संवाद : ताप ‘व्हायरल’चा..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fever

काही दिवसात मुलांमध्ये ‘व्हायरल फिव्हर’च्या वाढणाऱ्या प्रकरणांमुळे यंदाच्या सुट्ट्यांची सुरुवात आजारपणाने होते का काय अशी चिंता पालकांना वाटत आहे.

संवाद : ताप ‘व्हायरल’चा..!

- डॉ. संकेत काळे

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मज्जा, हे समीकरण अनेक पिढ्यांपासून प्रचलित आहे. परंतु काही दिवसात मुलांमध्ये ‘व्हायरल फिव्हर’च्या वाढणाऱ्या प्रकरणांमुळे यंदाच्या सुट्ट्यांची सुरुवात आजारपणाने होते का काय अशी चिंता पालकांना वाटत आहे. सारखा चढ-उतार होणारा ताप, सतत वाहणारे नाक, खोकला व अंगदुखी हे नेमके कोणत्या आजाराचे लक्षण आहे हे जाणून घेण्यासाठी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. तपासल्यानंतर आजारपणाचे कारण ‘व्हायरल फिव्हर’ असे सांगितले जाते.

‘व्हायरल फिव्हर’ म्हणजे काय?

वातावरणातील विषाणूंच्या संक्रमणामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजाराला ‘व्हायरल फिव्हर’ असे म्हणतात. ही वैद्यकीय व्याख्या ऐकायला सोपी वाटत असली तरी ती सोसताना, मूल आजारी असताना अवघड जाते.

कारणे

  • मूल खेळणारच, त्यात सोशल डिस्टन्सिंग पाळणे जवळपास अशक्य असते. म्हणूनच शाळा, पाळणाघर, खेळण्याची ठिकाणे ही विषाणू संक्रमणासाठी कारणीभूत ठरतात.

  • अस्वच्छता - सर्दी-खोकल्यात रुमाल वापरण्याच्या खबरदारीचा अभाव.

  • रोग प्रतिकार यंत्रणा विकसनशील अवस्थेत असल्यामुळे आजारांशी लढण्याचा त्यांच्या शरीराला सराव नसतो.

  • खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी.

  • अपूर्ण लसीकरण.

  • या सर्व कारणांमुळे लहान मुलांना विषाणूंचा संसर्ग सहज होतो.

नेमके काय घडते?

हे विषाणू नाका-तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात व आपली संख्या वाढवून शरीरावर हल्ला चढवतात. त्यानंतर आजारपणाची लक्षणे दिसतात. चढ-उतार होणारा ताप, वाहणारे नाक, खोकला यामुळे मुले हैराण होतात.

अन्य लक्षणे -

१) घसा दुखणे

२) भूक न लागणे

३) अंग, डोके दुखी

४) अशक्तपणा

५) मळमळ, उलट्या

६) अतिसार

७) अंगावर पुरळ येणे

मुलांची प्रतिकार यंत्रणा या ‘परकीय’ आक्रमणाला परतवण्यासाठी सक्रिय होते. पुढील काही दिवस हे ‘युद्ध’ चालते.

काही मुलांमध्ये ही लढाई इतरांच्या तुलनेत जास्त दिवस सुरू राहते. मुलांचे खाणे-पिणे कमी होते व नेहमी खेळणारी बागडणारी, ऊर्जेने भरलेली मुले शांत बसून राहू लागतात. अशा वेळेस वाढत्या तापासोबत पालकांचा मनस्तापही वाढतो.

ताप कमी न होण्याची कारणे

काही तपासण्या कराव्या लागतील का? बाळाला रुग्णालयात ॲडमिट तर नाही ना करावे लागणार? हे विचार पालकांना सतावतात. व्हायरल फिव्हरचे निदान, आजारी मुलांची घ्यावयाची काळजी, आहार व उपचार याबद्दल आणखी माहिती पुढील भागात घेऊयात.

(लेखक बालरोगतज्ज्ञ आहेत.)