काय आहे डिजीटल आय स्ट्रेन? जाणून घ्या त्यावरील सोपे उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eye

सध्या बहुतेक लोकं वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातूनच काम करीत आहेत. सतत कॉम्प्युटर स्क्रीन आणि लॅपटॉपच्या समोर बसून डोळ्यांना जडपणा जाणवू लागतो आणि डोळ्यांची जळजळ होऊ लागते, तसेच डोळ्यातून पाणी देखील येतं. जास्त काळ मोबाईल हाताळल्यानंतरही या सर्व समस्यांना सामोरे जावं लागतं.

काय आहे डिजीटल आय स्ट्रेन? जाणून घ्या त्यावरील सोपे उपाय

नागपूर : जे लोक दररोज लॅपटॉप, कॉम्‍प्युटर, मोबाइल 2 तासांपेक्षा जास्त हाताळत आहेत अशा लोकांच्या डोळ्यांच्या स्नायूंवर ताण पडतो आणि दृष्टी क्षीण होते. याच बरोबर अजून दुसऱ्या प्रकारचे त्रासपण उद्भवू लागतात. अशापैकी एक त्रास आहे 'डिजीटल आय स्ट्रेन'.

लक्षण
अंधुक दृष्टी, डोळ्यांवर सूज येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज येणे. अशी याची लक्षणं दिसून येतात. त्या शिवाय मान आणि खांद्यामध्ये वेदना पण जाणवते.
सध्या बहुतेक लोकं वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातूनच काम करीत आहेत. सतत कॉम्प्युटर स्क्रीन आणि लॅपटॉपच्या समोर बसून डोळ्यांना जडपणा जाणवू लागतो आणि डोळ्यांची जळजळ होऊ लागते, तसेच डोळ्यातून पाणी देखील येतं. जास्त काळ मोबाईल हाताळल्यानंतरही या सर्व समस्यांना सामोरे जावं लागतं.


प्रतिबंध
या सर्व उपकरणांपासून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांना त्रास होतो. इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर काम करताना अंधार नसावा. भरपूर उजेड असावा. आजच्या काळात असे काही चष्मे येतात जे तीक्ष्ण प्रकाशाची तीव्रता कमी करतात. अशा चष्म्यांचा वापर करावा. डोळे आणि उपकरणांच्या दरम्यान किमान एका फुटाचे अंतर असायला हवे. जेथे काम करीत आहात तेथे प्रकाशाची संरचना व्यवस्थित आणि डोळ्यांच्या अनुरूप असावी. अश्या स्थळी LED लाइट्सचा वापर करावा.

कॉम्‍प्युटर वर काम करताना टेबलं लॅम्पचा वापर करावा. असे केल्यास कॉम्प्युटरच्या मॉनिटरचा प्रकाश मंदावतो आणि डोळ्याला त्रास होत नाही. लॅपटॉपवर काम करताना त्याच्या स्क्रीनवर स्क्रीनगार्ड लावून घ्यावे. जेणे करून आपल्या डोळ्यांना काही इजा होणार नाही. झोपण्याचा अर्धा तास आधी सर्व डिजीटल उपकरणे बंद करून ठेवावी. मोबाईल फोन रात्री आपल्यापासून लांबच ठेवावा
वर्षातून एकदा तरी डोळ्यांची तपासणी अवश्य करून घ्यावी.
काही सोपे उपाय करुन डोळ्यांची काळजी घेता येईल-

डोळ्यांवर तळहात ठेवा
सुखसनात बसा. तळहात एकमेकांवर चोळा जेणेकरून उष्णता जाणवेल. आता डोळे बंद करा आणि तळहात डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांना उष्णता जाणवेल. तळहात थंड झाल्यावर ही क्रिया पुन्हा करा. असे आपल्याला किमान ३ वेळा करायचे आहे.

