पिंपरी-चिंचवड शहरात पौराणिक देख्याव्यांसह जनजागृती

शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

भोसरी - भोसरीतील गणेश मंडळांनी ऐतिहासिक, पौराणिक देखावे, आकर्षक मंदिरे, महाल, सजावट आदींबरोबरच जिवंत देखाव्यातून विविध सामाजिक विषय हाताळून नागरिकांत जनजागृतीचे काम केले आहे. काही मंडळानी साधेपणाने उत्सव साजरा करून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

भोसरी - भोसरीतील गणेश मंडळांनी ऐतिहासिक, पौराणिक देखावे, आकर्षक मंदिरे, महाल, सजावट आदींबरोबरच जिवंत देखाव्यातून विविध सामाजिक विषय हाताळून नागरिकांत जनजागृतीचे काम केले आहे. काही मंडळानी साधेपणाने उत्सव साजरा करून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

आळंदी रस्त्यावरील श्री गणेश तरुण मंडळाने तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली. राहुल गवळी मंडळाचे अध्यक्ष आहेत. श्रीराम कॉलनी मित्र मंडळाने सुवर्ण मंदिर उभारल्याची माहिती अध्यक्ष अक्षय रसाळ यांनी दिली. दिघी रस्त्यावरील नवज्योत मित्र मंडळाने इंडोनेशियातील कंबोडियन मंदिराची चाळीस फुटी प्रतिकृती साकारली आहे. मंदिरासमोरील भव्य हत्तीची प्रतिकृतीही नागरिकांचे लक्ष वेधत आहे. प्रशांत फुगे मंडळाचे अध्यक्ष आहेत. नरवीर तानाजी मित्र मंडळाने ‘निसर्ग एक महाप्रलय’ या जिवंत देखाव्यातून निसर्गाचा समतोल राखला नाही तर काय होत या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. अमोल फुगे मंडळाचे अध्यक्ष आहेत. गवळीनगरातील उंबऱ्या मारुती मित्र मंडळाने आकर्षक सजावटीत गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. कुंडलिक लांडगे अध्यक्ष आहेत. 

पीसीएमसी चौकातील भगवान गव्हाणे तरुण मंडळाने देहूगावातील गाथा मंदिराच्या प्रवेशद्वाराची कमान उभारली आहे. अजित रमेश गव्हाणे अध्यक्ष आहेत. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळाने मनी मल्हार राक्षसाचा वध हा पौराणिक देखावा उभारला आहे. आकाश गव्हाणे मंडळाचे अध्यक्ष आहेत. गव्हाणे वस्तीतील जय महाराष्ट्र मित्र मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा हलता देखावा उभारला आहे. नीलेश लांडगे मंडळाचे अध्यक्ष आहेत. भोजेश्‍वर मित्र मंडळाने गंगामाई रुसली माणुसकी दिसली या हलत्या देखाव्यातून कोल्हापूर सांगलीमध्ये आलेल्या महापुरानंतर मदतीच्या ओघाने दिसलेली माणुसकीचे दर्शन घडविले आहे. 

बापूजीबुवा चौकातील शंकर लोंढे अध्यक्ष आहेत. माळी आळी मित्र मंडळाने ‘गंगा अवतरण’ देखावा सादर केला आहे. प्रवीण लोंढे अध्यक्ष आहेत. लोंढे तालीम मित्र मंडळाने शिव शंकराचे तांडव नृत्य हा हलता देखावा सादर केला आहे. जयवंत लोखंडे अध्यक्ष आहेत. आझाद मित्र मंडळाने वीर बाजी प्रभू-पावनखिंड हा देखावा सादर केला आहे. सचिन शंकर लांडगे अध्यक्ष आहेत. 

भोसरी गावठाणातील पठारे-लांडगे तालीम व्यायाम मंडळाने विघ्नहर्ता मंदिर उभारले आहे. मंडळाचे उत्सवप्रमुख आमदार महेश लांडगे असून, अध्यक्ष अशोक पठारे आहेत. फुगे माने तालीम मंडळाने ‘कुंभकर्णाचा वध’ हा हलता देखावा सादर केला. पोपटराव फुगे अध्यक्ष आहेत. समस्त गव्हाणे तालीम मंडळाने स्वराज्य रक्षक संभाजी हा हलता पौराणिक देखावा सादर केला आहे. सुनील गव्हाणे मंडळाचे अध्यक्ष आहेत. 

निवडणुकीचा प्रचार
विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्याने मंडळाच्या आरतीसाठी बोलविण्यात आलेले नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आरतीनंतर पक्ष कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना उमेदवारास मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.