जागर स्त्री आरोग्याचा; सावध रहा, स्तनाच्या कर्करोगाबाबत!

स्तनाच्या कर्करोग चाळीशी-पन्नाशीनंतरच्या वयात गाठतो. हा वयोगट जोखमीचा आहे.
जागर स्त्री आरोग्याचा; सावध रहा, स्तनाच्या कर्करोगाबाबत!

भारतात स्त्रियांममध्ये सर्वाधिक प्रमाणात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण आहे. दरवर्षी दीड ते दोन लाख बाधीत होतात तर ९० हजार ते एक लाख स्त्रियांचा त्याने मृत्यू होतो. या गंभीर समस्‍येबाबत महिलांनी सजग असणे गरजेचे आहे. वेळेत उपचाराबरोबरच प्रतिबंधात्मक उपायांबाबत सांगत आहेत डॉ. ज्योती रोकडे.

स्तनाच्या कर्करोग चाळीशी-पन्नाशीनंतरच्या वयात गाठतो. हा वयोगट जोखमीचा आहे. शरीरातील काही विशिष्ठ जनुके असलेल्या स्त्रियांमध्ये हा रोग इतरांपेक्षा जास्त दिसतो. कमी वयात पाळी येणे व उशिराने पाळी जाणे (वयाच्या ५३ ते ५५ वर्षे) यामुळे शरीरातील संप्रेरकामुळे (हार्मोन्स) कर्करोगाची शक्यता वाढते. ज्यांच्यात जवळच्या रक्तातील नात्यात हा रोग आहे त्यांनाही धोका असू शकतो. रजोनिवृत्तीनंतर हार्मोन्सच्या गोळ्या घेणाऱ्या, प्रमाणापेक्षा जास्त वजन असणाऱ्या, व्यायामाचा अभाव असेल हे घटकही जोखमीचे आहेत. ज्या स्त्रियांनी स्तनपान दिले नाही किंवा फार कमी दिले अशांबाबतही शक्यता वाढते.

या कर्करोगाची वेगवेगळी लक्षणे असू शकतात तसेच कोणत्याही लक्षणाविनाही हा आजार बळावू शकतो. साधारणपणे आढळणाऱ्या लक्षणांमध्ये स्तनांत नवीन आढळलेली गाठ, स्तनावरची कातडी घट्ट होणे किंवा संत्र्याच्या सालीसारखी दिसणे, स्तनांग्रातून स्त्राव, पाणी, रक्त यापैकी काहीही बाहेर येणे, स्तनामधील असमानता, स्तनाग्रे आत ओढली जाणे, स्तनाच्या आकारात बदल, स्तनात, पाठीच्या मणक्यात वेदना अशी सर्वसाधारपणे पुर्वलक्षणे दिसतात. अशावेळी तातडीने स्त्रीरोग किंवा शल्यचिकित्सकांना दाखवणे. गाठ असेल तर ती पाहण्यासाठी सुई घालून पेशी तपासल्या जातात.

जागर स्त्री आरोग्याचा; सावध रहा, स्तनाच्या कर्करोगाबाबत!
सप्तशृंगी

जर कर्करोगाची गाठ नसेल तर आवश्‍यक त्या पध्दतीने गोळ्या किंवा शस्त्रक्रिया देऊन बरी केली जाते. जर का ती गाठ कर्करोगाची असेल तर तिचा विस्तार तपासण्यासाठी रक्ततपासणी, काखेची-पोटाची सोनोग्राफी, एक्स रे, सिटी स्कॅन अशा विविध तपासण्या-चाचण्या केल्या जातात. लवकर निदानामुळे लवकर उपचार केल्याने रुग्णांचे आयुष्य वाढवता येते. उपचारामध्ये शस्त्रक्रिया आणि त्यानंतर केमोथेरपीचा समावेश होतो. शस्त्रक्रियेत स्तन व त्यापासून निघणाऱ्या ग्रंथी काढून टाकल्या जातात. त्याची तपासणी केली जाते. त्यानुसार पुढील उपचार सुरु राहतात.

प्रतिबंधात्मक उपायांमध्ये संतुलित आहार, कच्च्या पालेभाज्या, तळलेल्या स्निग्ध पदार्थ, फास्ट फुड, बेकरी उत्पादने याचा कमीत कमी आहार, व्यायाम, नियंत्रित वजन, जास्तीत जास्त स्तनपान देणे, रजोनिवृत्तीनंतर एचआरटीचा (हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी) वापर अत्यंत सावधगिरीने करावा लागतो. नात्यात रोगाचा पुर्वेइतिहास असेल तर अशा महिलांनी ३५ वर्षापासूनच नियमित तपासणी करून घ्यावी.

स्वचाचणी आणि मॅमोग्राफी

स्वचाचणी म्हणजे महिन्यातून एकदा आरशासमोर उभे राहून स्वपरिक्षण करणे. स्तनाचा आकार, त्वचा, स्तनाग्रांचे निरिक्षण करावे. कोणतीही वेगळी गोष्ट वाटली तर डॉक्टरांशी तत्काळ संपर्क साधावा. स्तनाची एक्स रे म्हणजे मॅमोग्राफी व स्तनाची सोनोग्राफी म्हणजे सोनोमॅमोग्राफी या चाचण्या चाळीशीनंतर वर्षातून एकदा डॉक्टरांच्या सल्‍ल्यानुसार केल्यास हाताला न लागणाऱ्या गाठीचे निदान होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com