आनंद दुसऱ्यांसाठीही धावण्याचा (Sunday स्पेशल)

मेघ ठकार
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील प्रमुख मॅरेथॉन

 • पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन
 • मुंबई मॅरेथॉन
 • वसई विरार मॅरेथॉन
 • सातारा हिल मॅरेथॉन
 • पवई हाफ मॅरेथॉन
 • ठाणे हाफ मॅरेथॉन
 • औरंगाबाद हेरिटेज हाफ मॅरेथॉन
 • पीआरबीएम मॅरेथॉन
 • सोलापूर मॅरेथॉन
 • नागपूर सिटी मॅरेथॉन
 • खानदेश मॅरेथॉन
 • बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन

फिटनेस - प्रत्येकाला हवा असतो अन्‌ मनाला भरारी घ्यायला उभारी देणारा शब्द. हिवाळ्यात तर त्यासाठी प्रत्येक जण आहार-विहारापासून ते व्यायामापर्यंत काही ना काही करतोच. या काळातील मॅरेथॉन प्रत्येकालाच खुणावत असते. पुण्यातल्याच मेघ ठकारने बर्थडे हॅपीवाला ठरावा म्हणून स्पर्धेच्या वयोमर्यादेच्या पहिल्याच दिवशी, अठराव्या वर्षाच्या पदार्पणातच अमेरिकेत ‘आयर्नमॅन’ पूर्ण केली. तेव्हापासून एका वर्षाच्या कालावधीत तो स्वतःबरोबरच दुसऱ्यांसाठीही धावला. आपल्या अनुभवाचा इतरांना फायदा व्हावा म्हणून पुढाकार घेतला. येत्या २२ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन’निमित्त त्याने धावण्याविषयी केलेले भाष्य...

गेल्या वर्षी १४ ऑक्‍टोबर रोजी मी अमेरिकेतील लुईव्हीलमधील फुल आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करीत अठरावा वाढदिवस साजरा केला. फुल आयर्नमॅनसाठी १८ वयोमर्यादा आहे. त्याच दिवशी मी ही कामगिरी केली. त्यामुळे मी सर्वांत कमी वयाचा (अर्थातच नियमानुसार) आयर्नमॅन बनण्याचा विश्वविक्रम केला, ज्याची केवळ बरोबरी होऊ शकते. जगात अशी कामगिरी केलेले काही निवडक स्पर्धक आहेत. मला विक्रमाचा अभिमान आहेच; पण त्याहीपेक्षा या यशानंतर वर्षभरात माझे आयुष्य समूळ बदलले, जे जास्त आनंददायक ठरले आहे.

तेव्हापासून मी मुंबई मॅरेथॉन, पुण्यातील दोन हाफ मॅरेथॉन, सातारा हिल हाफ मॅरेथॉन आणि अलिकडेच गोव्यात झालेली भारतातील पहिलीवहिली आयर्नमॅन पूर्ण केली. गेल्या वर्षी मी थेट अमेरिकेत जाऊन कमालीच्या आव्हानात्मक आयर्नमॅन शर्यतीत यशस्वी झालो तरी वडीलांना, ‘तुम्हाला काही कळते का? इतक्‍या लहान वयात का पाठवले मुलाला?’ असे विचारणारी मंडळी होती. आता तीच मंडळी टीप्ससाठी माझ्याशी संपर्क साधत असतात. मी त्यांना माझे अनुभव सांगतो.

मी मूळचा जलतरणपटू आणि ते माझे बलस्थान आहे. प्रामुख्याने पोहण्याचा टप्पाच आणि त्यातही तो समुद्रात असेल; तर तेथेच जास्त कस, पर्यायाने जास्त दम लागतो. धावणे आणि सायकलिंग तुलनेने अंतर जास्त असले; तरी सोपे जाऊ शकते, असे माझे मत आहे. मी फिजिओथेरपीची पदवी घेतो आहे. त्या माहितीचाही मला फायदा होतोच होतो.

आयर्नमॅन ते आयर्नमॅन या वर्षभरातल्या वाटचालीने मला काय दिले? असे आता तुम्ही विचाराल. तर, त्याचे उत्तर एकच आणि ते म्हणजे तुम्ही स्वतःसाठी काहीतरी साध्य केल्याची भावना, जी विलक्षण समाधान देते.
मॅरेथॉनचे असे असते की, तुम्ही ४२ किलोमीटरच धावले पाहिजे, असे नाही. प्रत्येक धावपटूचे लक्ष्य वेगवेगळे असते. कुणाला शर्यत पूर्ण करायची असते, कुणाचा वेळेवर भर असतो, कुणी आधी केलेल्या वेळेच्या तुलनेत कामगिरी उंचाविण्याच्या उद्देशाने धावतो, कुणी प्रथमच धावत असेल, तर त्याला फक्त आणि फक्त फिनीश लाइन दिसत असते. मुख्य मुद्दा असा, की कुणी दहा किलोमीटर धावत असतो, तर दुसऱ्याची हाफ मॅरेथॉन असते, तर आणखी काही जण फुल मॅरेथॉन करीत असतात.

