चेतना तरंग : स्वातंत्र्य आणि शिस्त

आपले स्वातंत्र्य सुरक्षित राहावे यासाठी संरक्षण दलांची आवश्यकता असते, पण संरक्षण दलात स्वातंत्र्य असते का? सैनिकांना कृतींचे स्वातंत्र्य असते का?
Army Parade
Army ParadeSakal

स्वातंत्र्य आणि शिस्त हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत, पण ते एकमेकास पूरकसुद्धा आहेत.

आपले स्वातंत्र्य सुरक्षित राहावे यासाठी संरक्षण दलांची आवश्यकता असते, पण संरक्षण दलात स्वातंत्र्य असते का? सैनिकांना कृतींचे स्वातंत्र्य असते का? नाही, त्यांच्यावर शिस्तीची आणि आज्ञा पाळण्याची बांधिलकी असते. डावा पाय पुढे घ्या असा आदेश दिला असता उजवा पाय पुढे घेण्याचीसुद्धा त्यांना मुभा नसते. त्यांचे प्रत्येक पाऊल बांधिल नियमांनुसार असते. नैसर्गिक सवयीने चालण्याचेसुद्धा स्वातंत्र्य नसते. संरक्षण दलात अजिबात स्वातंत्र्य असत नाही, पण हेच संरक्षण दल देशाचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवते!

शिस्तीशिवाय स्वातंत्र्य म्हणजे संरक्षणाशिवाय देश. शिस्त स्वातंत्र्याचे रक्षण करते. म्हणजेच स्वातंत्र्य आणि शिस्त एकावेळी असतात. हा नियम समजून घ्या आणि आयुष्याची यशस्वी वाटचाल करा. तुमच्यावरील काही जरुरी बंधनेच तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतात. तुम्ही स्वातंत्र्याकडे लक्ष द्या किंवा शिस्तीच्या बंधनांकडे; आणि मग तुम्ही आनंदी राहा अथवा दुःखी. कुंपणांची विशिष्ट जागा असते आणि प्रयोजन असते. तुमच्या संपूर्ण जमिनीवर सगळीकडे तुम्ही कुंपण बांधले, तर मग घर कुठे उभे कराल? पण तरीही योग्य जागी बांधलेले कुंपण तुमच्या मालमत्तेचे रक्षण करते. प्रेम तुम्हाला योग्य मार्गावर आणते, तसेच भयसुद्धा तुम्हाला भरकटण्यापासून वाचवते. हीच बाब सर्व धर्मांमध्ये वापरली गेली आहे. सदाचारासाठी धर्मानी तुमच्या मनात भय निर्माण केले आहे.

निसर्गसुद्धा बालकांमध्ये एका विशिष्ट वयात भय निर्माण करतो.

अतिशय कमी वयात मुलांमध्ये भय नावाची भावना नसते. त्या काळात त्याची शंभर टक्के देखभाल त्याची आई करीत असते, पण वयानुसार जसे ते बालक स्वतंत्र होऊ लागते, तसे निसर्ग त्याच्यामध्ये भयाची भावना निर्माण करतो. एक छोटे चिमूटभर भय. या भयामुळे ते बालक सावध होते. आपली स्वतःची काळजी घेऊ लागते. जसे बालकाला अधिक स्वातंत्र्य मिळत जाते, तसतसे ते अधिक काळजीपूर्वक आणि सावधपणे चालू व वागू लागते.

याशिवाय एक स्थिती संपूर्ण, अबाधित आणि अमर्याद स्वातंत्र्याची आहे, जिच्याबद्दल अद्वैताच्या तत्त्वज्ञानात चर्चा आहे. परंतु अद्वैताबद्दलचे ज्ञान विविध लोकांनी आपापल्या इच्छेनुसार, समजुतीनुसार आणि गरजेनुसार गैरपद्धतीने वापरले आहे. खरे तर आपणास खूप व्यावहारिक व्हायला हवे. आपल्या मनामध्ये स्वातंत्र्य हवे, हृदयात प्रेम हवे आणि आपल्या वर्तनात व कृत्यांमध्ये शिस्त हवी. स्वातंत्र्य गमवायच्या भीतीपोटी संरक्षण दल आणि शिस्त निर्माण झाली आहेत. आणि संरक्षण दलाचा हेतू हा स्वातंत्र्य अबाधित ठेवून भीती नाहीशी करण्याचा आहे.

अध्यात्माच्या या मार्गावर ज्ञान हेच तुमचे स्वातंत्र्य आहे आणि ज्ञान हेच तुमचे संरक्षक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com