शिखर धवनचा विक्रम

बंगळूर : अफगाणिस्तान संघाकरता कौतुकाचा बहर आणि कसोटी क्रिकेट पदार्पणाचा जोश पहिल्या दोन तासांतच संपला. एम. चिन्नास्वामी मैदानावर शिखर धवनने उपहाराअगोदर शतक ठोकून नवे शिखर गाठले. सामन्याच्या पहिल्या दिवशी लंचपूर्वी शतक झळकाविणारा शिखऱ पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 27 षटकांत नाबाद 158 धावांची भागीदारी रचून भारतीय सलामीवीरांनी अफगाण खेळाडूंना कटू सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली. उपहाराला खेळ थांबला असताना शिखर धवन 91 चेंडूत 19 चौकार आणि 3 षटकार ठोकून नाबाद 104 धावांवर खेळत होता. मुरली विजय संयमी 41 धावा करून त्याला साथ देत होता. 

नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार अजिंक्‍य रहाणेने प्रथम फलंदाजी करायचा अपेक्षित निर्णय घेतला. रहाणेने फलंदाजी मजबूत करताना कुलदीप यादवऐवजी अतिरिक्त फलंदाज संघात घेतला. शिखर धवन आणि मुरली विजयने सलामी करताना पहिल्यापासून सकारात्मक पवित्रा घेतला. अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी उत्साहाच्या भरात आखूड टप्प्याचा मारा केला. 13 षटकांनंतर कर्णधार स्टानिकझाईने त्याचे अस्त्र बाहेर काढले. त्याने राशिद खानला गोलंदाजीला बोलावले. शिखर धवनने आपल्या आयपीएल संघाच्या सहकाऱ्याचे स्वागत तीन चौकार मारून केले. 

शिखर धवनला असा काही सूर गवसला होता की त्याला रोखणे कठीण जायला लागले. शिखरने तीन षटकार मारताना नजर राशिद खान आणि मुजीबवर रोखली. अर्धशतकानंतर शिखर धवनच्या आक्रमणाला अजून धार आली. आता त्याचे ध्येय उपहाराअगोदर शतक ठोकण्याचे होते. 

उपहाराला दोन षटके बाकी असताना शिखर धवनने गिअर बदलला. त्याने मुजीब रेहमानवर हल्ला करत तीन चौकार ठोकले. नंतर राशिद खानला सुंदर कव्हर ड्राईव्ह मारून शतक साजरे केले. पहिल्यांदा शिखरने त्याच्या खास शैलीत संघाकडे बघून दोनही हात फैलावत आनंद साजरा केला आणि मग गलका करणाऱ्या प्रेक्षकांकडे बघून जोरदार शड्डू ठोकला. 

कसोटी पदार्पणाच्या पहिल्या दोन तासात 5 दिवसांचा सामना खेळणे किती वेगळे आहे याची झलक अफगाणिस्तान संघाला चाखायला मिळाली आहे. 

भारतीय संघ 
शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. आश्‍विन, ईशांत शर्मा, उमेश यादव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com