वैवाहिक सौख्याची सूत्रे: सत्यता आणि समय

married
married

यापूर्वीच्या भागात सुखी वैवाहिक जीवनाची सूत्रे बघताना आपण स्वभाव आणि संवाद या दोन सूत्रांसंबंधी चर्चा केली होती. स्वभाव आणि संवाद कितीही चांगले असले, तरी जोपर्यंत जोडीदाराला पुरेसा वेळ देणे आणि एकमेकांच्या नात्यांमध्ये खरेपणा हे दोन घटक जुळून येत नाही, तोपर्यंत वैवाहिक सौख्य सुदृढ होणे कठीण आहे. या अनुषंगाने आज आपण वैवाहिक जीवनाचे तिसरे सूत्र सत्यता आणि चौथे सूत्र समय यावर चर्चा करणार आहोत.
बर्‍याचदा आपण गोड बोलतो, पण त्या संवादात खरेपणा असतोच असं नाही. किंबहुना आपण लोकांची वरवर स्तुती करत असतो. अशी खोटी स्तुती देखील परस्पर संबंधांना मारक ठरू शकते.  सत्यता ही नात्यांमध्ये आवश्यकच आहे. पती-पत्नीच्या नात्यांमध्ये तर ती फारच आवश्यक आहे. बरेचदा तर असे होते की, जर सत्यता ही कटू शब्दात व्यक्त होत असेल तर ती लोकांना रुचत नाही व मनामध्ये अडी निर्माण होते. सत्यता ही नेहमी सौम्य शब्दातच सांगायला हवी. पती-पत्नीच्या नात्यांमध्ये उघड-उघड सत्य सांगितल्या गेले तर ते  नात्यांना मारक ठरू शकते म्हणून सत्यता किती व कशी सांगायची हे महत्त्वाचे असते. मानसशास्त्रात असे म्हटले जाते की, सत्यता ही फायदेकारक असली पाहिजे. त्याला इंग्रजीमध्ये फॅसिलिटेटिव्ह जेन्युईननेस असे म्हणतात. इतकेच खरे बोलावे ज्याने आपल्या जोडीदाराला प्रगती करण्यास सहकार्य मिळेल. एखादा व्यक्ती फार चिडत असेल तर तो चिडका आहे हे स्पष्ट सांगण्यापेक्षा, तू शांत असताना जास्त परिणामकारक कार्य करतो, अशा पद्धतीने सांगितले पाहिजे. सत्यता आणि संवाद यांची गुंफण आवश्यक आहे. संवाद हा सत्यावर आधारित असेल ही खात्री बाळगणे गरजेचे आहे. याशिवाय पती-पत्नीच्या नात्यांमध्ये अनेक बाबी खर्‍याखुर्‍या सांगणे गरजेचे असते. पण बर्‍याचदा पती व पत्नी काही बाबी एकमेकांपासून लपवून ठेवतात. काही पुरुष आपले आर्थिक व्यवहार पत्नीला सांगतच नाहीत. मग अप्रिय घटना घडल्यावर पैसे कुठे आहे, हे ठावूक नसते. पती-पत्नी एकमेकांसोबत फार काळ घालवित असल्याने सत्यता सांगताना ती पटकण व तीक्ष्ण शब्दात व्यक्त होते. त्यामुळे तीक्ष्ण शब्दात सत्यता सांगने टाळावे. अनेकदा जोडीदाराला स्पष्ट बोलण्याची सवय असते. त्यामुळे अशा स्पष्ट बोलणार्‍या जोडीदाराला स्वीकारणे पण आवश्यक असते. मात्र, एक लक्षात असायला हवे की, सतत चुका काढल्यास जोडीदाराचा आत्मविश्‍वास कमी होऊ शकतो. त्यामुळे वारंवार टिका करणे व सुचना करणे टाळले पाहिजे.
नात्यात संवाद, स्वभाव आणि सत्यता असली तरी एकमेकांना पुरेसा वेळ देणे देखील फार गरजेचे आहे. पती-पत्नींच्या नात्यात पत्नींची नेहमीच तक्रार असते की, यांना माझ्यासाठी वेळच नाही. हल्ली पत्नीसुद्धा नोकरी करीत असल्याने ती देखील पतीला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. नोकरी सांभाळताना तिची ओढातान होत असते व मुलांना देखील वेळ देणे महत्त्वाचे असते. हे सगळं सांभाळताना तिची दमछाक होते व पतीला पुरेसा वेळ देणे जमत नाही. त्यामुळे आपण एकमेकांना किती वेळ देतो व गुणवत्तापूर्ण वेळ किती देतो (क्वालिटी टाईम) हे महत्त्वाचे आहे. एकमेकांसोबत काही गोष्टी जाणीवपूर्वक करायला लागलो, तर त्याचा नात्यावर सकारात्मक प्रभाव पडू लागेल. सकाळी उठल्यावर पती-पत्नी दोघांनी सोबतच व्यायाम करणे, मॉर्निंग वॉक किंवा जीममध्ये जाणे यामुळे एकमेकांना चांगला वेळ देता येतो. सोबतच आपल्या मुला-बाळांच्या संगोपनात पत्नीला मदत करणे, पत्नीच्या काही जबाबदार्‍या घेणे यामुळे देखील पत्नी सुखावते. हल्ली पुरुष हे करू लागतेत पण ते जाणीवपूर्वक करायला हवं. याशिवाय सायंकाळी पती-पत्नीने एकमेकांसोबत तसेच कुटूंबासह भोजन करणे आवश्यक आहे. यामुळे असं होत की, आपण परिवारातील सगळ्यांना वेळ देतो म्हणून पत्नीला वेगळा वेळ द्यायची गरज नाही, असा पुरुषांचा किंवा स्त्रियांचा समज होऊन जातो. मात्र, याव्यतिरिक्तसुद्धा एकमेकांसाठी वेगळा वेळ काढता आला पाहिजे. आपल्याकडे काय होत की, मुलांसोबत, सासू-सासर्‍यांसोबत आणि अन्य नातेवाईकांसोबत वेळ घालवला की, एकांत वेळ मिळणे कठीण होते. आणि जोही मिळतो तो बेडरुममध्येच...! मात्र, बेडरुममध्ये जो वेळ मिळतो, तो वेळ फक्त आणि फक्त घरातील लोकांच्या अथवा एकमेकांच्या तक्रारी सांगण्यातच जातो. त्यावेळी तक्रार विसरून जाणे हितावह असते. बेडरुममधील वेळ प्रेमळ असावा. रोमॅन्टिक व प्रणयातुर असणे आवश्यक आहे. एकमेकांशी बोलायचं असेल तर तक्रारी व चिंता वेगळा यासाठी वेळ काढून ठेवणे गरजेचे आहे. असा वेळ काढला तर कुठल्याही रागाशिवाय एकमेकांच्या बाजू समजून घेता येतील.
स्वभाव, संवाद, सत्यता आणि समय या चार सूत्रांवर आपल्या पुढील तीन सुत्रांची म्हणजेच आरोग्य, स्पर्श आणि संभोगाची गुंफण चांगल्या रीतीने  होऊ शकेल. यात एकमेकांचे स्वास्थ चांगले असेल आणि स्पर्शाची गुंफण केली तर विवाहाचा परमोच्च आनंद म्हणजे शारीरिक संबंधांची अत्युच्च पातळी गाठणे शक्य होऊन वैवाहिक सौख्य वृंद्धिंगत होईल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com