इनर इंजिनिअरिंग : स्व-अर्पण आणि स्वयंसेवा

योगाची संपूर्ण प्रक्रिया स्वत:लाच समर्पित करण्याबद्दल आहे. मी स्वतःलाच अर्पण करा असं म्हणतो, तेव्हा लोकांना कदाचित स्वतःला सहजपणे कसं द्यावं माहीत नसतं.
Sadguru
SadguruSakal

योगाची संपूर्ण प्रक्रिया स्वत:लाच समर्पित करण्याबद्दल आहे. मी स्वतःलाच अर्पण करा असं म्हणतो, तेव्हा लोकांना कदाचित स्वतःला सहजपणे कसं द्यावं माहीत नसतं. लोकांना स्वत:ला समर्पित करण्यासाठी काहीतरी माध्यमाची गरज असते. आयुष्यात इतरांना तुम्ही अनेक गोष्टी देऊ शकत असाल, तुम्ही पैसे देऊ शकता, तुम्ही अन्न देऊ शकता किंवा आणखीन काहीतरी देऊ शकता. मात्र, पण या सर्व गोष्टी ज्या तुम्ही देऊ करताय त्या खरे पाहता तुमच्या नाहीत, अगदी तुमचे शरीरसुद्धा! कारण ते तुम्ही धरती मातेकडून घेऊन गोळा केलेले आहे. शेवटी तुम्ही इथून जाताना ते परत करूनच जावे लागते. या शरीरातील एक पेशी सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकत नाही!

आज तुमच्याकडं जे आहे ते तुम्ही या धरतीकडून उसनं घेतलं आहे. ते खरोखर तुमचं नाही. तुम्ही ते वापरू शकता. त्याचा आनंद घेऊ शकता, पण खरोखर त्याच्यावर मालकी हक्क सांगू शकत नाही. तुम्हाला असं वाटतं, की हे घर तुमच्या मालकीचं आहे, तुमचे कपडे, तुमची मुलं, तुमचा पती, तुमची पत्नी, अगदी तुमच्या सभोवतालची माणसंसुद्धा आजकाल लोकांना वाटतं त्यांच्या मालकीची आहेत. पण यातलं खरोखर तुमच्या मालकीचं असं काहीच नाही. ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, तुम्ही त्यांचा आनंद घेऊ शकता, तुम्ही त्यांचा वापर करू शकता आणि जेव्हा तुम्हाला जावं लागतं तेव्हा तुम्हाला ते सोडून जावं लागणारच. तर इथं तुमचं असं काहीच नाही आणि जे तुमचं नाही ते तुम्ही देऊ शकत नाही.

म्हणून खरं पाहता, देण्याजोगं इथं काहीच नाही. मी काही घेतो आणि देतो जे इतर कुणाचं तरी आहे. अशा देण्याला काही अर्थ नाही, पण तरीही देण्यासाठी तुम्हाला एका माध्यमाची गरज पडते. मूलभूतपणे तुम्ही देऊ शकणारी एकुलती एक गोष्ट म्हणजे स्वतःला. पण स्वत:ला सहज कसं द्यायचं हे तुम्हाला माहीत नाही. म्हणून तुमच्या पैशांच्या, तुमच्या अन्नाच्या किंवा आणखी कशाच्या तरी माध्यमातून तुम्ही देता. एखादी गोष्ट तुम्ही देण्याचं माध्यम म्हणून वापरता, तुमची कार्य-कृती ही स्वतःला अर्पण करण्याचं माध्यम म्हणून वापरत आहात. जे काही तुम्ही देता, पण खरं पाहता केवळ एकच गोष्ट तुम्ही खरोखर देऊ शकता आणि ती म्हणजे स्वत:ला. तुम्हाला हे माहीत नसेल, तर देणं ही खूप मोठी अडचण होऊन जाते.

स्वत:ला अर्पण करण्यासाठी तुम्ही स्वतःला इच्छुक बनवलं नाही, तर ही देण्याची प्रक्रिया फार त्रासदायक होते. देणं म्हणजे फक्त एखादी वस्तू देणं, अशी तुमची समजूत असते, तेव्हा स्वाभाविकपणे तुमच्यात भीती निर्माण होईल. ‘‘जर मी सर्व काही दिले, तर माझे काय होईल?’’ लोक त्यांचं प्रेम, त्यांच्या आनंदाबाबतीत कंजूष झाले आहेत, कारण त्यांना देणं म्हणजे हे फक्त वस्तूंचं देणं असं वाटतं. आजच्या व्यावहारिक आर्थिक पद्धतीमुळं हळूहळू आपण कमी प्रेमळ, कमी आनंदी, अधिक अशांत झालो आहोत.

जे काही तुम्ही करता, केवळ त्याच माध्यमातून तुम्ही स्वतःला देऊ शकता. पण जोपर्यंत काही कृती होत नाही तोपर्यंत लोकांना स्वतःला कसं अर्पण करावं हे कळत नाही. त्यांना कृतीची गरज पडते; स्वतःला कशामध्ये तरी समरस होऊन समर्पित होण्यासाठी. म्हणून ‘स्वयंसेवा’ ही एक अशी प्रचंड शक्यता आहे, ज्याद्वारे तुम्ही स्वतःला अर्पण करू शकता. खरोखर तुम्ही स्वतःला तुमच्या कार्याद्वारे समर्पित करू शकता. तर स्वयंसेवा हा स्वतःला अर्पण करायची प्रक्रिया शिकण्याचा एक मार्ग आहे. स्वयंसेवक म्हणजे अशी व्यक्ती, जी इच्छुक आहे. फक्त हे किंवा ते करण्यासाठी नाही, तर ती सहज इच्छुक आहे, ती व्यक्ती एक मूर्तिमंत इच्छुकता बनली आहे. कोणत्याही मनुष्यात आध्यात्मिक प्रक्रिया तोपर्यंत घडणार नाही, जोपर्यंत ते इच्छुक बनत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com