतेमुळे डिमेन्शियाचा धोका वाढतो.

ओमेगा-३चे  स्त्रोत पुढीलप्रमाणे 

» मासे
» माशांपासून बनलेलं तेल
» कॉर्डलिव्हर ऑइल
» क्रिल ऑइल

शाकाहारी लोक गडद हिरव्या पानांच्या पालेभाज्या, अळशीचं बी, सोयाबीन, राजमा, मटकी, ब्लॅक बीन्स, अक्रोड व कॅनोला ऑईल यांचा वापर करू शकतात.

भारतामध्ये काही टेबल-स्प्रेड्समध्ये  भाजीपाल्यांमधून काढलेल्या ओमेगा-३ चासुद्धा वापर करतात. तुम्ही त्याला तुमच्या न्याहरीमध्ये विशेषत्वाने या फॅटची आवश्यकता असलेल्या तुमच्या मुलाच्या आहारामध्ये त्याचा नियमित वापर करू शकता.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com