
Swasthyam 2023 : अर्धकटी चक्रासन
अर्धकटी चक्रासन हे एक उभे राहून करण्याचे म्हणजेच दंडस्थितीमधील सहज सोपे आसन आहे. आजकाल अनेक पालकांना मुलांची उंची कशी वाढेल ही समस्या असते. त्यासाठी बरेच उपाय केले जातात, परंतु खेळ, व्यायाम, योग्य आहार व नियमित योगासन सरावाने लहान मुलांची उंची वाढण्यास मदत होते. आपण आज अर्धकटी चक्रासनाची माहिती घेऊ.
असे करा आसन
प्रथम पायात खांद्याएवढे अंतर घेऊन ताठ उभे राहावे.
श्वास संथ सुरू ठेवावा. दोन्ही हाताचे तळवे मांडीला टेकलेले असावेत.
आता एक हात श्वास घेत बाजूने वर छताच्या दिशेला ताणू घ्यावा.
उजवा हात प्रथम वर घेऊन करणार असू तर डावा हात कंबरेवर ठेवावा. नंतर श्वास सोडत डाव्या बाजूला कंबरेतून वाकावे.
नजर स्थिर व श्वसन संथ सुरू असावे. जास्तीत जास्त वेळ स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा.
(आसनात खूपच ताण आला किंवा थरथर होऊ लागल्यास लगेच सावकाश उलटक्रमाने आसन सोडावे. दुसऱ्या बाजूने ही आसन करावे. आसन करताना, वाकताना शांतपणे व योग्य पद्धतीनेच करावे. आसन आदर्शस्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न करावा, तरच योग्य तो लाभ होईल).
आसनाचे फायदे
मुलांना उंची वाढविण्यास आणि आळस कमी होण्यास मदत होईल.
संपूर्ण शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत होईल, वाताचा त्रास कमी होईल.
कंबरेच्या व पाठीच्या स्नायूंची लवचिकता, ताकद व कार्यक्षमता वाढेल.
आत्मविश्वास व व्यक्तिमत्त्व विकासासाठी मदत होईल.
श्वसनाच्या त्रासावर लाभदायी आणि अतिरिक्त चरबी कमी होण्याससुद्धा उपयोग होईल.