
Swasthyam 2023 : भुजंगासन
आपण आज बघणार आहोत विपरीत शयनस्थिती, म्हणजेच पोटावर झोपून करण्याचे आसन. या आसनाची पूर्णावस्था ही फणा काढलेल्या नागाप्रमाणे दिसते असे मानून यास भुजंगासन म्हटले जाते. लहान मुले, युवक-युवती, प्रौढ सर्वांसाठीच लाभदायक असे आसन आहे.
असे करावे आसन...
प्रथम पोटावर झोपावे. दोन्ही हाताचे तळवे खांद्याच्या रेषेत जमिनीवर टेकवावे.
दीर्घ श्वास घेऊन सोडावा.
श्वास घेत हनुवटी, छाती, पोटाचा भाग जमिनीपासून सावकाश वरच्या दिशेला उचलावा. मान वरच्या दिशेला घेऊन मागे वाकवावी. शक्यतो दोन्ही पाय जुळलेले असावेत.
प्रथमच हे आसन करणार आहेत, त्यांनी दोन्ही पायात साधारण एक फूट अंतर घेऊन आसन केले तरी चालेल. नियमित सरावाने पाय जुळू लागतील.
दोन्ही हाताचे कोपरे ताठच ठेवण्याचा प्रयत्न करावा.
आसनस्थिती पूर्ण झाल्यावर श्वसन संथ सुरू असावे. आसनात स्थिर राहावे. शक्य तेवढा वेळ आसनस्थिती टिकवावी. सावकाश श्वास सोडत आसन सोडावे. खूप झटका-ताणून आसन करू नये. कुठलेही आसन करताना पोट रिकामेच असावे. खूप गडबडीत, झटका-ताण घेऊन योगाभ्यास करू नये. योगाभ्यास हा शारीरिक-मानसिक स्वास्थ्यासाठी आहे, हे कायम लक्षात ठेवावे.
आसनाचे फायदे...
नियमित सरावाने उत्साह वाढतो, श्वसन क्षमता सुधारते.
पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होते. पाठीचे स्नायू मणका यांची कार्यक्षमता ताकद, लवचिकता वाढते.
ताण बसल्याने उंची वाढण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी लहान मुलांना उपयोगी.
शरीराची ठेवण नीट होण्यासाठी उपयोगी.
कारण बराच वेळ मोबाईल, आयपॅड, लॅपटॉप किंवा बराच वेळ एकाच जागी बसून काम केल्याने मान, खांदे पाठ दुखू लागते. हे दुखणे कमी होण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.
पोटातील इंद्रियांना ताण बसतो. त्यामुळे पचनसंस्था व उत्सर्जन संस्था यांचे कार्य सुधारते.
आम्लपित्त, वात, गॅसेस, पोटफुगी, बद्धकोष्ठता इ. त्रास कमी होण्यास मदत होते.
अस्थमा, दमा, श्वासाचे त्रास, मधुमेह, थायरॉईड आदी त्रास कमी होण्यास मदत होते.
फुफ्फुस व हृदयाचे कार्य अधिक सुरळीत होतो.
आत्मविश्वास वाढणे, न्यूनगंड कमी होतो.
काही शारीरिक समस्या, पाळीचे त्रास असतील तर योग्य मार्गदर्शन घेऊनच सराव करावा.