आहार‘मूल्य’ : स्वतःवर प्रेम करताना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Healthy Food

आत्ताच झालेला प्रेमाचा दिवस आणि लव्ह इज इन एअर हे आपण अनुभवत आहोत. असे म्हणतात, की दुसऱ्याला देण्यासाठी आधी आपल्याकडे असणे गरजेचे असते.

आहार‘मूल्य’ : स्वतःवर प्रेम करताना!

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

आत्ताच झालेला प्रेमाचा दिवस आणि लव्ह इज इन एअर हे आपण अनुभवत आहोत. असे म्हणतात, की दुसऱ्याला देण्यासाठी आधी आपल्याकडे असणे गरजेचे असते. त्यामुळे दुसऱ्यांवर प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करणे अत्यंत गरजेचे असते. प्रेम करताना आपण आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची हेळसांड करतच असतो. त्यात चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, ताण-तणाव, मद्यपान, धूम्रपान इत्यादी सवयी, रोगप्रतिबंधक शक्तीचा अभाव या सर्व गोष्टीमुळे आपले आरोग्य धोक्यात येते आणि आपल्या नकळतच आपण स्वतःला कमी लेखतो, स्वतःविषयी प्रश्न निर्माण करतो, स्वतःवर प्रेम करणे विसरतो आणि खालील आरोग्याविषयक तक्रारींना सुरवात होते. उदाहरणार्थ, वजन अचानक वाढणे/कमी होणे, केस गळणे, त्वचेचा पोत बदलणे, अतिरिक्त विचार करणे, ताण, नैराश्य, गोड/ चटपटीत खावेसे वाटणे, इन्शुलिन हार्मोनला विरोध होणे, रक्तक्षय, सतत झोप येणे, रात्रीची झोप कमी होणे इत्यादी.

अशी ही यादी न संपणारी होते. त्यामुळे स्वतःवर प्रेम करणे ही काळाची गरज आहे, हे ओळखले पाहिजे. पाडगावकर म्हणतात तसे, ‘या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ आणि ते करत असताना त्याला जोड म्हणून जीवनशैलीमध्ये बदल करावेत. प्रामुख्याने...

१) शरीराचे घड्याळ उत्तम चालण्यासाठी वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा.

२) उठल्यावर सकाळी दहा मिनिटे ध्यान व श्वसनाचे व्यायाम करावेत.

३) दिवसाची सुरवात करताना सुकामेवा अथवा फळाने करावी. चहा किंवा कॉफीसारखी पेये टाळावीत.

४) शारीरिक हालचालींबरोबरच स्नायूंची ताकद व सहनशक्ती, लवचिकता, फुफ्फुसांची आणि हृदयाची ताकद वाढवणारे व्यायाम अशा विविध व्यायामाच्या प्रकारांचा समावेश दररोज करावा.

५) व्यायामानंतर प्रथिनयुक्त आहार म्हणजे दूध, पनीर, टोफू, अंड्यातले पांढरे, मोड आलेली कडधान्ये वाफवून त्यांचा वापर करून स्नायूंची झालेली झीज भरून काढावी.

६) आहारामध्ये विविध रंगाच्या भाज्या आणि फळांचा समावेश करावा.

७) दिवसभरात दोन वेळेस कच्ची भाजी सॅलड, कोशिंबीर, रायता इत्यादी स्वरूपात घ्यावी.

८) आहारातून मीठ, साखर, तेल-तूप, वनस्पती तूपयुक्त, मैदायुक्त पदार्थांचा वापर टाळावा.

९) जेवताना प्रत्येक घास व्यवस्थित चावून नंतर गिळावा. त्यामुळे पचन सुसह्य होईल. जेवताना टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटरचा वापर टाळावा.

१०) पाण्याचे प्रमाण दिवसभरात किमान दहा-बारा ग्लास असावे. त्याचबरोबर सूप, ताक, नारळपाणी, लिंबूपाणी यांसारखी पेये आहारात असावीत.

हे आहारातील व जीवनशैलीतील बदल सकारात्मक बदल नक्कीच घडवतील. या बदलांमुळे आरोग्याच्या, झोपेच्या तक्रारी, शारीरिक तक्रारी कमी होण्यास मदत होईल.

स्वतःवर प्रेम निर्माण होण्यासाठी...

  • सकाळी उठल्यावर कृतज्ञता व्यक्त करा.

  • आरशात बघून स्वतःलाच कॉम्प्लिमेंट द्या.

  • सकारात्मक विचार करा.

  • स्वतःचे ‘इकिगाई’ शोधा.

  • बागकाम, पाळीव प्राणी यांच्याबरोबर थोडा वेळ घालवा.

  • स्वतःतील वैगुण्ये ओळखून त्यात सुधारणा करा.

  • चांगली पुस्तके, सिनेमे, नाटक यांसारख्या मनोरंजनाच्या गोष्टीचा आस्वाद घ्या.

  • स्वतःमधल्या चांगल्या बदलांना स्वतःच शाबासकी द्या.

  • व्यायाम, चांगले ताजे सकस अन्नपदार्थ यावर भर द्या.

  • वेगवेगळे छंद जोपासा. त्यातून निखळ आनंद मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहा.

टॅग्स :diet planhealth