तुमच्या घरात येणारी दुधाची पिशवी कोरोनापासून सुरक्षित आहे का? FSSAIने दिल्या सूचना

सूरज यादव
शनिवार, 18 जुलै 2020

दररोज वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये दुधाबाबतही लोकांच्या मनात भीती आहे. दुधाची पिशवी कोरोनाच्या प्रादुर्भावापासून मुक्त आहे हे माहिती असायला हवं.

पुणे - सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहेत.कोरोनाला रोखण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. लोक बाजारातून साहित्य आणण्यासाठी बाहेर पडतात. त्यात भाजीपाला, राशन किंवा इतर सर्व वस्तूंच्या खरेदीकडे संशयानेच पाहिलं जातं. अनेक लोक बाजारातून खरेदी केलेलं सॅनिटाइज करण्याचाही प्रयत्न करतात. दररोज वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये दुधाबाबतही लोकांच्या मनात भीती आहे. दुधाची पिशवी कोरोनाच्या प्रादुर्भावापासून मुक्त आहे हे माहिती असायला हवं.

दुधाची खरेदी एखाद्या दुधवाल्याकडून किंवा डेअरीतून घेतलं जातं. तिथं सोशल डिस्टन्सिंग किती पाळलं जातं, सॅनिटायझिंगच्या बाबतीत काय परिस्थिती असते याची माहिती नसते. त्यामुळे अनेक लोकांशी संपर्क होत असल्याने दुधाच्या खरेदीवेळी कोरोनाची भीतीही सतावत असते. भारताच्या अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) स्पष्ट केलं आहे की, पिशवीबंद पाकिटातील दूध पुर्णपणे सुरक्षित आहे.

दुधाची पिशवी साबण किंवा डिटर्जंटने धुतल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर अशा प्रकारच्या गैरसमजुती दूर कऱण्यासाठी FSSAI ने काही सूचना आणि टिप्स दिल्या आहेत. तुम्ही वापरत असलेलं दुध सुरक्षित आणि कोरोना व्हायरसमुक्त आहे हे ठरवण्यासाठी याचा उपयोग होईल.

हे वाचा - आहारात मॅग्नेशिअमची गरज किती मोठ्या प्रमाणात असते ते सविस्तर वाचाच

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने लोकांना सांगितलं आहे की, दुधवाल्याकडून दूध घेताना लोकांना मुलभूत सुरक्षा उपाय अंमलात आणले पाहिजेत. सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करावं. तसंच दुध विक्रेत्यांनी मास्क घालावा. एखाद्याने मास्क घातला नसेल तर त्याला याबाबत सांगावं. लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करताना FSSAI ने म्हटलं की, दुधाची पिशवी घेतल्यानंतर हे तुमचे हात स्वच्छ धुवा. दुधाचे पाकिट फक्त पाण्याने धुवून घ्या. दुधाची पिशवी सॅनिटायझर किंवा डिटर्जंटने धुण्याची आवश्यकता नाही तर फक्त पाण्यानं स्वच्छ करणं पुरेसं आहे.

दुधाची पिशवी उघडण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या. तसंच ज्या भांड्यात दूध ठेवणार आहात तेसुद्धा धुवून घ्या. दूध तापवण्यासाठी ठेवताना जोपर्यंत उकळत नाही तोपर्यंत त्यावर झाकण ठेवा. FSSAI ने म्हटलं की, सोपे उपाय केल्यानं तुम्ही बाहेरून आणलेल्या दुधाच्या पिशवीपासून कोरोनाचं संक्रमण होणार नाही. दुधाच्या पिशवीला सॅनिटाइज करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: packaged-milk-safe-from-the-corona-virus-see what says FSSAI