देखाव्यांतून अवतरली पौराणिक-ऐतिहासिक रूपं

Tuesday, 29 August 2017

कसबा पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ

पुणे - पौराणिक-ऐतिहासिक विषयांवरील भव्य हलते देखावे... वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती आणि वेगवेगळी काल्पनिक मंदिरं... त्यात विराजमान झालेली बाप्पांची सर्वांगसुंदर मूर्ती... हे सर्व पाहण्यासाठी मोठ्यांबरोबरच बालचमूंची होणारी गर्दी... धूप-अगरबत्तींबरोबरच आरत्या-भक्तिगीतांचा ‘दरवळ’... या वातावरणामुळे पुण्याचा कसबा पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ हा भाग भक्तिमय झाला आहे.

कसबा पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ

पुणे - पौराणिक-ऐतिहासिक विषयांवरील भव्य हलते देखावे... वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती आणि वेगवेगळी काल्पनिक मंदिरं... त्यात विराजमान झालेली बाप्पांची सर्वांगसुंदर मूर्ती... हे सर्व पाहण्यासाठी मोठ्यांबरोबरच बालचमूंची होणारी गर्दी... धूप-अगरबत्तींबरोबरच आरत्या-भक्तिगीतांचा ‘दरवळ’... या वातावरणामुळे पुण्याचा कसबा पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ हा भाग भक्तिमय झाला आहे.

कसबा पेठ : मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपती मंडळाने यंदा पुण्यातील जुना वाडा उभारला आहे. पूर्वी पुण्यातील वाड्यांमध्ये उत्सव कशा पद्धतीने साजरा व्हायचा, हा इतिहास त्यांनी आपल्या आकर्षक देखाव्यातून समोर आणला आहे. हा वाडा पाहताना कसबा गणपती मंदिराचीच प्रतिकृती वाटत आहे. या दोन मजली वाड्यातील जुन्या पद्धतीचे दिवे, लाकडावरील नक्षीकाम लक्ष वेधून घेत आहे. या देखाव्याच्या शेजारीच नवग्रह मित्र मंडळाने ५५ फूट उंच बुद्ध मंदिर उभे केले आहे. थायलंडमधील मंदिराची ही प्रतिकृती आहे. त्यावर प्रकाशझोत टाकल्याने हा देखावा उजळून दिसत आहे.

फणी आळी मंदिर ट्रस्टने ‘शिवशाहीचा शिरस्ता’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. महिला अत्याचारावर आधारित हा देखावा आहे. पवळे चौकातील भगतसिंग मित्र मंडळाने बिरसा मुंडा यांच्यावर आधारित तर क्रांतिवीर राजगुरू मित्र मंडळाने ‘काळ हा सगळ्यांचा मार्गदर्शक’ यावर आधारित चलचित्र मालिका सादर केली आहे. त्वष्टा कासार समाज संस्थेने ‘मोबाईल शाप की वरदान’ हा विषय घेऊन मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंग्यचित्राचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हा नावीन्यपूर्ण देखावा कौतुकास्पद ठरत आहे. याशिवाय, मैदानी खेळाचे महत्त्व सांगणारेही पोस्टर्सही लावले आहेत. गांवकोस मारुती संस्थेचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने कुठलाही देखावा उभा करण्यापेक्षा संस्थेने व्याख्यानमाला, आरोग्य तपासणी शिबिर, बालमेळावा असे उपक्रम आयोजित करून गणेशभक्तांची खास दाद मिळवली आहे. राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ, जनजागृती मंडळ, नरवीर तानाजी मंडळ, भारतमाता मित्र मंडळ यांनी साधेपणावर भर दिला आहे.

रास्ता पेठ : सूर्योदय मित्र मंडळ कबड्डी संघाने ‘शिवाजी महाराजांना भवानी मातेचा साक्षात्कार’ हा हलता देखावा उभारला आहे. जवळपास १६ फूट उंच मूर्ती, तुतारी वाजवणारे मावळे, जगदंब-जगदंब असा घुमणारा आवाज यामुळे देखावा पाहण्यास गर्दी होत आहे. दारूवाला पूल मंडळाने ‘कालिकामातेचे रौद्ररूप’ हा भव्य हलता देखावा उभारला आहे. तो पाहण्यासही गणेशभक्तांची गर्दी होऊ लागली आहे. श्री दत्त क्‍लब मंडळाने फुले आणि रंगीबेरंगी झालर लावून ‘श्रीं’भोवती सजावट केली आहे. सम्राट मंडळ, जवाहर मंडळ, प्रताप मित्र मंडळ, सुभाष तरुण मंडळ, मराठा मित्र मंडळ, वीर तानाजी बाल मंडळ, अरुणा चौक मंडळ यांनी साधेपणाने देखावे सादर केले आहेत.

भवानी पेठ : पालखी विठोबा चौकातील जय महाराष्ट्र तरुण मंडळ पौराणिक विषयावर हलता देखावा सादर केला आहे. त्यातून हत्तीच्या कानातून घेतलेला जन्म दाखवला आहे. विघ्नहर तरुण मंडळाचे यंदा ५० वे वर्ष आहे. फेटा घातलेली आणि पूर्ण पांढऱ्या रंगातील मूर्ती येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बनकर तालीम संघाची मूर्तीसुद्धा तितकीच सुंदर आहे. आदर्श बाल मंडळाने ‘कुंभकर्णाचा निद्रानाश’ हा हलता देखावा उभारला आहे. जवळपास १४ फूट उंच कुंभकर्ण आणि त्याला उठवण्यासाठी पिपाणी, तुतारी, डफ असे वाद्य घेऊन सरसावलेले सैन्य हा देखावा पाहायला मोठ्यांबरोबरच बालचमूंची गर्दी होत आहे. नवरंग युवक मित्र मंडळाने देखावा म्हणून बालाजी रथ उभारला आहे. भवानी तलवार मंडळाने साधेपणाने उत्सव साजरा केला आहे.

आवर्जून पाहावे असे... 
नवग्रह मित्र मंडळाचे ५५ फूट उंच बुद्ध मंदिर
फणी आळी मंदिर ट्रस्टचा ‘शिवशाहीचा शिरस्ता’ हा जिवंत देखावा
त्वष्टा कासार समाज संस्थेचे मोबाईलवर आधारित व्यंग्यचित्र प्रदर्शन
आदर्श बाल मंडळाचा ‘कुंभकर्णाचा निद्रानाश’ हा हलता देखावा
सूर्योदय मित्र मंडळ कबड्डी संघाचा ‘शिवाजी महाराजांना भवानीमातेचा साक्षात्कार’ देखावा