
Smartphone : मुलांना स्मार्टफोन देताय का? काळजी घ्या, नाहीतर होतील वाईट परिणाम
Smartphone : तुम्हीही तुमच्या मुलाला स्मार्टफोन देत असाल आणि तुमच्या मुलालाही फोनची खूपच सवय लागली असेल तर हे त्याच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकतो. एकीकडे स्मार्टफोनने आपले जीवन पूर्णपणे बदलून टाकले आहे.
आपण दिवसभर स्मार्टफोनमध्ये स्वतःला गुंतवून घेत आहोत आणि त्याच वेळी आपण मुलांनाही स्मार्टफोनकडे जाण्यासाठी एकप्रकारे प्रवृत्त करत आहोत. मुलांच्या खेळाच्या किंवा अभ्यासाच्या वेळी आपली मुलं फोनवर टाईमपास करत बसतात.
आजकाल लहान मुलांना स्मार्टफोन देणं ही एक सवयच झाली आहे. मुलं जेवत नसतील किंवा रडत असतील तर त्यांना शांत करण्यासाठी फोन दिला जातो. Xiaomi इंडियाचे माजी प्रमुख मनु कुमीर जैन यांनी याबद्दल बोलताना सांगितले की मुलांच्या हितासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे हे आपण बघायला हवे. त्यांनी सर्वांना स्मार्टफोनच्या वापराबाबत सावध केलं.
ते म्हणतात की पालकांनी खरोखर लक्ष दिले पाहिजे आणि आपल्या मुलांना स्मार्टफोन देणं बंद केले पाहिजे. मुलांना कोणत्याही कारणासाठी फोन देऊ नका, असं आवाहनही जैन यांनी केलं आहे. त्याऐवजी मुलांना खेळ, उपक्रम किंवा काही छंद अशा बाहेरच्या जगात व्यस्त ठेवा.
स्मार्टफोनच्या वापराबाबत एक अहवाल आला समोर
सेपियन लॅबच्या अहवालानुसार, "सुमारे ६० ते ७० टक्के महिला अशा आहेत ज्यांना वयाच्या १० व्या वर्षापासून स्मार्टफोन मिळाला आहे. आता त्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना बळी पडत आहेत. पुरुषांसाठी, हा आकडा ४५ ते ५० टक्के आहे. पण त्यांच्यातही मानसिक आरोग्याच्या समस्या सारख्याच आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलांना फोनपासून दूर ठेवणं खूप गरजेचं आहे.
काय काळजी घ्याल?
फोनवर नेहमी पासवर्ड ठेवा. असे केल्याने, तुमची मुलं विचारल्याशिवाय किंवा न सांगता फोन घेऊ शकणार नाहीत. तुम्ही स्वतः तुमच्या मुलाला वेळ द्यावा. आजकाल बहुतेक पालक खूप व्यस्त जीवन जगतात, पण मुलांशी चांगले संबंध निर्माण करणे देखील महत्त्वाचे आहे. तुमच्या मुलांसोबत बोर्ड गेम खेळण्यासाठी वेळ काढा किंवा फिरायला जा. यामुळे, मुलं तुमच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवू शकतील.