esakal | कणखर देशा, निरोगी देशा, तरुणाईच्या देशा!

बोलून बातमी शोधा

habits and health

आपल्याला आरोग्य म्हटलं की सहसा बालमृत्यू, कुपोषण किंवा म्हातारवयात होणारे ह्रदयरोग, कर्करोग असे आजार डोळ्यापुढे येतात. हे विषय महत्त्वाचे आहेत यात शंकाच नाही, पण यासोबतच हे भान देखील ठेवणे आवश्यक आहे की, महाराष्ट्राची बहुतांश लोकसंख्या ही आता बाल अथवा वृद्ध या पैकी दोन्ही गटात नसून मुख्यत्वे १५ ते ४५ या गटात मोडणारी तरुण जनता आहे. हे समजून घेत राज्याचे आरोग्य जपावे लागेल.

कणखर देशा, निरोगी देशा, तरुणाईच्या देशा!
sakal_logo
By
अमृत बंग

तरुणांच्या मृत्यूची प्रामुख्याने तीन कारणे आहेत त्यात आत्महत्या, व्यसनाधीनता आणि अपघात यांचा समावेश होतो. आरोग्यदायी जगायचे असल्यास या सर्वांचा विचार करून त्यावर मात करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी रोग झाल्यावर योग्य उपचार करणे हे तर गरजेचे आहेच; पण मुळात हे रोग होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक आणि आरोग्य संवर्धन करणारे उपाय योजायला हवेत. सध्याचे कोरोनाचे महातांडव वगळता वरील सर्व रोग व त्यामुळे होणारे मृत्यू याला कोणतेही जिवाणू अथवा विषाणू कारणीभूत नाही. याचे मूळ व्यक्तीच्या व एकूण समाजाच्या जीवनशैलीमध्ये आहे. म्हणून त्याबाबत देखील पुनर्विचार करणे आणि जगण्याविषयीच्या काही मनोशास्त्रीय संकल्पना, मूल्य, अपेक्षा - आकांक्षा, व्यवहार, पद्धती व व्यवस्थाप्रणाली बदलणे हे देखील गरजेचे आहे.

आत्महत्येची शोकांतिका

मानवी जगण्यातील सर्वात मोठ्या शोकांतिकांपैकी एक म्हणजे आत्महत्या. कुठल्याही व्यक्तीला आणि विशेषतः: तरुण व्यक्तीला स्वत:चे आयुष्य नकोसे का व्हावे? त्यामागे जी न्युरोकेमिकल कारणे असतील ती तर आहेतच पण सोबतच “यशस्वी” बनणे याविषयीच्या अवास्तव अपेक्षा, वाढती वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, सततचा ताण, जीवघेणी स्पर्धात्मक वृत्ती, एकटेपणा, स्वकेंद्री झाल्यामुळे अनुभवावी लागणारी कुचंबणा व घुसमटलेपण, मूल्यात्मक निकषांऐवजी भौतिक गोष्टींवर आधारित जीवनाचे मोजमाप करण्याची सवय, संपत चालले नातेसंबंध, क्षमताविकासाच्या व रोजगाराच्या पुरेशा संधी नसणे, स्वपलीकडील एखाद्या अर्थपूर्ण ध्येयाशी जोडले न गेल्यामुळे आयुष्यात नसणारी सार्थकतेची अनुभूती, अशी अनेक कारणे आहेत.

हेही वाचा: योगा लाईफस्टाईल : कोष : शारीरिक आणि मानसिक आरोग्य

आत्महत्या करावीशी वाटणाऱ्या लोकांवर मानसोपचार करणे गरजेचे. या व्यापक समस्येवरील उत्तर देखील शोधणे आवश्यक आहे. तसेच जे लोक आत्महत्येचा विचार अथवा तशी कृती करताहेत ते तर त्रस्त आहेत; पण इतर सर्वांचे सगळे काही आलबेल चालू आहे असे देखील नाही. ते पूर्णांशाने परिपूर्ण स्थितीत आहेत असे नाही. त्यामुळे या अशा मोठ्या गटाला त्यांच्या निकोप वाढीसाठी आणि सकारात्मक, समाधानकारक व आरोग्यदायी जगण्यासाठी मदत करणारी व्यवस्था आणि सामाजिक प्रक्रिया आपल्याला आवश्यक आहेत. मानसिक वा शारीरिक आजारांचा निव्वळ अभाव म्हणजे आपोआप निकोप व निरोगी वाढ असा अर्थ होत नाही. त्यातून फक्त इतकेच कळते, की आपण अक्षाच्या ऋण बाजूला नाही आहोत तर शून्य बिंदूवर आहोत. अक्षाच्या धन बाजूला, सकारात्मक वाढीसाठीच्या अगणित शक्यता आहेत आणि त्या शक्यतांना वास्तवात आणणे ही युवा पिढी आणि अन्य घटकांची जबाबदारी आहे.

