Weekly Rashi Bhavishya : साप्ताहिक राशिभविष्य (१२ मार्च २०२३ ते १८ मार्च २०२३) |Read weekly Rashi bhavishya in marathi langauge | weekly Horoscope - 12 March 2023 to 18 March 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope

Weekly Rashi Bhavishya : साप्ताहिक राशिभविष्य (१२ मार्च २०२३ ते १८ मार्च २०२३)

छंद-उपक्रमांमधून यश

मेष : सप्ताहाचा ट्रॅक नैसर्गिक पाठबळ देणार नाही. सिग्नलवर सांभाळा. कोणताही अतिरेक नको. वृद्धांनी सांभाळावं. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी संमोहनं टाळावीत. ता. १२ ते १४ हे दिवस ग्रहयोगांतून अडथळ्यांचे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ चा शुक्रवार छंद -उपक्रमांमधून यश देणारा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना आजची रंगपचमी बेरंगाची.

नोकरीत भाग्यसंकेत मिळतील

वृषभ : गुरू-शुक्राची साथसंगत राहीलच. मात्र, आगीशी खेळू नका, वाहन सांभाळा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतून भाग्यसंकेत मिळतील. ता. १४ व १५ हे दिवस विलक्षण गाठीभेटींचे, व्यावसायिक उलाढाली. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना आजची रंगपंचमी सावधगिरीने रंग उधळण्याची. स्त्रीवर्गाशी जपून वागा.

थोरामोठ्यांच्या गाठीभेटी होतील

मिथुन : रवी-बुध युतियोग पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांच्या ट्रॅकवर जबरदस्त क्‍लिक होईल. ता. १५ व १६ हे दिवस विलक्षण अनुभव देणारे. थोरामोठ्यांच्या गाठीभेटी, पुत्रोत्कर्षातून धन्यता. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी रंगपंचमीजवळ द्वाड मित्र सांभाळावेत. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी अन्नपाण्यातील संसर्ग जपावा.

शिस्त पाळा, वाद-विवाद टाळा

कर्क : सप्ताह जपूनच रंग उधळण्याचा. शिस्त पाळा. घरातील तरुणांशी वाद नकोतच. नवपरिणितांनी सासू-सासऱ्यांशी वाद टाळावा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात नोकरी व व्यावसायिक शुभलक्षणांचीच. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना आजची रंगपंचमी सार्वजनिक पथ्यं पाळण्याची. शेजाऱ्यांशी वाद टाळा, नोकरीत वरिष्ठांना सांभाळा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी विषाणू संसर्गापासून जपावं.

खंत किंवा नैराश्‍य जाईल

सिंह : आजची रविवारची रंगपंचमी सप्ताहात रंग भरणारी. तरुणांना हा रंगपंचमीचा सप्ताह सर्व प्रकारांतून छान रंग उधळणारा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींची विशिष्ट खंत किंवा नैराश्‍य जाईल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ ते १५ हे दिवस विलक्षण गतिमान राहतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी उत्तरं देताना दुरुत्तरं टाळावीत. अर्थातच, घरातील मानसिक पर्यावरण जपावं.

न्यायालयीन प्रकरणात यश

कन्या : रंगपंचमीचा सप्ताह निश्‍चितच आचारसंहिता पाळण्याचा. वागण्या-बोलण्यातील आणि खाण्या-पिण्यातील पथ्यं पाळाच. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १४ चा मंगळवार वैवाहिक जीवनात रंग उधळणारा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्ट प्रकरणातून यश; मात्र भाऊ-बहिणीशी वाद नकोत. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना श्‍वानदंश होऊ शकतो.

स्पर्धेत यश, नोकरीचे कॉल येतील

तूळ : रंगपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर संमिश्र स्वरूपाचं ग्रहमान राहील. संशयात्मक वागणं सोडून द्या. घरातील वृद्धांची मनं जपा. बाकी रवी-बुध युतियोगाचं फिल्ड. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १५ ते १७ हे दिवस वैयक्तिक उपक्रमातून छानच. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट स्पर्धात्मक यश. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीचे कॉल येतील.

वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल

वृश्‍चिक : सप्ताह थोडा संमिश्र ग्रहमानाचा. आजच्या रंगपंचमीच्या प्रभावात आचारसंहिता पाळा. विषाणू संसर्ग जपा. बाकी ज्येष्ठा नक्षत्रास ता. १३ ते १५ हे दिवस वैयक्तिक छंद वा उपक्रमांतून निश्‍चितच रंग उधळतील. विशाखा व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जपावं. अनुराधा नक्षत्रास घरातील वृद्धांची काळजी घ्यावी लागेल.

नोकरीत चांगला कालखंड

धनू : सप्ताहातील राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये आपल्या राशीचा भाव वधारलेलाच राहील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अद्वितीय लाभ होतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत भाव खाऊन जातील. ता. १५ व १६ हे दिवस मोठ्या सुवार्तांतून मोठ्या रंगसंगतींचेच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी धारदार वस्तूपासून जपावं. प्रवासात पाकीट सांभाळा.

बॅंकांमधील कामं होतील

मकर : सप्ताह व्यावसायिकांना बॅंकांची कामं करून देणारा. आजचा रविवार विलक्षण गाठीभेटींचा ठरेल. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट आत्यंतिक सुखपर्यवसाथी राहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना परिस्थितिजन्य लाभ होतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी माध्यमांतून लाभ. मात्र, आजचा रविवार रंगातून प्रदूषणाचा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी श्‍वानदंशापासून जपावं.

मोठे करार-मदार होतील

कुंभ : राशीतील रवी-बुध युतियोगाची पार्श्‍वभूमी पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास वैयक्तिक छंद किंवा उपक्रमांतून उत्तमच राहील. ता. १५ ते १७ मार्च हे दिवस चढत्या क्रमाने शुभ राहतील, मोठे करार-मदार होतील. सरकारी माध्यमांतून यश. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखी-मध्यस्थीतून लाभ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार प्रवासात बेरंगाचा.

नोकरीत प्रसन्नता असेल

मीन : सप्ताहातील ग्रहांचं फिल्ड भावनाप्रधान व्यक्तींना बेरंग करणारं ठरू शकतं. सप्ताहात कोणत्याही संसर्गापासून जपाच. अर्थातच कोणत्याही दुष्ट संपर्कातूनसुद्धा जपा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात जपावं. बाकी शुक्रभ्रमणाच्या स्पंदनांचा लाभ उठवालच. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील घटना प्रसन्न ठेवतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी वागण्या-बोलण्यात सावधानता बाळगावी. विद्युत उपकरणांपासून जपावं.