या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सराव करीत असतो. त्याने वेळापत्रक आखलेले असते. ते तो काटेकोरपणे पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. तुम्ही एकदा लक्ष्य निश्‍चित केले; म्हणजे त्यानुसार सराव करण्यावर लक्ष केंद्रित करू शकता.

स्पर्धेच्या ठिकाणानुसार लक्ष्य
ही झाली प्रत्यक्ष शर्यतीपूर्वीची समीकरणे. ती आखताना धावपटू शर्यतीचे ठिकाण, तेथील वातावरण, हवामान, मार्ग असे अनेक मुद्दे विचारात घेतो. उदाहरणार्थ, मुंबईतील हवामान दमट असल्यामुळे घाम यायचे प्रमाण जास्त असते. तर, सातारा हिल मॅरेथॉनच्या वेळी हवामान तुलनेने जास्त अनुकूल असते. त्यामुळे मुंबईसाठी एखाद्याने हाफ मॅरेथॉन तीन तासांत पूर्ण करायचे ठरविले, तर साताऱ्यासाठी तो हीच वेळ १५ मिनिटांनी कमी असावी म्हणून प्रयत्नशील राहतो. मग मुंबईतील शर्यत तो निवांत धावतो.

होम ट्रॅकचा फायदा
मॅरेथॉनबाबतीत आपण पुणेकर फार सुदैवी आहोत. आपल्याकडे हिवाळा सुरू झाला, की आठवड्याला किमान एक शर्यत होते. तुम्ही जेथे राहता त्या शहरातील वातावरण, हवामानाला तुम्ही सरावलेले असता. होम ट्रॅकवर तुम्ही सराव करू शकता. त्यानुसार तुम्ही नियोजन करता.

एकच मंत्र कीप गोइंग
केलेले नियोजन प्रत्यक्ष शर्यतीत अमलात आणणे, हे तुमच्यासमोरील मुख्य आव्हान असते. ते किती सोपे नसते, याची कल्पना तुम्ही करू शकता. धावण्यास सुरुवात केली, की तुम्हाला त्याची जाणीव होते. अनेक वेळा तुम्हाला ४२ पैकी २८-३० किलोमीटर झाल्यावर दमल्यासारखे होते. खरे तर तेव्हा तुम्ही निम्म्यापेक्षा जास्त अंतर धावलेले असता.

मला पहिल्याच आयर्नमॅनमध्ये आलेला अनुभव सांगतो. तेव्हा आपला पुणेकर आशिष कासोदेकर मला शर्यतीला जाण्यापूर्वी पुण्यात भेटला. त्याने मला तिरंगा दिला. तो म्हणाला की, जेव्हा तुला थांबावेसे वाटेल तेव्हा तिरंगा बघ, तुला आपोआप प्रेरणा मिळेल. पाऊस, वारा, अशा प्रतिकूल परिस्थितीतही मी पहिल्या प्रयत्नात आयर्नमॅन होऊ शकलो, ते त्यामुळेच.

शंभर टक्‍क्‍यांवर आनंद
स्वतःच्या कामगिरीबरोबर मला दुसऱ्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचेही समाधान लाभले. माझे फिटनेस कोच विजय गायकवाड यांच्यासाठी लोणीमधील १०० किलोमीटर शर्यतीमधील शेवटचे २५ किलोमीटर मी पेसर होतो. तो टप्पा सुरू झाला तेव्हा अंधार पडला होता. हेडटॉर्च लावून आम्ही धावत होतो. त्यांच्या तुलनेत मी ७५ किलोमीटर कमी धावलो. पण, त्यांचे शंभर किलोमीटर पूर्ण झाले म्हणून मला झालेला आनंद शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त होता.

गेल्या वर्षी ‘बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन’च्या वेळी दीपक जगताप यांच्यासाठी पेसर होतो. त्यांनी दोन तासांचे लक्ष्य ठेवलेले होते. त्यांना दोनच मिनिटे जास्त लागली. शेवटचे काही अंतर मी त्यांना बरेच पुश केले. पण, त्यांनी स्वतःला ताणले नाही. ते प्रयत्नांत कुठेही कमी पडले नव्हते आणि त्यासाठी मी माझ्या परीने हातभार लावला. त्यामुळे ठरवलेली वेळ साध्य झाली, तरी तेव्हाचा आनंदही कमी नव्हता.

शुभेच्छा, धावण्यासाठी तुम्हालापण...
गेल्या वर्षी ‘सकाळ माध्यम समूहा’ने आरोग्य दिन घोषित करून आयोजित केलेला हा उपक्रम काळाची गरज आहे, असे मी म्हणेन. ८ डिसेंबर २०१८ रोजी अनेक जण प्रथमच धावले. त्यांचे वयोगट वेगवेगळे होते. अशी स्पर्धा तुम्हाला खूप काही देऊ शकते. पण, त्यासाठी तुम्ही संघटित होऊन तयारी केली पाहिजे. यंदाही येत्या २२ डिसेंबर रोजी तुम्ही धावावे म्हणून शुभेच्छा. तुम्ही आजपासून तयारी केली, तरी दहा किलोमीटर अंतर धावू शकाल, याची खात्री मी देतो.

(शब्दांकन - मुकुंद पोतदार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunday special megh thakar