Pune Accident: गाढ झोपेत असताना काळाचा घाला; बस अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, तर 22 जखमी
कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. ट्रक बसवर आदळल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत. त्यांना ससूनमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर चारजणांचे मृतदेहही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
कोल्हापूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा आणि साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. रात्री 2:15 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. सर्व प्रवासी गाढ झोपेत असतानाच हा अपघात झाला. पुण्यातील पुणे-बेंगलोर महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला.
या अपघातात 22 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच कात्रज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्समध्ये एकूण 21 प्रवासी, 1 ड्राइवर आणि एक क्लिनर असे एकूण 23 जण होते. साखरेच्या ट्रकमध्ये एक ड्राइवर, 2 मालक असे एकूण 3 जण होते. त्यापैकी ससून हॉस्पिटल येथे 05, चव्हाण हॉस्पिटल येथे 09 व नवले हॉस्पिटल येथे 06, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे 02 असे एकूण 22 जण उपचार घेत आहेत.
दरम्यान, अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली.
मात्र रात्रीचा अंधारप असल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. अपघातातील इतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही खासगी ट्रॅव्हल बस कोल्हापूरहून डोंबिवलीला जात होती. नीता ट्रॅव्हल्सची ही बस होती. तर मालवाहतूक करणारा ट्रक कोल्हापूरहून अंबरनाथकडे जात होता. भरधाव असलेल्या मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट खासगी ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला.
हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. या अपघातात 22 प्रवाशी जखमी झाले. या सर्वांना ससून आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. तर या भीषण अपघातात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असल्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी दिली.