घडण-मंत्र : दुरावलेली मुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Childrens and parents

इंटरनेटमुळे वेगळ्या जगात शिरून तेथे हरखून गेलेली मुले अनेक घरांमध्ये दिसतात. आसपासच्या जगाशी आणि माणसांशी संपर्क कमी करून किंवा तोडून एका वेगळ्याच आभासी किंवा दूरच्या जगाशी ही मुले बांधली जातात.

घडण-मंत्र : दुरावलेली मुले

- डॉ. भूषण शुक्ल

इंटरनेटमुळे वेगळ्या जगात शिरून तेथे हरखून गेलेली मुले अनेक घरांमध्ये दिसतात. आसपासच्या जगाशी आणि माणसांशी संपर्क कमी करून किंवा तोडून एका वेगळ्याच आभासी किंवा दूरच्या जगाशी ही मुले बांधली जातात.

‘K-pop’चे जग, फिफाचे जग (स्वतः कधीही फुटबॉल न खेळता), ‘यू-ट्यूब’मधल्या एखाद्या ‘influencer’ चे जग, जपानी कार्टूनचे जग, कोणत्याही व्हिडिओ गेमचे जग (सध्या ‘फ्री फायर’ची चलती आहे) असे कोणतेतरी जग त्यांचे बनते आणि बहुतेक वेळ स्वतःच्या रूमचे दार लावून हे बघण्या/खेळण्यात जातो. अभ्यास, तब्येत आणि खरी नाती ढिसाळ व्हायला लागतात.

आता याचे करायचे काय?

1) प्रतिबंध

मुळात असे प्रश्न निर्माण न होऊ देणे, हे सर्वांत उत्तम. मुलांना एखाद-दोन तासांपेक्षा जास्त इंटरनेटमध्ये हरवू न देणे हे पहिले पाऊल.

दारे बंद करून दुरावा निर्माण न होऊ देणे हे दुसरे.

हे सर्व उद्योग म्हणजे घटकाभर मनोरंजन आहे, त्यापलीकडे काही नाही हे सतत लक्षात ठेवणे आणि मुलांनाही त्याप्रमाणे जाणीव देणे हे तिसरे.

आणि घरच्या सर्व कामकाजात मुलांना प्रत्यक्ष जबाबदारी देणे, सणा-समारंभांना बरोबर नेणे (फोनशिवाय), घरी आलेल्या पाहुण्यांबरोबर गप्पा मारणे, सामाजिक कामात मुले बरोबर सहभागी करून घेणे हे चौथे.

या चार पाऊलखुणा जपल्यास मुले हरवून जाण्याची शक्यता मुळातच कमी होते.

2) आजाराची सुरुवात किंवा सौम्य लक्षणे

चिडचिड, जास्त वेळ खोलीत राहणे आणि इतरांना टाळणे हे जास्त होते आहे, हे दिसल्यास इंटरनेटच्या वापरावर ताबडतोब सुयोग्य बंधने घालणे, मुलांशी चर्चा करून योग्य उपाय सुचवणे, अभ्यासाचा बागुलबुवा कमी करून मुलांना बाकीचे छंद, खेळ इत्यादी गोष्टी प्रत्यक्ष करण्यास प्रोत्साहन देणे, स्वतःचा ‘बिझी’पणा कमी करून मुलांना जास्त वेळ देणे आणि संवाद वाढवणे हे खूप उपयोगी पडते.

3) तीव्र आजार

कुटुंबाशी संपर्क खूप कमी होणे. फक्त कामाच्या वेळेस गोडी गुलाबीचे वागणे असणे, रूममध्येच खाणेपिणे असणे, कुटुंबाबरोबर कोणत्याही कार्यक्रमाला वा सहलीला सुद्धा न जाणे, आहार, वेशभूषा, उच्चार सुद्धा बदलणे, कोणी काही सांगायला गेल्यास मोठा तमाशा घालणे किंवा स्वतःला इजा करून घेण्याची धमकी देणे हे सर्व आजार खूप पुढे गेल्याची लक्षणे आहेत. पालकांबद्दल अगदी तिटकारा निर्माण होण्यापर्यंत हे प्रकरण जाते (पालकांचे घर आणि पैसे मात्र हवेसे असतात).

उपाययोजना

  • अशा प्रकारे तीव्र आजारासारखी लक्षणे दिसल्यास, मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे अनिवार्य आहे. अशा बहुतेक मुलांना मानसिक आजाराची लक्षणे स्पष्ट स्वरूपात दिसत असतात - उदासीनता, टोकाची भीती, मोठ्या मुलांना व्यक्तिमत्त्व दोषांची लक्षणे वगैरे दिसते.

  • कुटुंबाची आर्थिक स्थिती जितकी जास्त चांगली तितके हे प्रकरण गंभीर होण्याची शक्यता जास्त. कारण, अशा प्रकारची वेगळी जीवनशैली जगायचा खर्च हा सर्व पालकांना परवडणारा नसतो.

  • अशा मुलांसाठी समुपदेशन, वर्तणूक बदलण्याची थेरपी, मूळ आजाराप्रमाणे औषधोपचार आणि पालकांचे सुद्धा समुपदेशन गरजेचे असते.

  • काही मुलांना अनेक आठवड्यांसाठी उपचार केंद्रांमध्ये दाखल करून सुद्धा घ्यावे लागते.

  • दिवसेंदिवस वाढताना दिसणाऱ्या या समस्येला मुळातच प्रतिबंध करणे हे सर्वांत शहाणपणाचे, याबद्दल शंका नाही.