इनर इंजिनिअरिंग : जगण्यासाठीची मर-मर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Life

तुम्ही असे काहीतरी घडवत आहात, जे तुमच्या दृष्टीने खरोखर महत्त्वाचे आहे आणि ते करताना तुम्हाला मरण आले, तर ते ठीक आहे.

इनर इंजिनिअरिंग : जगण्यासाठीची मर-मर

तुम्ही असे काहीतरी घडवत आहात, जे तुमच्या दृष्टीने खरोखर महत्त्वाचे आहे आणि ते करताना तुम्हाला मरण आले, तर ते ठीक आहे. पण केवळ उपजीविकेसाठी तुम्ही काही करत आहात, जे तुमच्यासाठी महत्त्वाचे नाही आणि ते करता करता तुम्हाला मरण आले, तर ते मरण मूर्खपणाचे ठरेल.

मला आठवते हैदराबादमध्ये राहणारे एक गृहस्थ होते. मी त्या कुटुंबाला जवळून ओळखत होतो. त्यांच्या घरी राहत असताना मला जाणवत असे, की ते गृहस्थ किती त्रासलेले असायचे. एके दिवशी, मी त्यांच्या सततच्या धडपडीबद्दल काही विनोद केला, तेव्हा त्यांच्या पत्नीने म्हटले, ‘‘सद्‌गुरू, ते जगण्यासाठी अगदी मर-मर मरत आहेत.’’ मी म्हटले, ‘‘तुम्ही तुमच्या पतीला अगदी बरोबर ओळखले. ते जगण्यासाठी खरोखर मरत आहेत.’’ तुम्ही जिवंत आहात, म्हणजे तुम्ही मरणार तर आहातच. तुम्हाला जगण्यासाठी मर-मर करण्याची गरज नाही. तुम्हाला नुसते जगायचे आहे. कारण तुम्ही एक जीवन आहात. पण फक्त असे होते, की लोक अर्धवट जगतात किंवा जगण्यासाठी मरतात, जे की गरजेचे नाही. तुम्ही या जीवनाला पूर्णपणे सक्रिय होऊ दिले, कार्य करू दिले, तर ते खूप काही करू शकेल.

पण तुम्ही संपूर्ण आयुष्य उपजीविकेसाठी खर्च केले, तर ते थकवणारे आहे. तुम्ही २० तास, १० तास, ८ तास, किंवा ५ तास काम करा, तुम्ही थकून जाल, भले तुम्ही काहीही करत असाल. पण तुम्ही असे काहीतरी करता, जे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तेव्हा शरीर कदाचित थकेल, पण जीवन थकणार नाही, कारण तुम्ही सतत असे काहीतरी करत आहात, जे तुमच्यासाठी मोलाचे आहे. तुम्ही तुमच्या सुरक्षिततेसाठी ५ तास १० तास काम करा, ठीक आहे. पण तुम्ही जन्मभर फक्त सुरक्षिततेसाठी काम कराल, तर तुम्ही मृत्यूचा मागोवा घेत आहात. कारण मृत्यू ही एकच सुरक्षित गोष्ट आहे या विश्वात! जीवन कधीच सुरक्षित नसते. त्या बाईंच्या भाषेत सांगायचे, तर तुम्ही जगण्यासाठी मरत आहात. खरोखर त्या गृहस्थांचा काही वर्षांतच मृत्यू झाला.

कृपया हे लक्षात घ्या, की तुम्ही करणारे काम तुम्हाला मारत नाही. तुमच्या डोक्यात जो भरणा झाला आहे, तोच तुम्हाला मारत आहे. असे काहीतरी करा, जे तुमच्या दृष्टीने, आजूबाजूच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मग तुम्ही पाहाल की, एक अमर्याद बुद्धिमत्ता आणि ऊर्जा सतत प्रत्येक मनुष्यासाठी उपलब्ध आहे.

Web Title: Sadguru Writes Life

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :health newsLifeSadguru
go to top