योग- जीवन : आरोग्य चिंतन समारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sarvangasana

आरोग्य ही स्थिती नसून, ती सतत घडणारी प्रक्रिया आहे. स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे म्हणजे आरोग्य.

योग- जीवन : आरोग्य चिंतन समारोप

- किशोर आंबेकर, अय्यंगार योग शिक्षक

आरोग्य ही स्थिती नसून, ती सतत घडणारी प्रक्रिया आहे. स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे म्हणजे आरोग्य. जेव्हा प्रत्येक पेशीचे नूतनीकरण होतच राहते, ऊर्जेचे नूतनीकरण होते, चैतन्याचा सतत प्रवाह सुरू असतो, मन स्थिर असते, बुद्धी तल्लख असते, तेथे सकारात्मक आरोग्य वास करीत असते. आरोग्य ही सर्वांगीण विकासाची पायाभरणी आणि आध्यात्मिक विकासाची सुरुवात असते. व्यक्तीचे स्वास्थ्य सुधारल्यास सामाजिक जबाबदारीचे भान येऊन व्यक्तीचे सामाजिक आरोग्य आणि समाजाचे सर्वांगीण आरोग्य सुधारेल. कोणताच धर्म, पंथ आरोग्याचे महत्त्व नाकारत नाही. योगाभ्यासामुळे उत्तम आरोग्य प्राप्त होते म्हणून कोणताच धर्म, पंथ त्याचे महत्त्व नाकारत नाही.

उत्तम आरोग्य गरजेचे

ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी, निर्णयक्षमता वाढविण्यासाठी, भावनिक स्थैर्यासाठी आणि बौद्धिक स्पष्टतेसाठी आरोग्य उत्तम हवे. सुस्ती, आळस, कंटाळा हे आरोग्याच्या आड येणारे अडथळे आहेत. त्यामुळे शरीर संथ, मंद व मन असंवेदनाशील बनते. भगवद्गीतेप्रमाणे जे सुख, इंद्रिये आणि विषयांच्या संयोगाने मिळते; ते बल, वीर्य, बुद्धी, धन आणि उत्साह यांचा नाश करणारे असल्याने, दुःखाला कारणीभूत होते. हाच विचार पतंजलींच्या योगासूत्रांतही आहे. आरोग्य हे त्रिदोषांवर अवलंबून असते (वात, पित्त, कफ). हे त्रिदोष महाभूत आणि तन्मात्रा यांनीच बनलेले असतात. वातदोष हा वायू, स्पर्श तन्मात्रा, आकाश, शब्द तन्मात्रा; पित्तदोष हा तेज, रूप तन्मात्रा आणि कफदोष हा पृथ्वी, गंध तन्मात्रा, जल, रस तन्मात्रा ह्यांनी बनलेला असतो. योगाभ्यासात ह्या सर्वांचे व्यवस्थापन करायचे असते. शरीर विज्ञान हे जलमहाभूताशी, मनोविज्ञान हे तेज महाभूताशी तर मज्जासंस्थाविज्ञान हे वायू महाभूतांशी संबंधित आहेत.

आज काही रोग नाही, त्रास नाही ही स्थिती काही टिकाऊ नसते. शरीराचा, मनाचा कल बिघडण्याकडे असतो. म्हणून आरोग्याचे घटक प्रयत्नपूर्वक निर्माण करावे लागतात, अद्ययावत ठेवावे लागतात. शरीर कामात, कष्टात असेल तरच त्याची सहनशक्ती, प्रतिकारशक्ती टिकते, वृद्धिंगत करता येते. तसाच मनाचाही विचार करावा लागतो. बुद्धीची समज उत्तम असली, तरी शरीर, मन, इंद्रिये संस्कारित नसल्यास, बुद्धी त्यांच्या अधीन होण्याची शक्यता बळावते म्हणून साधनेचे, सत्संगाचे, नामस्मरणाचे महत्त्व आहे. केवळ व्यायाम करून, खेळ खेळून हे साध्य होत नाही.

आहारातूनच मन तयार होत असल्याने, योग्य आहाराशिवाय रोगनिवारण आणि नैतिक, मानसिक, धार्मिक, आध्यात्मिक विकास होणे शक्य नाही. म्हणून ह्या क्षेत्रातील संस्थांनी, व्यक्तींनी असे मार्गदर्शन, जाणीवजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही साधकाने आहारविषयक सवयींविषयी निष्काळजी राहून चालणार नाही.

आजचे आसन आहे सर्वांगासन

 • दोन लोड भिंतीशी समांतर, पायांच्या अंतरावर, एकमेकांजवळ ठेवा.

 • खांदे लोडावर, डोके भिंतीकडे आणि जमिनीवर अशा प्रकारे पाठीवर झोपून, श्‍वास सोडीत दोन्ही हातांच्या आधाराने अर्ध हलासनामध्ये जा. पायांचे तळवे भिंतीला टेकवा.

 • दोन्ही तळहात पाठीवर रोवून, धड, छाती, पाठीचा कणा उचललेला असू द्या.

 • श्‍वास सोडीत दोन्ही पाय वर उचला, जेणेकरून खांद्यांच्या पुढच्या भागापासून घोट्यांपर्यंत शरीर लंब रेषेत येईल.

 • श्‍वास न पकडता ३ ते ४ मिनिटे थांबा.

 • श्‍वास सोडीत अर्धहलासानात जा. हातांचा आधार काढत, पाय गुडघ्यात वाकवून सावकाश आसन सोडा.

उपयोग

 • देहात सुसंवाद व समाधान निर्माण होते. चैतन्य खेळू लागते. आत्मविश्वास वाढतो.

 • बहुतेक सगळ्या सर्वसाधारण विकारांवर हे रामबाण औषध आहे.

 • थायरॉईड, पॅराथायरॉईड ग्रंथींना रक्ताचा पुरवठा वाढतो.

 • धाप लागणे, हृदयातील धडधड, दमा, ब्रोंकाइटिस आणि घशाचे विकार यांपासून सुटका होते.

 • मज्जातंतूंना स्वस्थता लाभते. डोकेदुखीसाठी लाभदायक.

 • चिडखोरपणा, निद्रानाश हे विकार नाहीसे होतात.

 • आतड्यांचे कार्य सुधारून बद्धकोष्टाचा विकार नाहीसा होतो.

 • मूत्रमार्गाच्या तक्रारी, मूळव्याध, गर्भाशय सरकणे या विकारात लाभदायक

टॅग्स :yogaLifehealth