मद्याचे विषप्रयोग थांबावेत

यासंदर्भात साहाय्यभूत ठरेल असे एक “निर्माण युथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क” आम्ही विकसित केले असून ते ‘निर्माण’च्या संकेतस्थळावर बघता येईल.

‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिजेस’ या जगातील सार्वजनिक आरोग्याच्या सर्वात मोठ्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ‘‘ तंबाखू आणि दारू हे रोगनिर्मितीचे मोठे घटक आहेत. भारतीय दारुडे हे जीवनवर्षे गमावण्याच्या बाबतीत जगात सर्वांत आघाडीवर आहेत, असे ‘जागतिक आरोग्य संघटना’ म्हणते. दारूमुळे व्यक्ती, कुटुंबावर आणि समाजावर असंख्य दुष्परिणाम तर होतातच;त्याचबरोबर अपघात वगुन्हेगारीही वाढते. ‘दारू कंपन्या या पद्धतशीरपणे युवकांना ग्राहक बनविण्याचा प्रयत्न करतात, याचे कारण त्यातून त्यांना लांब पल्ल्याची खपाची हमी मिळते. महाराष्ट्रात दरवर्षी किमान ५० हजार कोटी रुपयांची दारू खपते. यावर उत्तरोत्तर मर्यादा आणणे, दारूला असलेले फुकाचे ग्लॅमर व समाजमान्यता कमी करणे, विशेषत: १५ ते ४५ वर्षे वयातील लोकांना व्यसनाला बळी पडण्यापासून वाचविणे आणि व्यसनाधीनांवर उपचार करणे हे राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत होऊ देता कामा नये.

हे करावे लागेल

  • शहरीकरणाच्या दुष्परिणामांपासून बचाव.

  • प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी व्यापक उपाययोजना.

  • वैयक्तिक जीवनशैलीत आमूलाग्र बदल.

  • ग्राहक म्हणूनही देखील प्रत्येकाने संयम बाळगावा

  • प्रत्येक शहरात ‘ग्रीन कम्युनिटी पार्क’ उभारावे

  • सामान्यांचा सहभाग हवा

हेही वाचा: हेल्दी फूड : लॉकडाउनमधील वजनातील वाढ आणि आरोग्य

महाराष्ट्राच्या निकोप भविष्यासाठी सुरळीत चालणारी शासकीय व खासगी आरोग्यव्यवस्था तसेच उत्तरोत्तर वाढणारे आरोग्यशास्त्र (मेडिकल सायन्स) यांची तर आवश्यकता आहेच; पण अनेक अशा गोष्टी करणे गरजेचे आहे, ज्या या नेहमीच्या वर्तुळाबाहेरील आहेत आणि जिथे सर्वसामान्य लोक मोठी भूमिका बजावू शकतात. मला व्यक्तिशः हे विकेंद्रीकरण फार आश्वासक व जनमानसाचे सक्षमीकरण करण्याची असलेली संधी वाटते. त्यानुषंगाने हा देखील विचार करणे आवश्‍यक ठरते की, राज्याच्या आरोग्यव्यवस्थेला बळकट करण्यासाठी तरुण काय भूमिका बजावू शकतात? त्यांना निव्वळ ‘घेणारे (रिसिव्हर्स)’ बनून चालणार नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर बनून बाहेर पडणाऱ्या युवकांनी विविध भागांत जाऊन सेवा देणे असो किंवा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी उपयोजित तंत्रज्ञानाचे संशोधन करणे व त्याद्वारे भातशेतीत रोवणी करणा-या महिलांचे वा हमालांचे कष्ट व अंगदुखी कमी करणे असो, किंवा फायनान्सच्या पदवीधरांनी लोकांचे आरोग्यविषयक खर्चाचे योग्य नियोजन करण्यासाठी मदत करणे असो, अशा अनेक नावीन्यपूर्ण कल्पनांवर काम करणे व स्वत:चे प्रत्यक्ष योगदान देणे हे उत्तम होईल. तरुण वर्ग हाच प्रामुख्याने महाराष्ट्राचे भवितव्य निर्धारित करणार असल्याने या वर्गाचे स्वत:चे भवितव्य हे आरोग्यदायी असणे व त्यांना इतरांना हातभार लावणे आवश्यक आहे.

लेखक निर्माण- सर्च, गडचिरोली, येथे प्रकल्पप्रमुख आहेत.

– www.nirman.mkcl.org, www.searchforhealth.ngo