उजवीकडे डावीकडे बघणे
पाय लांब करून बसा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत पसरवा. मूठ बंद करा, अंगठा वरील बाजूस करा. डोके स्थिर करा. आता डोळ्यांनी आधी डावा अंगठा बघा, नंतर दृष्टी नाकाच्या मध्य भागी आणा. यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्यावर दृष्टी लावा नंतर नाकाच्या मध्यभागी आणा. ही क्रिया किमान १० ते १५ वेळा आवश्यकतेनुसार करा आणि डोळ्यांना काही काळ विश्रांती द्या.

समोर आणि उजवी-डावीकडे बघा
खांद्यांच्या समांतर डावा हात डोळ्यांच्या समोर आणि उजवा हात उजवीकडे घेऊन जा. खांद्याच्या उंचीच्या बरोबर अंगठा बाहेर काढून मूठ बंद करून स्थिर ठेवा. आता डोकं न हालवता समोरच्या अंगठ्याकडे बघा नंतर उजव्या अंगठ्याकडे बघा. असे १० ते १५ वेळा करा. आणि हातांची स्थिती बदलून डावा हात डावीकडे आणि उजवा हात पुढील बाजूस करा आणि डोळ्यांना विश्रांती द्या.

दृष्टी जवळ लांब करा
आरामशीर बसा. उजवा हात खांद्याच्या सरळ उचलून समोरच्या बाजूने ओढून धरा. मूठ बंद करा, अंगठा बाहेर बाजूस वर ठेवा. नजर अंगठ्यावर स्थिर करा हळुवारपणे अंगठा जवळ घेत नाकाला स्पर्श करा आणि पुन्हा लांब नेत हात ताणून धरा. परत अंगठ्याला नाकाजवळ घ्या. अशा प्रकारे ही क्रिया ५ वेळा करा.

त्याच बरोबर सकाळी उठल्यावर तोंड धुताना आपल्या तोंडात पाणी भरून ठेवा आणि डोळे उघडून पाण्याचे शिंतोडे मारा. असे १-२ वेळा करावे. नंतर तोंडातून पाणी काढून तळहात डोळ्यांच्या वर ठेवा.

* प्रत्येक 20 मिनिटांनी किमान 20 सेकंदासाठी डोळे बंद करावे. याने डोळ्यांना आराम मिळतो.

* सतत स्क्रीनवर टक लावून बघू नये. काम करताना पापण्या बंद करण्याची आवृत्ती कमी होते जे योग्य नाही. स्क्रीन वर बघताना देखील सतत पापण्या बंद करण्याची सवय लावावी.

* नजर कमजोर असल्यास नियमित डोळ्यांचा व्यायाम करा. डोळ्यांची पुतळी उजवी ते डावी आणि वरून खाली फिरवा.
* आपला अंगठा भुवयांच्या मधोमध ठेवून काही काळ डोळ्यांना त्या बिंदूवर केंद्रित करा.
* दिव्याच्या ज्योतीकडे एकटक बघत राहण्याच्या प्रक्रियेला त्राटक असं म्हणतात. याने दृष्टीत सुधार होतो आणि एकाग्रताही वाढते.

* गाजर खाणे किंवा गाजराचा रस पिणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. याचे सेवन नियमित केल्याने फरक जाणवेल.
* डोळ्यांचे स्नायू स्वस्थ ठेवण्यासाठी डोळ्यांचा मसाज आवश्यक आहे. विटामिन इ युक्त तेल किंवा क्रीमने दररोज डोळ्यांची मसाज करा. यासाठी कोरफडही वापरू शकता.

सविस्तर वाचा -  समजू नका मुलींना भार; प्रत्येक राज्यात ‘तिच्या’साठी आहे काही खास, जाणून घ्या विविध योजनांबाबत

* अंघोळ करताना डोळे कोमट पाण्याने स्वच्छ करा. थोड्या-थोड्या दिवसाने डोळ्यात गुलाब पाणी घाला.

* झोपण्याआधी डोळ्यातून लेन्स काढून ठेवावे. झोपण्याच्या 2 तासाआधी पासून कॉम्प्युटरवर काम करणे थांबवावे.
* सकाळी बागेत हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चाला.

संपादन  - स्वाती हुद्दार

loading image
go to top