सामाजिक समस्यांवर देखाव्यांतून भाष्य

पुणे - समाज भान जागवणारा ‘मराठी शाळा’ हा जिवंत देखावा, लक्ष वेधणारा भवदिव्य असा मयूर महाल, रक्तबीजरासूर राक्षसाचा वध हा अनोखा हलता देखावा अन्‌ रंगबिरंगी छत्र्यांमधून साकारलेला सेल्फी पॉईंट... असे विविध देखावे पाहण्यासाठी नवी पेठ, सारसबाग आणि स्वारगेट परिसरात नागरिक गर्दी करत आहेत. ऐतिहासिक देखाव्यांसह यंदा समाज प्रबोधन करणारे आणि विविध ज्वलंत विषयांवर प्रकाश टाकणारे वैविध्यपूर्ण देखावे साकारण्यात आले आहेत. पौराणिक, धार्मिक, सामाजिक देखाव्यांसह जिवंत देखावेही येथे पाहायला मिळतील. यासोबतच काही गणेश मंडळांनी साधेपणाने भर दिला आहे.

नवी पेठेतील अष्टविनायक मित्र मंडळाने काल्पनिक महाल तयार केला आहे तर शिवांजली मित्र मंडळाने एलईडी लायटिंगने साकारलेला ‘माता तुळजाभवानीचा रथा’चा देखावा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. श्री गणेश मित्र मंडळाने ‘मराठी शाळा’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. मराठी शाळा बंद होत असून, त्याकडे सरकारचे लक्ष वेधणारा हा देखावा आहे. साने गुरुजी तरुण मंडळाचे यंदाचे ८० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने काल्पनिक महाल साकारण्याची रित मंडळाने यंदाही कायम ठेवली आहे. मंडळाचे यंदा ६० फूट उंचीचा ‘मयूर महाल’ साकारला आहे. या महालात बाप्पाची विलोभनीय मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. तर टिळक रोड ओंकार मित्र मंडळाने महाराष्ट्राला खळखळून हसविणाऱ्या दादा कोंडके यांच्यावर आधारित जिवंत देखावा साकारला आहे. तसेच, टिळक रोड एकता मंडळाने विविधांगी छत्र्यांमधून सेल्फी पॉईंट बनवला आहे. लोकमान्यनगर येथील गणपती मंडळांनीही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. नवनाथ (अचानक) तरुण मंडळाने जिवंत देखावा आणि श्री राणाप्रताप मंडळाने काल्पनिक महाल साकारला आहे. स्वारगेट परिसरातील वारकरी सेवा प्रतिष्ठानने बालाजी रथ साकारला आहे, तर स्वारगेट पोलिस कॉलनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे.

सारसबाग परिसरातील शिवराज मित्र मंडळाचा ‘रक्तबीजासूर राक्षसाचा वध’ हा हलता देखावा आणि महर्षीनगर गणेशोत्सव मंडळाचा अष्टविनायक रथ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. यंदा काही मंडळांनी विद्युत रोषणाईचा देखावा आणि सामाजिक भान देणारे विषय हाताळले आहेत.

आर्वजून पाहावेत असे देखावे 
 श्री गणेश मित्र मंडळ
 साने गुरुजी तरुण मंडळ
 टिळक रस्ता एकता मित्र मंडळ
 शिवराज मित्र मंडळ
 टिळक रोड ओंकार मित्र मंडळ
 शिवांजली मित्र मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com