पावसाने बदलला अचानक ‘गिअर’

नागपूर - सोमवारची सुरुवातच रिमझिम व संततधार पावसाने झाली. सकाळी हलक्‍या पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाने दुपारी अकराच्या सुमारास अचानक ‘गिअर’ बदलला मुसळधारेसह जवळपास तीन ते चार तास धो-धो बरसला. सकाळी नऊ-दहाला सुरू झालेला पाऊस दुपारी दोनलाच थांबला. 

पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. यात शिवाजी सायन्स महाविद्यालयीसमोरील रस्त्यासह रामदासपेठ सेंट्रल बाजार रोड, छत्रपती चौकापासून पूर्व व उत्तरेकडील रिंग रोड, ढगे बंगला हुडकेश्‍वर रोड, इतवारी दहीबाजार रोड, मानेवाडा रोड, मेडिकल चौक ते एस. टी. बसस्थानक रोड, माटे चौक ते प्रतापनगर चौक, सेंट्रल एव्हेन्यू या प्रमुख मार्गासह अनेक वस्त्यांतील रस्तेही पावसाने दिसेनासे झाले. 

विशेष म्हणजे रस्त्यांच्या बाजूला असलेल्या स्टॉर्म ड्रेन लाइन तुंबल्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी जमा झाले होते. अनेक चौकांत सिमेंट रस्त्यांचा उतार असल्याने तेथे तलाव निर्माण झाल्याचे दिसून आले. यात जगनाडे चौक, लोकांची शाळा चौक, बजाजनगर चौक, छत्रपतीनगर चौक, पडोळे हॉस्पिटल चौक, प्रतापनगर चौक, शंकरनगरसह अनेका चौकांचा समावेश आहे. रस्ते व चौक जलमय झाल्याने वाहनधारकांची चांगलीच फजिती झाली. छत्रपतीनगर चौकात अनेक वाहने पाण्यात तरंगताना आढळून आली. दुकानांमध्ये पाणी शिरले. प्रतापनगर चौकापासून खामला चौकापर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. मात्र, कंत्राटदार कंपनीने महापालिकेच्या स्टॉर्म ड्रेन लाइनचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने कोतवालनगर, प्रतापनगराच्या काही भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. याशिवाय गरोबा मैदान येथील लांजेवार यांच्या घरासमोर, लालगंज येथील झाडे चौक, प्रतापनगर प्लॉट क्रमांक ३१, सोमलवाडा चौक, शाहूनगर मानेवाडा रोड, शांतीनगर एमएसईबी ऑफिस या परिसराला जलाशयाचे स्वरूप आले होते. 

गड्डीगोदाम चौकातही पाणी साचले. याशिवाय महात्मे हॉस्पिटल, श्रीनगरातील ओम अपार्टमेंटसह अनेक बहुमजली इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी जमा झाल्याने नागरिकांना बाहेर पडणेही कठीण झाले. अनेकांची वाहने पाण्यात बुडाली होती. मानेवाडा ते बेसा या प्रमुख रस्त्यावर नुकताच तयार करण्यात आलेल्या पुलाजवळील रस्ताच खचला. त्यामुळे येथे नागरिकांत भीती निर्माण झाली. 

पोलिसांनी येथे पोहोचून वाहतूक रोखली. काही वेळानंतर एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली. आता वर्षभरापूर्वीच पूल व रस्ता तयार करण्यात आल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. वर्षभरातच पुलाचा रस्ता खचल्याने कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे अधोरेखित झाले. एवढेच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभागानेही याकडे डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे. सिरसपेठ येथे भिंत पडली. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.

झाडे पडली
पावसाच्या तडाख्यात तीन ठिकाणी झाडे पडली. सिव्हिल लाइन्स परिसरात झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली. श्रीमोहिनी कॉम्प्लेक्‍स समोरील भागात विजेच्या तारांवर झाड पडले. सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही. धरमपेठ भागात अलंकार टॉकीज समोरील झाड पडले. धंतोलीत श्‍युअरटेक हॉस्पिटलजवळदेखील झाड पडल्याने परिसरात काही काळ रहदारी ठप्प राहिली.

तरुणाईचा ‘ओव्हर फ्लो’ 
पावसाळा आणि फुटाळा व अंबाझरीचे नाते अतूट आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेकडो नागपूरकरांनी फॅमिलीसह फुटाळा व अंबाझरीच्या दिशेने धाव घेत या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला. तरुणाई आणि लहान मुलेच नव्हे, ज्येष्ठ नागरिकही मागे नव्हते. अनेकांनी गरमागरम पकोडे आणि अमेरिकन स्वीट कॉन्सर्चा (मक्‍याचे कणीस) आनंद घेतला. 

सोशल मीडियावरही पाऊस
कोणतीही घटना किंवा ‘इव्हेंट’ असो, सोशल मीडियावर भावना व्यक्‍त करण्याची अलीकडच्या काळात जणू फॅशनच झाली आहे. पाऊसही त्यातून सुटला नाही. मंगळवारच्या धुवाधार पावसानंतर अनेकांनी शब्दांच्या माध्यमातून मनातील भावना व पावसाचे फोटो फेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्‌विटर व अन्य सोशल मीडियावर ‘पोस्ट’ केल्या. 

सीमेवरील वस्त्यांमध्ये गैरसोय  
न्यू नरसाळा रोडवरील माउलीनगरातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे धान्यासह दैनंदिन वापराच्या घरगुती साहित्याची नासधूस झाली. विहिरीसह सेप्टिक टॅंकमध्ये रस्त्यावरून वाहणारे पाणी शिरल्याची तक्रार तेथील रहिवासी सरिता पाटील यांनी केली. गटारी, पावसाळी नाल्यांसह नळाची सुविधा नसल्याची शोकांतिकाही स्थानिकांनी बोलून दाखविली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com