वसा आरोग्याचा : साखर V/S गूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tilgul

नुकतीच संक्रांत झाली. सर्वांना तुम्ही तिळगूळ दिला असेल. गेल्या आठवड्यात तिळाचे महत्त्व लक्षात घेतले. तिळाप्रमाणेच गुळही गुणकारी आहे.

वसा आरोग्याचा : साखर V/S गूळ

- डॉ. कोमल बोरसे

नुकतीच संक्रांत झाली. सर्वांना तुम्ही तिळगूळ दिला असेल. गेल्या आठवड्यात तिळाचे महत्त्व लक्षात घेतले. तिळाप्रमाणेच गुळही गुणकारी आहे. गूळ आरोग्यदायी असल्याने स्वयंपाकात वापरलाच पाहिजे. भरपूर श्रम केल्यानंतर थकवा येतो. अशा वेळी गुळाचा खडा पाण्यात घालून विरघळवून पाणी प्यावे. नवीन गूळ हा पचण्यास जड आणि कफ-पित्त वाढवणारा असतो. कफ, सर्दी झाल्यास सुंठ, गूळ आणि तूप यांचे चाटण किंवा गोळी रोज खाल्ल्यास फायदा होतो. साजूक तुपाबरोबर गूळ सेवन केल्यास उष्ण पडत नाही. म्हणून संक्रातीला गुळाची पोळी तुपाबरोबर खाण्याची पद्धत आहे. आपले सण, आहार आणि आरोग्य याचा किती जवळचा संबंध आहे, हे यावरून लक्षात येते.

संक्रांतीच्या निमित्तानं तीळ आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो. आजारासाठी विशिष्ट तपासण्या, नियमित औषधे, तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला महत्त्वाचा आहेच; त्याचबरोबर आपल्या नेहमीच्या वापरात असलेल्या पदार्थांचे औषधी गुणधर्म माहीत असावेत. त्यामुळे आवश्‍यक पथ्य सांभाळण्यात आपण नक्की यशस्वी होऊ.

सध्या बाजारात गूळ आणि गुळाचे पदार्थ साखरेपेक्षा जास्त विकले जाताना दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठे तरी वाचलेले किंवा बघितले असते, की साखरेऐवजी गूळ वापरा. त्यामुळे अनेक रूग्ण त्यातली काही मधुमेहाचे असले, तरी साखरेऐवजी गुळाचा चहा पितात. त्यांना वाटते, की गुळामुळे आपली साखर आणि वजन वाढणार नाही. परंतु समोरच्या व्यक्तीकडून ज्ञान घेताना त्याचा आरोग्य शिक्षणामध्ये अभ्यास झाला आहे, की नाही हे पाहिले पाहिजे. असे न केल्यास तुम्ही तुमच्या आरोग्यासोबत खेळत आहात. कारण पदार्थ कोणत्याही प्रक्रियेने बनवला, तरी त्याचा मूळ गुणधर्म हा बदलत नाही. साखरेपेक्षा गूळ हा निश्चित आरोग्यदायी आहे. त्यामागचे कारण समजून घेतले पाहिजे.

साखर आणि गूळ हे दोन्ही पदार्थ उसाच्या रसापासून बनवतात. बनवण्याची प्रक्रिया दोघांची भिन्न आहे; परंतु गुणधर्मात काहीही फरक नसतो. उसाचा गुणधर्म हा गोड आणि बलदायक आहे. त्यामुळे व गूळ आणि साखरेचा गुणधर्मही तोच राहील. परंतु साखर बनवताना खूप जास्त उष्णता देत असल्यामुळे ऊसामधील पोषणद्रव्ये निघून जातात आणि प्रक्रिया करताना पांढरा रंग येण्यासाठी रासायनिक पदार्थाचा वापर केलेला असतो. गूळ तयार करताना प्रक्रिया थोडी कमी होते. त्यामुळे पोषणद्रव्ये थोड्या फार प्रमाणात जास्त असतात. पूर्वी गूळ गुऱ्हाळात बनवायचे. गुऱ्हाळात लोखंडाच्या कढईचा वापर करण्यात येत असे; त्यामुळे लोखंडाच्या कढईतील लोह गुळामध्ये उतरायचे. लहानपणी आपण जो गूळ खायचो, त्याचा रंग काळा असायचा.

आता स्टीलची मशिनरी वापरत असल्याने यामध्ये लोहाचे प्रमाण कमी असते. एकूणच, गूळ आणि तीळ हे आरोग्यासाठी आवश्यक आहे. पूर्ण थंडीत त्याचा वापर केल्यास शारीरिक फायदे सगळ्याच वयोगटातील लोकांना जाणवतील. १०० ग्रॅम साखरेमध्ये ९९.४ ग्रॅम कर्बोदके त्यातून ३९८ ऊर्जा म्हणजे कॅलरीज, १२ मिलीग्रॅम कॅल्शिअम आणि ०.५ मिलीग्रॅम लोह तर गुळामध्ये ९५.० कर्बोदके त्यातून ३८३ कॅलरीज ८०मिलीग्रॅम कॅल्शिअम आणि २.६४ मिलीग्रॅम लोह असते. ॲनिमिया झालेले अनेकजण गूळ घालून लाडू खातात. परंतु वरील आकडेवारी पाहिल्यास साखरेपेक्षा गुळामध्ये लोह आहे परंतु फक्त २.६४मिलिग्रॅम हे मिळवण्यासाठी तुम्हाला शंभर ग्रॅम गूळ खावा लागेल. एवढा गूळ खाणं शक्य नाही आणि ते आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरेल. त्यामुळे ॲनिमियामध्ये गूळ खाणे हा पर्याय तितका व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही.