खडकाळ निकृष्ट जागेवर नवी सृष्टीचे निर्माण...आहे तरी कोठे पहा 

सुमेधा उपाध्ये
Friday, 5 June 2020

झाडे लावणे ती जोपासणे आता तर जंगलसारखे झाले आहे. हे सर्व सृष्टीतला एक आविष्कारच आहे. जो करून दाखवलाय दयानंद बापट यांनी, दगडांच्या साम्राज्यात छोट्या मोठ्या झाडांच्या मुळांनी तग धरला आणि हे नंदनवन आता बहरलं आहे. एक कर्मयोगी दगडाला पाझर कसा फोडू शकतो याचेच हे उत्तम उदाहरण. राज्यातील अनेकांनी अनुकरण करून कृती करावी असेच.

मानवी जीवन आणि निसर्ग यांचे अतूट नातं आहे. मानवाचे संपूर्ण जीवन निसर्गातील विविधतेवर अवलंबून आहे. निसर्ग नेहमीच आपल्याला भरभरून देत असतो, त्यापासून मिळणारा आनंद हा लुटायचा असतो आणि त्यासाठी हृदय भावना तसंच दृष्टीही असावी लागते. हे सर्व कृतीतून शिकविण्याचा प्रयत्न मिरज इथल्या दयानंद बापट यांनी केला. 

Image may contain: 2 people, people sitting, outdoor and nature

मिरज पंढरपूर मार्गावरील खरसिंग हे छोटसं गाव आहे. दंडोबा डोंगराच्या तळाशी असलेल्या स्वत:च्या वैयक्तिक जागेवर 29 जुलै 2016 रोजी दयानंद बापट यांच्या संकल्पातून वृक्षा रोपणाचा कार्यक्रम झाला. हा परिसर तसा कमी पाऊस पडणारा आणि इथली जमिन तर अत्यंत खडकाळ होती. इथे झाडे लावली तरीही कशी जगणार? हा मोठा प्रश्न होता. मात्र, दयानंद बापट यांचा संकल्प दृढ होता. त्यांनी झाडे लावा- झाडे जगवा आणि त्याच्याच छायेत बसा हा मोलाचा संदेश दिला. प्रत्यक्षात कामाला सुरूवात केली.

 

Image may contain: plant and food

इथं हळू हळू वड, पिंपळ, चिंच, आंबा, काजू, अंजीर, मोसंबी, पेरू, फणस, रामफळ, सिताफळ अशा मोठ्या झाडांसह कदंब, हिमालयातील रूद्राक्ष, सिल्वर ओक, ताम्हण, गोरख चिंच, काळी हळद, बिब्बा, रिठा, काटे सावरी, चंदन अशी वैविध्यपूर्ण दुर्मिळ झाडे सुद्धा लावली. सुखद आश्‍चर्य म्हणजे बघतां- बघतां चार वर्ष प्रचंड मेहनत घेतल्यामुळे इथल्या मुळच्या खडकाळ निकृष्ट जागेवर नवी सृष्टी निर्माण झाली. कित्तेक झाडे तर वर्षभरात आकाशाशी स्पर्धा करू लागली. विविध तऱ्हेची फुलझाडे लावली आहेत. पाच हजार तुळशीची रोप लावली आहेत, शतावरी गुळवेल अशी औषधी वनस्पतीही आहेत. अजूनही अन्य झाडे लावणे ही सुरूच आहे. 

