'ही' लक्षणं असतील तर घोरण्याचा आजार असू शकतो...

प्राजक्ता निपसे
मंगळवार, 14 जुलै 2020

हा एक सहजपणे आढळणारा आजार आहे. यात श्वास घेताना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ती व्यक्ती श्वास लागल्यामुळे जागी होते.

पुणे : अनेकांच्या घोरण्याबाबत नेहमी चेष्टा करण्यात येते. जे मोठ्या आवाजात घोरतात, ते आपल्या सवयीबाबत नाराज  झालेले असतात. परंतु मोठय़ा आवाजात घोरल्याने दिवसा थकवाही येत असेल तर हे स्लीप अ‍ॅप्नियाचे लक्षण आहे. हा एक सहजपणे आढळणारा आजार आहे. यात श्वास घेताना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ती व्यक्ती श्वास लागल्यामुळे जागी होते. ज्यांना इतर आजार आहेत, त्यांना स्लीप अ‍ॅप्निया होण्याची जास्त शक्यता असते.

स्लीप अ‍ॅप्नियाची लक्षणे पुढीलप्रमाणे :

१ सकाळी डोके दुखणे, थकवा आल्यामुळे जागे होणे आणि दिवसा झोप येणे ही स्लीप अ‍ॅप्नियाची लक्षणे आहेत. या लक्षणांकडे दुर्लक्ष होण्याची खूप शक्यता असते, ही मोठी समस्या आहे. कारण या लक्षणांचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

२ त्यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो, तुमच्या मूडवर परिणाम होतो.  तसेच तुमच्या आरोग्यावर  विपरीत परिणाम होतो. या समस्येवर मात करण्याचे पहिले पाऊल म्हणजे घोरण्याने खजिल होऊ नये आणि स्लीप अ‍ॅप्नियाची लक्षणे ओळखण्यास शिकणे.

३ स्लीप अ‍ॅप्नियाच्या सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण केल्यास गंभीर प्रकारच्या स्लीप अ‍ॅप्नियाने ग्रासलेल्या आहेत. असे असूनही भारतभरात केवळ ३०० स्लीप लॅब्स उपलब्ध आहेत. या उलट अमेरिकेसारख्या देशात २५०० स्लीप लॅब आहेत.

हेही वाचा : ओमेगा-३ ने बनवू शकता उत्तम आरोग्य, कसे ते सविस्तर वाचाच ...

४ स्थूलपणा हे स्लीप अ‍ॅप्नियासाठी सर्वसामान्यपणे आढळणारे कारण आहे. हा विकार तोंड आणि घशातील सॉफ्ट टिश्युशी निगडित आहे. झोपताना घसा आणि जीभेचे स्नायू शिथिल झालेले असल्यामुळे चुकून हवेचा मार्ग बंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपमोड होऊ शकते.

५ एका पाहणीनुसार २००५ साली इतर विकार असलेल्यांची संख्या १४ दशलक्ष ते ११४ दशलक्ष होती आणि २०२० सालापर्यंत हा आकडा १३५ दशलक्ष ते १९० दशलक्षपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्थूलपणा हे विकार जडलेले असल्यास स्लीप अ‍ॅप्निया होण्याची अधिक शक्यता असते.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: slip apnia and its symptoms

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: