Board Exam : माय मराठीला सर्रास कॉपी, कारवाई शून्‍य; कॉपीमुक्त अभियानाचा दावा फोल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

10 th exam

Board Exam : माय मराठीला सर्रास कॉपी, कारवाई शून्‍य; कॉपीमुक्त अभियानाचा दावा फोल!

जळगाव : माध्यमिक शान्लात विभागाकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेला गुरुवार (ता. २)पासून सुरवात झाली.

पहिल्‍याच मराठीच्या पेपरला (Marathi) अनेक परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. (10th examination started and Marathi paper is widely copied at many examination centers jalgaon news)

पेपर सुरू झाल्यानंतर अनेक केंद्रांवर शेवटच्‍या एक ते दीड तासात वर्गांमध्ये सर्रास कॉपी सुरू होती. तरीही जिल्‍ह्यात कारवाई झाली नाही. अर्थात वर्गात कॉपी सुरू असल्‍याने शिक्षण विभाग व पोलिस प्रशासनाकडून कॉपीमुक्त अभियानाचे कितीही दावे केले, तरी ते फोल ठरत असल्याचे दिसून आले.

बारावीच्‍या परीक्षेनंतर गुरुवार (ता. २)पासून दहावीच्‍या परीक्षेला सुरवात झाली. गुरुवारी माय मराठीचा पहिला पेपर होता. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांची मोठी गर्दी झाली होती. बारावीप्रमाणे दहावीच्‍या पहिल्‍या पेपरालाही परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपी चालत असल्‍याचे चित्र पाहावयास मिळाले. कॉपी पुरविणाऱ्यांची धावपळ सुरू असल्‍याचे शेवटच्‍या तासात पाहावयास मिळाले.

पोलिस बंदोबस्त असतानाही कॉपी

दहावीच्या परीक्षेदरम्यान शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर तरुण शाळांच्या उंच भिंतीवर चढून खिडक्‍यांमधून कॉपी पुरवित होते. काही ठिकाणी सुरवातीला पोलिसांनी कॉपी पुरविणाऱ्यांना हुसकाविले. मात्र, काही जणांनी पोलिसांचा बंदोबस्त असतानाही पोलिसांना न जुमानता विद्यार्थ्यांपर्यंत कॉपी पोहोचविल्या.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

यात नूतन मराठा महाविद्यालय, ॲंग्‍लो उर्दू हायस्‍कूल परिसरात परीक्षा सुरू असताना, कॉप्यांचा खच पडलेला दिसून आला. असे असतानाही भरारी किंवा बैठे पथकाकडून जिल्‍ह्यात कारवाई झालेली नाही, हे विशेष.

९१६ विद्यार्थी अनुपस्थित

जळगाव जिल्‍ह्यातील १३८ केंद्रांवर गुरुवारपासून दहावीच्‍या परीक्षेला सुरवात झाली. जिल्‍ह्यातून ४० हजार १०१ विद्यार्थी प्रविष्ट होते. यापैकी ३९ हजार १८५ विद्यार्थी उपस्थित होते, तर ९१६ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पहिल्‍या पेपराला परीक्षार्थी उपस्थिती टक्केवारी ९७ टक्‍के होती.

शाळेत पोहोचल्‍यावर शिक्षकांचे घेतले आशीर्वाद

पेपर सुरू होण्याच्‍या तासभर अगोदर विद्यार्थी केंद्रावर पोहोचले होते. मुलांना सोडण्यासाठी पालकांची प्रचंड गर्दी केंद्राच्‍या गेटबाहेर होती. गेटमधून प्रवेश करताना प्रत्‍येक विद्यार्थ्याचे आयकार्ड तपासून सोडले जात होते. यादरम्‍यान काही विद्यार्थ्यांनी वर्गात जाण्यापूर्वी आपल्‍या शिक्षकांचा पाया पडून आशीर्वाद घेतले.

टॅग्स :JalgaonSSC Exam10 th exam