इनर इंजिनिअरिंग : योग्य संगतीचे महत्त्व

आध्यात्मिक मार्गावर चालणारे साधक, जे वास्तविक आसक्त प्रवृत्तीतून जागरूकतेत येण्याच्या प्रक्रियेत आहेत.
Sadguru
Sadgurusakal
Summary

आध्यात्मिक मार्गावर चालणारे साधक, जे वास्तविक आसक्त प्रवृत्तीतून जागरूकतेत येण्याच्या प्रक्रियेत आहेत.

आध्यात्मिक मार्गावर चालणारे साधक, जे वास्तविक आसक्त प्रवृत्तीतून जागरूकतेत येण्याच्या प्रक्रियेत आहेत, त्यांना आसक्त सवयींमधे अडकलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहणे हानिकारक ठरू शकते का? सद्गुरू येथे संघ किंवा योग्य संगतीचे महत्त्व सांगत आहेत. माणसाने कशा प्रकारची संगत जोडावी?

प्रश्न - सद्गुरू, मी फ्लॅट शेअरिंग पद्धतीने राहतो आणि मी खूप काळ बाहेरगावी जाणार असल्यास माझी खोली लोकांना भाड्याने रहायला देतो. अनेक प्रकारची माणसे तिथे राहतात - एकदा एका मुलीला आणि काही जोडप्यांनाही अमली पदार्थांचे व्यसन लागले. मी विचार करतोय, की या गोष्टींचा माझ्यावर काही परिणाम होईल का? तुम्हाला काय वाटते याविषयी?

सद्गुरू - लोकांच्या सहवासाचा तुमच्यावर होणारा परिणाम कमी समजू नका. तुम्ही स्वत: मद्यपान करत नसाल किंवा अमली पदार्थ घेत नसाल तरी ते घेणाऱ्यांच्या सहवासाचा परिणाम एका वेगळ्याच पातळीवर होत असतो. गौतम बुद्धांनी परमसत्य, सत्याचा प्रसारक आणि संघ या तिन्ही गोष्टी एकसमान महत्त्वाच्या आहेत, असे म्हटले आहे. बुद्ध या बाबतीत सामाजिकदृष्ट्या बरोबर आहेत, पण अस्तित्वाच्या दृष्टीने योग्य नाही. खरे पाहता, सर्वांत मूलभूत गोष्ट संघ किंवा संगती असली पाहिजे, मग बुद्ध किंवा सत्याचे प्रसारक आणि मग धम्म किंवा परमसत्य. बहुतेक लोक जाणतेपणे किंवा अजाणतेपणे त्यांच्या संगतीच्या प्रभावाखाली घडतात. त्यांना याची कल्पनाही नसते की त्यांच्या संगतीचा प्रभाव किती खोलवर झालेला आहे ते. केवळ कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रच नव्हे तर एकूणच समाजाशी आलेला संबंध, या सर्वांचा प्रभाव पडतो. अजाण, अनावर स्वभावाच्या व्यक्तींच्या सहवासात असणे नक्कीच हितकारक नाही; विशेष करून जे व्यसनी म्हणून गणले जातात, मग ते व्यसन कसलेही असो.

आसक्त प्रवृत्तीतून जागरूकतेकडे वाटचाल

तुमचे सर्व प्रयत्न आसक्त प्रवृत्तीपासून मुक्त होऊन, जागरूकतेकडे जाण्याचा आहे. म्हणून अगदी आसक्त स्वभावाच्या व्यक्तींचा सहवास सहायक नाही. तुम्ही अजून अशा स्थितीत नाही की कशाही प्रकारच्या माणसांमध्ये वावराल आणि जागरूक आणि अविचलित राहाल. तुम्हालाही व्यसन लागू शकेल. सभोवतालच्या गोष्टींचा काहीच परिणाम होत नसता तर कोणी आश्रम बांधायचा खटाटोप कशाला केला असता? लोक त्यांच्या लहरी, कल्पना, त्यांच्या आवडीनिवडी येथे अमलात आणू पाहतात. येणारा प्रत्येकजण आपली काहीतरी छाप सोडायचा प्रयत्न करतो. काहीजण विचारून काही गोष्टी करायचा प्रयत्न करतात तर काही जण बिनदिक्कत करून मोकळे होतात. त्यांना तसं करण्यापासून रोखणे सोपे नाही. आश्रम उभारण्याचा उद्देशच एका अशा स्थळाची व्यवस्था राखण्याचा आहे जी एका विशिष्ट हेतूला समर्पित आहे.तुम्ही कुठेही राहिलात तरी तुम्ही ज्या उद्देशाने तिथे राहताय त्यादृष्टीने त्या जागेची व्यवस्था राखली गेली पाहिजे. तुमची स्वत:ची जागा तुमच्या ध्येयानुसार राखली गेली पाहिजे, इतरांच्या अनावर जीवन पद्धतीनुसार नव्हे. सध्या तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाऊ शकता. स्वत:विषयी अवास्तव कल्पना बाळगू नका!

योग्य व्यक्तींचा सहवास

आपल्यासाठी योग्य स्थानाची व्यवस्था करणे आणि गरज भासल्यास नकारात्मक प्रभावापासून दूर जाणे तुमच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे फक्त व्यसनी लोकांपासून दूर राहण्याबद्दल नाही, तर सर्व सर्व प्रकारच्या अतिरिक्त आसक्त प्रवृत्तींना टाळण्याबद्दल आहे. लोक आपल्या आसक्त प्रवृत्तींना पूर्णपणे वाहिलेले असतात. आजकाल तुम्ही ज्याला ‘नॉर्मल’ कुटुंब म्हणता त्याकडे जर बारकाईने पाहिल्यास तेथे नॉर्मल म्हणजे त्या घरातली मुले व्यसनी नाहीत, नवरा दारुडा नाही आणि बायकोला शॉपिंगचं व्यसन नाही - तरी ते ज्या प्रकारे जगतात, ते जागरूकतेच्या अगदी विरुद्ध आहे. बहुतेक लोक ज्या व्यक्तींच्या संगतीत राहतात त्याप्रकारे त्यांचे आयुष्य आकाराला येते. तरी संगतीचा प्रभाव व्यक्ती व्यक्तींवर कमी जास्त असू शकतो पण नक्कीच अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. आजच्या घडीला मी कोणाच्या सहवासात आहे याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. पण मी आज जसा आहे तो पूर्वी मी ज्या संगतीत होतो त्याचा परिणाम आहे. त्यावेळी जर मी चुकीच्या संगतीत गेलो असतो, तर आज गोष्टी नक्कीच वेगळ्याच असत्या. त्याकाळी मला जे लागू होते ते तुम्हाला आत्ता लागू आहे. तुमच्या विकासासाठी एक तर तुम्ही योग्य संगतीत राहिले पाहिजे किंवा चुकीची संगत कटाक्षाने टाळली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com