
Insomnia : झोप येत नाही म्हणून घड्याळाकडे पाहत बसणं ठरू शकतं धोकादायक; शास्त्रज्ञांनी सांगितलं कारण
बऱ्याच वेळा आपल्याला काही कारणास्तव रात्री झोप येत नाही. बरेच लोक झोपताना सारखं घड्याळाकडे पाहून आता आपल्याला किती तास झोप मिळेल, हे मोजत राहतात. तुम्ही देखील असं करत असाल, तर तुम्हाला ही सवय बदलण्याची गरज आहे. कारण असं केल्यामुळे इन्सोम्निया म्हणजेच निद्रानाश होण्याचा धोका अधिक वाढू शकतो.
इंडियाना युनिवर्सिटीच्या संशोधकांनी याबाबत रिसर्च केला आहे. प्रा. स्पेन्सर डॉसन यांनी झोपेशी संबंधित आजार असणाऱ्या पाच हजार रुग्णांना घेऊन त्यांची चाचणी केली. यातून त्यांना हा निष्कर्ष प्राप्त झाला. यामध्ये ४ ते २२ टक्के इन्सोम्निया झालेल्या प्रौढ व्यक्तींचा समावेश होता.
असा केला रिसर्च
या संशोधनात सहभागी व्यक्तींना फॉर्म भरण्यास सांगण्यात आले. यामध्ये ते झोपेच्या गोळ्या घेतात का? झोप येण्यासाठी ते काय करतात? या गोष्टींचा फायदा होतो का? अशा आशयाचे प्रश्न विचारण्यात आले होते. या रिसर्चमधून असं दिसून आलं, की जे लोक झोपण्यापूर्वी आपल्याला किती झोप मिळेल हे मोजत होते त्यांचे झोपेच्या गोळ्या घेण्याचे प्रमाण वाढले.
हे आहे कारण
जेव्हा तुम्ही झोपताना आणखी किती तास झोप मिळेल हे पाहता, तेव्हा जेवढा कमी वेळ दिसेल तेवढा जास्त तणाव वाढतो. या तणावामुळे झोप येण्यास आणखी अडचण येते. त्यामुळे लोक झोपेच्या गोळ्या घेण्याचा विचार करतात. याउलट, जे लोक घड्याळ पाहत नाहीत, त्यांच्यात असा अतिरिक्त ताण न वाढता साध्या उपायांनी देखील त्यांना झोप येऊ शकते.
शास्त्रज्ञांनी दिला सल्ला
डॉसन म्हणाले, की या समस्येचा अगदी सोपा उपाय आहे. झोपताना आपल्या जवळ असलेल्या गजराच्या घड्याळाचे तोंड भिंतीकडे करा. हातातील स्मार्टवॉच काढून ठेवा, आणि स्मार्टफोन देखील दूर ठेवा. यामुळे तुम्हाला वेळ पाहता येणार नाही, आणि तुम्ही घड्याळाऐवजी झोपेकडे लक्ष द्याल.