
चेतना तरंग : आनंदाची अनुभूती
मानवी मन काय आहे, अस्तित्व म्हणजे काय, मन काय आहे, यांच्या मूळ रचनेबद्दल लोकांना काही माहीत नसते. तुम्ही सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करून पहा ते तुम्हाला सकारात्मक विचारांकडे घेऊन जाते का. ते तुमच्या मनात खोलवर अधिक नकारात्मक विचार निर्माण करते. तुमच्या आत कुठेतरी ते खदखदू लागतात. भीती उत्पन्न होते आणि तुमचे मन द्विधावस्थेत असते.
एक म्हणते, ‘सकारात्मक राहा. मी निरोगी होईन.’ कसले निरोगी? तुमच्या हातात काही नाही. कुठेतरी तुमचे चैतन्य खालावत जाते. तुमच्या मनात तुम्ही, ‘मी निरोगी आहे, मी निरोगी आहे.’ असा सांगण्याचा प्रयत्न करता आणि खोलवर आतमध्ये निराळेच काही शिजत असते. भीती निर्माण होते, सर्व बाबतीत द्विधा मनःस्थिती होते आणि संघर्ष डोके वर काढतो. हे असे एका महिलेबरोबर घडले.
ही महिला, ‘मी आनंदित आहे आणि माझ्या आनंदाला काहीही धक्का लागू शकत नाही.’ असा सकारात्मक विचार करीत होती. आणि मग घडले असे की तिच्या मुलाचा एका अपघातात मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू होतो तेव्हा आई आनंदी नसते. आता ती खूपच दुःखी झाली, परंतु, ‘‘अरे नाही, मी आनंदित आहे. माझ्या मुलाचा मृत्यू झाला तर काय झाले? मला काही होणार नाही. मी आनंदित आहे, मी चैतन्य आहे, मी परमानंद आहे.’’ असे म्हणण्याची तिची जुनी सवय सुरूच राहिली. ती हे पाच मिनिटे म्हणायची आणि मग पुढची पाच मिनिटे ती रडायची. ही तिच्यासाठी एक मोठी समस्या होऊन बसली.
सकारात्मक विचारांनी तिला इतका अपाय केला की ती वास्तवाला सत्य म्हणून बघूच शकत नव्हती. मी म्हटले, ‘तुझ्या आनंदाची तमा बाळगू नको. तू शोक पाळ, रड, अश्रू ढाळ, तू तुझ्या दुःखासोबत काही काळ व्यतीत कर.’ ती मनापासून रडली आणि त्या प्रक्रियेच्या अनुभवातून गेली तेव्हा तिला खूपच बरे वाटले. मग ती खरोखर आनंदी होऊ शकली. तिला ते जाणवले.
सकारात्मक विचारसरणी सुरुवातीला थोडे चांगले परिमाण देते. पण ती केवळ अस्तित्वाचा बाह्य स्तरावरच कार्य करते आणि सर्व कचऱ्याला गालिच्याच्या खाली ढकलून देते. पण तो कचरा तिथे किती वेळ राहणार? एक दिवस, दोन महिने, एक किंवा दोन वर्षे. तुम्हाला सगळे काही छान आणि मस्त वाटेल, ‘अरे वा, हे काम करतंय,’ आणि मग तुम्ही गालिच्याच्या खाली पाहाल तर त्या कचऱ्याचा दुर्गंध येऊ लागला असेल. भरपूर कचरा तिथून बाहेर निघेल.
आपल्याला सकारात्मक विचार करण्याची गरज नाही. विचार म्हणजे आपल्या अंतरंगाच्या अवकाशावरील ढग होत. ते येतात आणि निघून जातात. बघा आणि निरीक्षण करा, तुम्हाला दिसून येईल की तुम्ही अस्तित्वाच्या एका निराळ्या स्तरावर पोचू शकता. हे खरे आहे. हे स्वातंत्र्य आहे.