Monkeypoxपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल ? वाचा तज्ज्ञांचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monkeypox

Monkeypoxपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल ? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

लेखन - डॉ. दीपक उग्रा, कन्सल्टन्ट, पेडियाट्रिक्स, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, खार

मुंबई : जगभरातील विविध देशांमध्ये आणि भारतात मंकीपॉक्सच्या केसेसची वाढती संख्या लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव आंतरराष्ट्रीय पातळीवरील चिंताजनक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असल्याचे जाहीर केले आहे.

हा आजार मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या निकट संपर्कात आल्यास पसरतो. संशोधनासाठी ठेवण्यात आलेल्या माकडांच्या वसाहतींमध्ये हा आजार आढळून आला तेव्हा १९५० च्या दशकात याला मंकीपॉक्स असे नाव देण्यात आले. याआधी देखील मंकीपॉक्सच्या केसेस सापडल्या होत्या आणि आफ्रिकन देशांमध्ये या आजाराचा प्रसार होत होता, पहिली केस १९७० मध्ये आढळून आली होती.

इतर विषाणूजन्य आजारांप्रमाणे मंकीपॉक्स हा आजार दोन व्यक्तींमधील त्वचेचा त्वचेशी संपर्क आल्याने, किंवा मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या व्यक्तीने स्पर्श केलेल्या कपडे, ब्लँकेट्स, टॉवेल्स यांसारख्या वस्तूंना स्पर्श केल्याने देखील पसरू शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेने असे देखील म्हटले आहे की, मंकीपॉक्स हा आजार श्वसनमार्गामार्फत पसरू शकतो आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाकातोंडातून बाहेर पडलेल्या, हवेत पसरणाऱ्या सूक्ष्म तरल कणांशी संपर्क आल्याने देखील इतरांना हा आजार होऊ शकतो.

हेही वाचा: Monkeypox : 'गे' सेक्समुळं खरंच मंकीपॉक्स होतो का? WHOनं दिलं स्पष्टीकरण

मुलांमध्ये मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव

पीएलओमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासातील आकडेवारी असे दर्शवते की, १९७० च्या दशकात मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती. पण १९७० नंतर आणि २०१० पर्यंत मुलांपेक्षा प्रौढांना हा आजार जास्त प्रमाणात होत होता.

आज जगभरात, १०० पेक्षा जास्त मुलांना मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग झालेला आहे. पालक आणि मुलांची देखभाल करणाऱ्या व्यक्तींसाठी ही चिंताजनक बाब आहे.

मंकीपॉक्सच्या केसेसची संख्या वाढत असल्याने, आपल्या मुलांमध्ये हा आजार पसरण्याची भीती अनेक पालकांना वाटू लागली आहे. शाळा या मंकीपॉक्स विषाणू संसर्गाच्या हॉटस्पॉट्स व कॅरियर्स बनू नयेत यासाठी स्थानिक प्रशासन देखील काळजी घेत आहेत. पण पालकांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे की, जर लहान आणि किशोरवयीन मुले संसर्ग दर जास्त असलेल्या समुदायामध्ये राहत असतील किंवा तिथे नुकतीच जाऊन आली असतील तर त्यांना संसर्ग होण्याची शक्यता सर्वात जास्त असते.

अमेरिकन अकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक्सनुसार, आठ वर्षे वयाखालील लहान बाळे आणि मुले, एक्झिमा आणि त्वचेच्या इतर विकारांनी ग्रस्त असलेल्या, रोगप्रतिकार शक्ती कमी करू शकतील असे आजार असलेल्या मुलांना जर मंकीपॉक्सचा संसर्ग झाला तर त्यांच्यासाठी हा आजार खूप जास्त गंभीर होण्याची शक्यता असते.

हेही वाचा: Monkeypox: भारतातील पहिला मंकीपॉक्स रुग्ण झाला बरा, चेहऱ्यावरील डागही झाले बरे

मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्यास मुलांमध्ये आढळून येणारी लक्षणे

१. मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्यानंतर सर्वसाधारणतः तीन आठवड्यांनी याची लक्षणे दिसू लागतात.

२. ताप, थंडी वाजणे, लसिका गाठी वाढणे, थकवा येणे, सांधे व पाठ दुखणे, डोकेदुखी, श्वास घेण्यात त्रास होणे, पुरळ उठणे यांचा त्यामध्ये समावेश असतो.

३. मुलांना येणारे पुरळ हे कांजिण्या, नागीण, अॅर्जीमुळे त्वचेवर येणारे पुरळ, हात, पाय आणि तोंडाच्या आजारामध्ये येणाऱ्या पुरळासारखे दिसते.

४. पुरळाची सुरुवात सपाट ठिपक्यांपासून होते आणि त्याच्या द्रवाने भरलेल्या गुठळ्या बनू लागतात. त्या वेदनादायक असू शकतात किंवा खाज येऊ शकते.

५. मुलांच्या अंगावर असे काही असामान्य पुरळ दिसून येत असल्यास पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये, ताबडतोब डॉक्टरांना त्याची माहिती द्यावी.

ही काळजी घ्या

१. ज्यांना मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याची शंका आहे किंवा खात्री आहे अशा व्यक्ती आणि प्राण्यांच्या संपर्कात मुलांनी येऊ नये याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे.

२. एखाद्या संसर्ग झालेल्या व्यक्तीचा स्पर्श झालेला असल्यास इतरांना आजाराची लागण होऊ नये यासाठी सर्व जागा नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंतुक कराव्यात.

३. इतर बहुतांश संसर्गांप्रमाणे, सतत आणि अतिशय स्वच्छ पद्धतीने हात धुतल्याने तसेच मास्कचा वापर केल्याने देखील संसर्ग टाळण्यास मदत होऊ शकते.

४. मुलांच्या शरीरावर कोणत्याही जखमा, त्वचेवर पडलेल्या चिरा खुल्या राहू नयेत, मुलांनी त्यांच्या जखमा व डोळे यांना वारंवार हात लावू नयेत याची पालकांनी काळजी घ्यावी.

५. मुलांच्या अंगावर काही पुरळ आले असल्यास ते त्यांनी खाजवू नये याची काळजी घ्या. पुरळ किंवा खुल्या जखमा असतील तर त्याला हात लावण्याआधी आणि नंतर देखील पालकांनी स्वतःचे हात स्वच्छ धुतलेले असणे आवश्यक आहे.

६. हे नीट समजून घ्या की, मुलांच्या अंगावर उठणाऱ्या पुरळाची अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. मुरुमे, फोड यांसारखे दिसणारे नवे पुरळ मुलाच्या अंगावर दिसत असल्यास किंवा त्याला/तिला मंकीपॉक्सची संशयास्पद लक्षणे दिसत असल्यास तातडीने डॉक्टरांना किंवा बालरोगतज्ज्ञांना दाखवा.

७. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मंकीपॉक्स झालेल्या कोणाशीही संपर्क आलेला असल्यास तातडीने डॉक्टरांना त्याची सूचना द्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा.

टॅग्स :Monkeypox