
Cholesterol : तरुणवर्गाला काेलेस्ट्रॉलचा धोका; लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब कारणीभूत
मुंबई : सध्या उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सध्याच्या स्थितीत १५ ते ३० या तरुण वयोगटामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असल्याचे निदान होत आहे. चरबीयुक्त आहार, लठ्ठपणा, धूम्रपान, मधुमेह, अल्कोहोल, हायपोथायरॉईडीझम, किडनीचे आजार, कुशिंग सिंड्रोम, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक तसेच हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असणे ही यामागची कारणे असू शकतात.
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होतो, ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस (धमन्या अरुंद होणे) नावाच्या स्थितीस आमंत्रण मिळते. अशा प्रकारे एखाद्याला स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, छातीत दुखणे आणि परिधीय संवहनी रोगाचा धोका जास्त असू शकतो. कोलेस्ट्रॉलची पातळी साध्या रक्त चाचणीद्वारे मोजता येते. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी खाण्याच्या चांगल्या सवयींचे पालन करा आणि दररोज व्यायाम करा, असे अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. अमित शोभावत यांनी सांगितले.
कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी असलेल्या व्यक्तीला एकूण कोलेस्ट्रॉल पातळी मोजण्यासाठी लिपिड पॅनेल करण्यास सांगितले जाते. खाण्याच्या चांगल्या सवयी आणि व्यायाम हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करते.
– डॉ. निरंजन नायक, सल्लागार, पॅथॉलॉजिस्ट, अपोलो डायग्नोस्टिक
दररोज व्यायाम करा
अमेरिकन हार्ट असोसिएशनने वयाच्या २० व्या वर्षी कोलेस्ट्रॉल रक्त तपासणी करण्याची शिफारस केली आहे. कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी संतुलित जीवनशैलीचे पालन करणे आवश्यक आहे. धूम्रपान, मद्यपानाचे सेवन टाळा आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.