चेतना तरंग : माझ्या डोक्यातील छोटा राक्षस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री श्री रविशंकर

या अहंकाराची तर समस्याच आहे. माझ्या चांगल्या संवेदनांच्या मागे माझ्या मस्तकात लपून बसलेला एक राक्षस आहे तो. नेहमी काहीतरी गडबड करायची संधी शोधत असतो.

चेतना तरंग : माझ्या डोक्यातील छोटा राक्षस

या अहंकाराची तर समस्याच आहे. माझ्या चांगल्या संवेदनांच्या मागे माझ्या मस्तकात लपून बसलेला एक राक्षस आहे तो. नेहमी काहीतरी गडबड करायची संधी शोधत असतो. तो नेहमी स्वतःच बरोबर आहे, असे मानतो. तो योग्य आहे की नाही, हे महत्त्वाचे नसतेच, स्वतःलाच योग्य शाबीत करण्यासाठी तो काहीही करेल, कसलेही युक्तिवाद करेल, तर्काची मदत घेईल; आपली मैत्री, आपले स्नेहसंबंध, सर्वकाही पणाला लावेल; आपली मनःशांतीसुद्धा त्याग करेल. केवळ स्वतःस खरे पटवून देण्यासाठी.

पण या गोष्टीची मला जाणीव आहे, हे फायद्याचे आहे. लोकांना फसवून आपला फायदा करून घेणे, बिघडलेल्या मुलासारखे बालिश वागणे; आपल्यासारखेच दुसरे कुणी वागत असतानाही त्याच्यावर विनाकारण क्रोधीत होणे; आणि या गोष्टी मी करणे कसे योग्यच आहे हे समजावयाचा प्रयत्न जेव्हा हा छोटा सैतान करू पाहतो, तेव्हा मी मनात म्हणतो, ‘‘अच्छा, माझा अहंकार त्याचे नेहमीचे खेळ खेळत आहे!’’ पण मला त्यावेळी तसे म्हणावेसे वाटले तरच.

महत्त्वाचे हे, की माझ्याकडे हा पर्याय आहे. हा अहंकार माझ्याकडून वेगळीच अपेक्षा करतो. जसे, जीवन ही एक स्पर्धा आहे, जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी, असे मी मानावे. त्याच्या विविध खेळींवर मी काहीतरी प्रतिसाद द्यावा, काही त्यानुसार करावे, असे त्याला वाटते, पण मी मात्र त्यावर हसत राहतो. मी त्याच्या हातचे खेळणे बनून नाचत राहावे असे त्याला वाटते. पण मी ज्ञानाचा वापर करतो आणि त्याच्या खेळांवर प्रतिकार न करता, उलट केवळ निरीक्षण करतो आणि एककेंद्री राहातो. त्यामुळे कुठलेही कठीण प्रसंग आले तरी त्यांचा माझ्यावर विपरीत परिणाम होत नाही आणि मी धैर्याने त्यांना पार करतो.

‘योग्य’ आणि ‘अयोग्य’ या केवळ आपल्या मनाने धरलेल्या धारणा आहेत. माझ्या ह्रदयात असलेले अपार प्रेम हेच केवळ महत्त्वाचे आणि खरे आहे. या ज्ञानाच्या साहाय्याने, मी मुक्त आहे.