ST Discount : महिलांना निम्मंच तिकीट पण या योजनेमुळे महामंडळाचाही कोटींचा फायदा
एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर 'महिला सन्मान योजना' म्हणून ओळखले जाईल.
नव्या योजनेमुळे १६-१७ लाख महिला प्रवाशांपैकी दररोज १२-१३ लाख महिला प्रवाशांना ५० टक्के तिकीट सवलतीचा फायदा होईल. सध्या १२ वर्षांखालील मुलींना आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत * ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ महिलांना १०० टक्के सवलत दिली जाते
यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या सवलतीची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला प्राप्त होत आहे. एसटी महामंडळातर्फे समाजातील विविध ३० घटकांना प्रवास भाड्यात ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवासाची सुविधा गेल्या वर्षी २५ ऑगस्टपासून सुरु केली. या योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे ६ कोटी ज्येष्ठ प्रवाशांनी झाला आहे. सध्या दररोज सरासरी ५ लाखापेक्षा जास्त अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक एसटीच्या विविध बसेसमधून मोफत प्रवास करत आहेत.
यामुळे एसटी महामंडळाला महिन्याला ६५ते ७५ कोटी रुपयांची प्रतिपुर्ती रक्कम राज्य सरकारकडून मिळते. सध्या एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यातून महामंडळाला दिवसाला (प्रतिपुर्ती रक्कमेसह) २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.
नवीन योजनेमुळे देखील महामंडळाला कोट्यवधी रुपये शासनाकडून मिळणार आहेत. त्यातून महामंडळाला फायदा होईल. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्के ते 100 टक्के प्रवासी तिकीट दरात सवलत देते.