
Organ Donation : मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानातून तिघांना नवजीवन
नागपूर : रेल्वेतील निवृत्त कर्मचारी लक्ष्मीनारायण काशिनाथ नारनवरे यांना अपघात झाला. उपचारादरम्यान मेंदूमृत (ब्रेन डेथ) घोषित करण्यात आले. मात्र पत्नी आणि दोन मुलांनी अवयदानाचा निर्णय घेऊन यकृतासह दोन किडनीच्या दानातून तिघांना जीवनदान दिले. तर नेत्रदानातून दोघांना नवी दृष्टी मिळाली.
बॅनर्जी ले-आऊट भगवाननगर येथील ७५ वर्षीय रहिवासी लक्ष्मीनारायण नारनवरे यांचा २५ फेब्रुवारीला सकाळी अपघात झाला. त्यांना तत्काळ किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पाच दिवसांच्या उपचारानंतर दाद मिळत नसल्याने त्यांची मेंदूमृत्यू चाचणी करण्यात आली.
डॉ. केतन चतुर्वेदी, डॉ. प्रतीक उत्तरवार, डॉ. राजन बारोकर, डॉ. वीनेंद्र बेलेकर यांनी मेंदू मृत्यू घोषित केले. यानंतर पत्नी सरिता आणि मुलगा प्रदीप आणि प्रशांत यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.
यास होकार मिळताच विभागीय अवयवदान समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि सचिव डॉ. राहुल सक्सेना यांच्या सूचनेनुसार समन्वयक वीणा वाठोरे यांनी अवयवदानाची प्रतीक्षा यादी तपासली. यकृताच्या प्रतीक्षेत एक व्यक्ती न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये तर किंग्जवे हॉस्पिटल आणि केअर हॉस्पिटलमध्ये किडनीच्या प्रतीक्षेत होते.
असे झाले अवयवदान
न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये ५२ वर्षीय व्यक्तीला यकृतदान करण्यात आले. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. साहील बन्सल आणि डॉ. स्नेहा खाडे, डॉ.अश्विनी चौधरी यांनी केली. किडनी किंग्जवे रुग्णालयात ६२ वर्षीय महिलेस देण्यात आली.
किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया डॉ. प्रकाश खेतान, डॉ.अश्विनीकुमार खांडेकर, डॉ. वासुदेवराव रिधोरकर, डॉ. धनंजय बोकारे, डॉ. अजय ओसवाल, डॉ. चंद्रशेखर चाम आणि डॉ. अजय सूर्यवंशी यांनी केली.
दुसरी किडनी केअर हॉस्पिटलमधील ४२ वर्षीय महिलेला दान देण्यात आली. डॉ. रवी देशमुख, डॉ. अश्विनीकुमार खांडेकर, डॉ. रितेश सातारडे, डॉ. नितीन चोपडे यांनी किडनी प्रत्यारोपण केले. माधव नेत्र पेढीमध्ये नेत्रदान करण्यात आले.