
Addiction : गांजा ओढल्याने मानसिक आजारांचा धोका वाढला; व्यसनाचा विळखा तात्काळ सोडवा!
गांजा हा एक प्रकारचा अमली पदार्थ आहे. गांजा हा कैनबिल सटाइवा नावाच्या एका वनस्पतीच्या सुकलेल्या पानाफुलांपासून, तसंच त्या वनस्पतीची मुळं, बिया या सगळ्यांचं मिश्रण असतं. दीर्घकाळ गांजाचं सेवन केल्यास त्याचं व्यसन लागतं.
सध्या गांजाचं सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, ही चिंतेची बाब आहे. कारण यामध्ये देशातल्या तरुणांची संख्या जास्त आहे. गांजाच्या सेवनाने शरीरावर वाईट परिणाम होतो आणि अनेक गंभीर आजारही जडतात. गांजाचं सेवन करणाऱ्या तरुणांच्या मानसिक आरोग्यावरही याचे परिणाम दिसू लागले आहेत.
आयक्यू लेव्हल कमी होणं
किशोरवयात गांजाचं सेवन करणं अधिक धोकादायक आहे. कारण किशोरावस्थेमध्ये मेंदूचा विकास होत असतो. त्यामुळे गांजाच्या सेवनाने या विकासात अडथळा निर्माण होतो. किशोरावस्थेपासून प्रौढावस्थेपर्यंत सतत गांजाचं सेवन करणे मेंदूच्या विकासासाठी धोकादायक आहे. यामुळे स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो तसंच व्यक्तीचं काम, सामाजिक जीवन यावरही परिणाम होतो.
डिप्रेशन
गांजाचं नियमित सेवन केल्याने डिप्रेशन आणि एन्झायटीची शक्यता वाढते. सिझोफ्रेनियाच्या रुग्णांची तब्येत यामुळे बिघडू शकते. सतत गांजा ओढल्याने खोकला आणि कफ होतो.
कॅन्सर
गांज्याच्या सेवनाने फुफ्फुसाचा कर्करोग किंवा मान, डोक्याचा कॅन्सर होऊ शकतो.
गर्भवती महिला
गर्भवती महिलांनी गांजाचं सेवन केल्यास होणाऱ्या बाळाचं वजन कमी होऊ शकतं. तसंच बाळाचा जन्मही ठरलेल्या वेळा आधी होतो. अशा मुलांना अतिदक्षता विभागात ठेवून त्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. गांजांच्या सेवनाने बाळाची तब्येत अत्यंत नाजूक होते.
अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.