Image may contain: plant, tree, outdoor and nature

भले मोठे शेततळे 
या भागात पाण्याचा प्रश्न होता; म्हणून सुमारे साठ लाख लिटर क्षमतेचे मोठे शेततळ तयार केले आहे. आता हा ओसाड माळरान बहरलाय. फळा फुलांच्या बागा विविध पक्षी, काही प्राणी यांना आकर्षित करताहेत. इथं सुरूवातीला एक ही चिमणी फिरकत नव्हती. आता त्यांची संख्या तीनशे साडेतीनशेच्या आसपास आहे. इथले पक्षी माणसांना घाबरत नाहीत. मुक्त संचार करतात. त्यांच्यासाठी दाणा पाण्याची उत्तम सोय केली आहे. तपोवनाच्या बाहेरच्या बाजूने जाणाऱ्या जनावरांसाठी खास पिण्याच्या पाण्याचा हौद बांधला आहे. माणसांसाठी तर पाणपोई करण्याची प्रथा आहेच, ते पुण्याचं कार्य आहे. पण मुक्‍या जनावरांसाठी पक्षांसाठीही पाण्याची सार्वजनिक सोय करून देण्याचा विचार कृतीत आणणे हे दयानंद बापट यांच्यासारखे कर्मयोगीच करू शकतात. 

Image may contain: flower

डोलणारी फुले करतात आकर्षित 
आता तर कधीही या गिरनारी तपोवनात आलो तर हिरवीगार सृष्टी आनंदाने आपलं स्वागत करते. वाऱ्याच्या झोक्‍यावर डोलणारी फुलं आकर्षित करतात. कमळाचं विलोभनीय सौंदर्य आपल्याला खिळवून ठेवत आहे. फळांनी तर झाडे अक्षरश: वाकली आहेत. दंडोबाच्या डोंगरावरून पाहिल तर ओसाड जमीनीचा हा मधला भाग एखाद्या जंगला सारखा दिसतो. खरोखरच जिद्द असेल परिश्रमाची तयारी असेल तर खडकाला पाझर फोडणे शक्‍य असते; हे तपस्वी दयानंद बापट यांनी करून दाखवले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव आता सर्व स्तरातून होत आहे. 

Image may contain: plant, fruit, outdoor, food and nature

सौंदर्य अधिकच खुलतेय 
निसर्ग आपल्या अनंत हस्ताने इथं सौंदर्याची उधळण करीत आहे. पावसाला सुरूवात झाल्यानं अधूनमधून पडणारी पावसाची सर तपोवनातील झाडाझुडपांना वेलींना चिंब चिंब करीत असल्यानं त्यांच्यातील सौंदर्य अधिकच खुलून येत. कृष्णवर्ण ढगांनी दंडोबाचा डोंगर झाकून जातो आणि गिरनारी तपोवनातली हिरवाई खुलून येते...जरा जास्तच तरारते... विविधरंगी फुलं आणि त्यावर बसणारी नाजूक फुलपाखरं त्यांचे बागडणं मनाला भुरळ घालते...भुंग्यांचं कमळांशी खेळण आणि चिमण्यांची दाणापाण्याच्या जागी चिवचिव आणि भुर्रकन मुक्त संचार अत्यंत प्रसन्न करतो. जंगलाच्या राज्यातले सगळेच आता इथंही आकर्षित होत आहेत. नाग, छोटा अजगर, शाळींदर, खारूताई, विविध पक्षी कधीतरी दिसणारे मोर अशा सर्वांनाच इथं अभय आहे. 

No photo description available.

अध्यात्माचे कार्यही मोठे 
दयानंद बापट हे अध्यात्मातील एक श्रेष्ठ नाव आहे. त्यांचं अध्यात्म क्षेत्रातही बरंच कार्य सुरू आहे. अध्यात्म क्षेत्रात त्यांची ओळख पीर योगी दयानाथजी या नावाने होते. त्यांच्या या संपूर्ण कार्यात त्यांची पत्नी स्वाती बापट यांचा मोलाचा वाटा आहे. दयानाथ यांनी सामाजिक उपक्रमासह अध्यात्मिक कार्यही मोठे आहे. या गिरनारी तपोवनात दत्तमंदिर, शिवमंदिर आणि नाथ संप्रदायातील अनोखी दत्तकुटी विराजमान आहे. इथं गोशाळा आहे आणि या तपोवनाची शान वाढवणारी ऐश्वर्या अश्व आहे. चारवर्ष अथक परिश्रमातून बापट यांनी अशक्‍य असं कार्य करून दाखवले आहे. गिरनारी तपोवनातील निसर्ग इथल्या भक्तीरसात न्हाऊन निघत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news miraj pandharpur road environment aria develop dayanand bapat