उन्हाळ्यात या गोष्टींचा आहारात करा समावेश, तज्ज्ञांनी दिला सल्ला | summer health tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उन्हाळ्यात  या गोष्टींचा आहारात करा समावेश, तज्ज्ञांनी दिला सल्ला

गुढीपाडव्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरवात होते. अंगावर येणारा घाम, भूक मंदावणे, सतत तहान तहान होणे, थकवा, अशक्तपणा त्यामुळे आपला आहार कमी होतो व आपली रोगप्रतिबंधक शक्ती मंदावते.

उन्हाळ्यात या गोष्टींचा आहारात करा समावेश, तज्ज्ञांनी दिला सल्ला

अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

गुढीपाडव्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरवात होते. अंगावर येणारा घाम, भूक मंदावणे, सतत तहान तहान होणे, थकवा, अशक्तपणा त्यामुळे आपला आहार कमी होतो व आपली रोगप्रतिबंधक शक्ती मंदावते.

उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे

  • पचन शक्ती मंदावते.

  • त्वचेला स्निग्धतेची गरज भासते.

  • डिहायड्रेशन, हिट स्ट्रोक

  • क्षारांचे प्रमाण कमी होऊन चक्कर येऊ शकते.

  • सनबर्न, घामोळ्यासारखे त्वचा विकार इ. प्रकारचे आजार दिसतात.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारामध्ये खालील गोष्टीचा समावेश करावा -

  • शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी पाणी, पाण्यात वाळा, मोगरा, पुदिना इ. वस्तूंचा वापर करून पाण्याला सुवासिक करून पाणी प्यावे.

  • कॉफी, चहा यांसारख्या उत्तेजक पेयांचा वापर टाळून आहारात नारळाचे पाणी, ताक, लिंबूपाणी, बार्लीचे पाणी यांचा वापर करावा.

  • आहारात तेलकट, मसाल्याचे पदार्थ टाळावेत.

  • आहारामध्ये सुंठ, सैंधव, जीरे, ओवा यांसारखा पदार्थांचा वापर करावा- ज्यामुळे पचनास मदत होईल. उदा. सुंठवडा, ताकामध्ये सैंधव, कडुनिंबाची सुंठ, जिरे, ओवा घालून केलेली चटणी.

  • तहान लागावी म्हणून धणे, जिरे यांचे पाणी, कोकम सरबत, पन्हे यांचा वापर करावा. कोल्डड्रिंक्सचा वापर टाळावा.

  • मधल्यावेळेचे खाणे म्हणून पाणीयुक्त फळे उदा. खरबूज, कलिंगड, जाम, करवंदे यांचा वापर करावा.

  • आहारात पाणीयुक्त भाज्या, काकडी, पालेभाज्या, पुदिना, टोमॅटो, कांदा यांचा वापर करावा.

  • आहारात प्रथिनांसाठी उन्हाळ्यामध्ये मोड आलेली कडधान्ये, डाळींचा वापर करावा.

  • उन्हाळ्यामध्ये बदाम, काळ्या मनुका, सुके अंजीर, जर्दाळू यांसारख्या सुक्यामेव्याचा वापर करावा.

  • उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते- म्हणून रात्रीचा आहार हलका असावा. त्यामध्ये कढी, सार, खिचडी, पालेभाजी-आमटी, दहीभात यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा.

सर्वसाधारण लोकांसाठी उन्हाळ्यातील आहाराचा तक्ता

सकाळी उठल्यावर १ कप जिरे पाणी/ बार्लीचे पाणी.

हलका व्यायाम व श्वसनाच्या व्यायामानंतर १ कप थंड दूध, बदाम व १ चमचा गुलकंद + १ चमचा सब्जा बी घालून.

नाश्ता - मुगाचे डोसे/ नाचणीचे अंबील.

दुपारच्या जेवणात - काकडी-टोमॅटोची कोशिंबीर, वरण + ज्वारी भाकरी/ १ फुलका + १ वाटी भाजी

मधल्या वेळचे खाणे - कलिंगड/ खरबूज + १ कप लिंबूपाणी/ पन्हे + काळ्या मनुका/ एखादे सुके अंजीर.

रात्रीचे जेवण - मूग डाळीची खिचडी + कढी/ दहीभात/ भाज्या वापरून ठेपला/ धपाटे आणि दही.

  • दिवसभरात १५-१६ ग्लास पाणी प्यावे.

  • आईस्क्रीमचा वापर कमीत कमी करावा. त्याच्या ऐवजी आहारात फळांचा समावेश करावा.

  • ज्यूस, मिल्कशेकचा वापर टाळून सालासकट/ किंवा चोथ्यासकट फळे खावीत.

  • माठातले पाणी प्यावे.

खास उन्हाळ्यासाठी काही पेये

१. लिंबू/ आवळा/ कोकम/ पन्हे यांसारखी सरबते

२. सातूचे पीठ पाण्यातून किंवा ताकातून घ्यावे.

३. शहाळ्याचे पाणी/ उसाचा रस.

४. बार्लीचे पाणी

५. जिरे-धणे याचे पाणी

६. मठ्ठा

७. ताक

८. आमसुलाचे तिवळे

टॅग्स :summerdiet planhealth