सामाजिक संदेशांवर भर

शुक्रवार पेठ 
पुणे - धार्मिक, आध्यात्मिक विषय आणि देवादिकांच्या कथांवर आधारित देखावे शुक्रवार पेठेतील गणेश मंडळांनी केले आहे. विशेषतः काल्पनिक विषयांवरचे देखावेही आहेत. देखाव्यांतून सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न मंडळांनी केला आहे. 
अकरा मारुती कोपरा मित्रमंडळाने स्वामींचा दत्तअवतार हा हलता देखावा केला आहे. अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा काल्पनिक महाल उभा केला आहे. विशेष म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या तीन मूर्ती पैकी सर्वप्रथम घडविण्यात आलेल्या मूर्तीचे येथे भाविकांना दर्शन घडते. येथेच अकरा मारुती मंदिर आहे. या ठिकाणी या तीनही मूर्ती १९८५ पर्यंत पाहायला मिळत होत्या. मात्र ट्रस्टने त्यांची पहिली मूर्ती या मंडळाला भेट दिली. एक मूर्ती कोंढवा येथे आहे. तर सध्याची तिसरी मूर्ती बुधवार पेठेतील ट्रस्टच्या मंदिरात असते. ही तिसरी मूर्ती दरवर्षी आपल्या बेलबाग चौकातील उत्सव मंडपात पाहायला मिळते.  
अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा कुबेर महालात श्रींची मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. उत्सवानिमित्त मंडळ महिलांचे अथर्वशीर्ष, चार दिवस गणेश याग, वारकऱ्यांचे भजन, अन्नकोट आदी उपक्रम राबवित आहे. परिसरातील एका कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाचा खर्चही मंडळाने उचलला आहे. 
सेवा मित्र मंडळाने जिवंत देखाव्याद्वारे ‘हरवलेलं बालपण’ हा देखावा केला आहे. लाकडी गणपती मंडळाने मूषकांच्या जलदिंडीद्वारे पाणी वाचवा हा संदेश दिला आहे. राजर्षी शाहू चौक गणेश मंडळाने ५८ फूट उंचीचे फायबरचे वाराणसी येथील ‘काशी विश्‍वेश्‍वर मंदिर उभे केले आहे. 

सदाशिव पेठ  - पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांसह प्रबोधनही
वाहतुकीसाठी मंडळांकडून उंचावर देखावे

पुणे - पौराणिक, ऐतिहासिक कथांसह, समाजप्रबोधनपर देखावे सादर करून सदाशिव पेठेतील गणेश मंडळांनी वास्तव जीवनावर प्रकाश टाकला आहे. उत्सवादरम्यान वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी काही मंडळांनी नऊ-दहा फूट उंचीवर देखावा साकार करून त्यात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. 

रावबहादूर कुमठेकर रस्त्यावरील लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या दर्शनाला भाविक आवर्जून भेट देत आहेत. नागनाथपार मित्र
मंडळाचे यंदा सव्वाशेवे वर्ष आहे. गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिराची प्रतिकृती उभारून त्यामध्ये रिद्धी-सिद्धी महागणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाने रस्त्यापासून दहा फूट उंचीवर ४० बाय ४० आकाराचा मंडप उभारला आहे. मंडपात आठ सीसीटीव्ही कॅमेरे असून, आठ सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. स्वतंत्र कंट्रोल रूमदेखील उभारली आहे. श्रींची विसर्जन मिरवणूक ‘सुवर्णरथा’तून निघेल.

शनिपार मित्र मंडळाचे ही सव्वाशेवे वर्ष आहे. त्यांनी ‘अहम्‌ ब्रह्मास्मी’ हा देखावा साकारला आहे. ब्रह्मांडाविषयीची माहिती तसेच मनुष्याचे आयुष्य आणि
जीवनशैलीतील विविध टप्प्यांचे मार्मिक वर्णन देखाव्यातून साकारले असून, नागरिक देखावा पाहायला गर्दी करू लागले आहेत.   

छत्रपती राजाराम मंडळाने यंदा शिर्डी येथील साईबाबांच्या समाधी मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली आहे. द्वारकामाई, खंडोबाचे मंदिराचीदेखील प्रतिकृती येथे पाहायला मिळत आहे. मंडळाचे यंदा १२६ वे वर्ष आहे. साईबाबांना समाधी घेऊन २०१८ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. साईंच्या समाधी शताब्दी वर्षानिमित्त मंडळाने हा देखावा केला आहे. आझाद मित्र मंडळाने ‘आजचे-उद्याचे तुम्ही’ या संकल्पनेवर जिवंत देखावा साकारला आहे. टिळक रोड एकता मित्र मंडळाने बालाजी रथात श्रींची मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. 
नवजवान मित्रमंडळाचा अघासुराचा वध हा हलता देखावा आहे. पेरुगेट मित्र मंडळाने स्लाइड शोच्या माध्यमातून ‘कहानी काश्‍मीर की’ या वास्तववादी विषयाद्वारे समाजप्रबोधनाची परंपरा कायम ठेवली आहे. 

ग्राहक पेठ मित्र मंडळाचा ‘चिनी वस्तूंवर बहिष्कार’ तर खजिना विहीर तरुण मंडळाचा ‘श्रीकृष्णाची रासलीला’, निंबाळकर तालीम मंडळाचा गजेंद्र मोक्ष हा हलता देखावा असून, चिमण्या गणपती मंडळ, दिग्विजय मित्रमंडळाने विद्युत रोषणाई केली आहे. नातूबाग मित्र मंडळानेदेखील विद्युत रोषणाईसह मंदिर उभारले आहे.

आवर्जून पाहावे असे... 
लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्ट 
नागनाथपार मित्रमंडळ 
छत्रपती राजाराम मंडळ
पेरुगेट मित्रमंडळ 
खजिना विहीर मित्रमंडळ 
निंबाळकर तालीम मंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com