संतुलित आहार : निरोगी जीवनाचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग्य दिनचर्या महत्त्वाची ठरते. यात आहार, विहार व विश्रांतीच्या त्रिसूत्रीचा वापर हा कळीचा मुद्दा ठरतो. आहारातील समतोल साधणे ही एक जीवनावश्यक कला आहे.

संतुलित आहार : निरोगी जीवनाचा आधार

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग्य दिनचर्या महत्त्वाची ठरते. यात आहार, विहार व विश्रांतीच्या त्रिसूत्रीचा वापर हा कळीचा मुद्दा ठरतो. आहारातील समतोल साधणे ही एक जीवनावश्यक कला आहे. यावर पुण्यातील आहारतज्ज्ञ सुकेशा सातवळेकर यांचाही भर आहे.

सातवळेकर म्हणाल्या, ‘‘बालिकांपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनाच, आरोग्यपूर्ण जगण्यासाठी संतुलित आहार आवश्यक ठरतो. दिवसभर लागणारी ऊर्जा चौरस आहारातून मिळते. मध्यमवयानंतर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही योग्य आहार, योग्य प्रमाणात व योग्य वेळी आवश्यक असतो. शरीराला गरजेची असणारी कर्बोदके धान्यातून मिळतात. यासाठी मैद्याचे पदार्थ टाळावेत.

सालीसकट धान्यापासून केलेली पीठे वापरून भाकरी, पोळी, भाज्यांसह पराठे आदी पोषक असतात. कडधान्ये, डाळी, दूध, दही, ताक आदींतून आवश्यक प्रथिनांचा पुरवठा होतो. तेलबिया, सुका मेवा, पालेभाज्या, कोशिंबिरी, उत्तम प्रतीचे तूप व तेल आदींतून निरनिराळे पोषक घटक शरीराला मिळतात. प्रजननक्षम वयात व रजोनिवृत्तीच्या सुमारास महिलांच्या शरीरातील संप्रेरकांबध्ये बदल होतात. त्यांना अनुकूल घटक संतुलित आहारातून मिळतात. बालिका ते किशोरी अवस्था, तरुणपणी, मध्यम वय व ज्येष्ठत्वात शरीरात होणाऱ्या बदलांनुसार उपयुक्त घटक हे आपल्याला, पोषणमूल्ययुक्त औरसचौरस आहारातूनच मिळतात.’’

काही महत्त्वाची निरीक्षणे

  • जीवनसत्त्वांची पूर्तता योग्य आहारातून केली जाते.

  • त्यांचा अभाव असल्यास निरनिराळे आजार, थायरॉईड, केस गळणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

  • अतिमेदयुक्त व साखर जास्त असलेल्या आहारामुळे स्थूलता निर्माण होते.

  • मिठाच्या जास्त सेवनामुळेही आरोग्याचे प्रश्न उभे राहतात.

  • हल्ली बहुसंख्य महिलांना घर व बाहेरील जबाबदाऱ्या समांतरपणे सांभाळाव्या लागतात. अशा सर्वांनी खाण्याच्या वेळा, पोषक घटकांचा समतोल असलेल्या आहाराकडे लक्ष द्यावे.

  • बाहेर जास्त वेळ राहावे लागणाऱ्या महिला पाणी कमी पितात.

  • त्यांनी थोड्या थोड्या वेळाने घोट घोट पाणी पिण्याची सवय लावणे चांगले.

मध्यमवयाच्या स्त्रियांनी डोळसपणे प्रकृतीच्या तक्रारी टाळण्यासाठी, योग्य आहाराचा मंत्र आचरणात आणावा. गृहिणींनी भिशी किंवा किटी पार्टी वगैरे प्रसंगी आपण काय व किती खातो आहोत, याबाबत दक्ष राहावे. प्रत्येकीने आपल्या शारीरिक व मानसिक गरजांनुसार पूर्तता करणारा आहार नेमका कोणता, कसा, केव्हा व किती प्रमाणात घ्यावा याबद्दल आहारतज्ज्ञांकडून अधिक जाणून घेतल्यास आपली आहाराविषयक जाण वाढेल. निरोगी जगण्यासाठी हा अभ्यास बरेच काही देऊन जाईल.

- सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ

टॅग्स :food newshealth